
>> गोरख तावरे
सिक्कीम राज्यातील दुर्गम सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत असताना बाळकृष्ण निकम हे शहीद झाले. त्यांच्या शौर्याची ही गाथा.
सातारा जिल्ह्याची देशसेवेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित करणारी दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील पिंपळोशी (ता. पाटण) येथील भारतीय सैन्यदलातील हवालदार बाळकृष्ण विलासराव निकम हे सिक्कीम राज्यातील दुर्गम सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. भारतीय सैन्यातील 120 इंजिनीअर रेजिमेंटचे हवालदार बाळकृष्ण विलासराव निकम हे सिक्कीममध्ये चीन सीमेवर कर्तव्य बजावताना 11 मार्च 2026 रोजी शहीद झाले. 23 वर्षांची देशसेवा बजावलेले बाळकृष्ण निकम हे ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’अंतर्गत तैनात असताना प्राणवायूच्या कमतरतेमुळे वीरगतीला प्राप्त झाले.
सातारा जिल्हा हा स्वातंत्र्य लय़ातील योगदान आणि सैन्य सेवेसाठी ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातील अनेकांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून देशासाठी लदिला. आजही मोठय़ा प्रमाणावर युवक सैन्यदलात भरती होऊन देशसेवा बजावत आहेत. या परंपरेला साजेसा आदर्श ठरलेले हवालदार बाळकृष्ण निकम यांनीही देशसेवेला आयुष्याचे सर्वोच्च ध्येय मानले होते.
हवालदार बाळकृष्ण निकम हे सध्या सिक्कीम राज्यातील शेरावानी परिसरात भारताच्या सीमारेषेवर तैनात होते. सुमारे 80 किलोमीटर लांबीच्या दुर्गम पर्वतीय भागात, दोन हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर ते रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. या भागात वर्षभर दाट बर्फ, थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता अशी कठीण परिस्थिती असते. अशा प्रतिकूल वातावरणातही त्यांनी निष्ठेने देशसेवा बजावली. कर्तव्य बजावत असताना उंचावरील प्रदेशामुळे त्यांच्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मातृभूमीच्या सेवेत ते शहीद झाले.
बाळकृष्ण निकम हे ‘बाबू’ या नावाने परिसरात परिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मेष्टेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, तर बाळासाहेब देसाई महाविद्यालयात त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुएस.वाय. बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेत असताना 2003 साली सांगली येथे झालेल्या सैन्य भरतीत त्यांची निवड झाली.
निवड झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आणि इंजिनीअर रेजिमेंटच्या युनिट ाढमांक 120 मध्ये हवालदार म्हणून सेवा सुरू केली. जवळपास 23 वर्षे त्यांनी भारतीय सैन्यदलात विविध ठिकाणी देशसेवा बजावली. सियाचीन, लडाखसारख्या अतिसंवेदनशील सीमावर्ती भागात त्यांनी कर्तव्य बजावत देशाचे रक्षण केले. निकम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लहान भाऊ-बहीण असलेल्या या कुटुंबात त्यांचे चुलते सैन्यात कार्यरत होते. त्यांच्या प्रेरणेने देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून बाळकृष्ण निकम यांनी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.
दीर्घकाळ देशसेवा बजावत असताना त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आता स्थिर होत होती. मात्र अचानक त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेले बाळकृष्ण निकम यांच्या शौर्यपूर्ण सेवेमुळे पिंपळोशी गावाला अभिमान वाटत असला तरी त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर जवानाला जिल्हाभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या कर्तृत्वाची आठवण साताऱ्याच्या देशसेवेच्या परंपरेत कायम स्मरणात राहणार आहे.






























































