
>> वैश्विक
सुमारे पाच अब्ज वर्षांनी आपला सूर्य कायमचा अस्ताला जाईल. कारण ताऱ्याला जसा जन्म असतो तसा अंतही. सूर्यासारखा तारा शेवटच्या घटिका मोजू लागण्याची चाहूल लागताच त्याचं रेड जायंट किंवा लाल महाताऱ्यात रूपांतर होऊ लागेल. त्याचा आकार एवढा विस्तृत होईल की पार मंगळापर्यंतचे सारे ग्रह तो कवेत घेईल. ही मगरमिठी असेल. भयंकर उष्णतेने पृथ्वीवरचं जीवन पूर्णपणे नष्ट होईल, मग चंद्राची काय अवस्था! त्या वेळपर्यंत चंद्र-मंगळावर वस्ती झालेली असेल असं जमेस धरलं तरी तिथल्या किंवा आपल्या सौरसंकुलातल्या कोणाही जीवमात्राची त्यातून सुटका होणार नाही.
त्यानंतर काय होईल सूर्याचं? तर तो श्वेत – खुजा म्हणून अंतराळात राहील. त्याचं गुरुत्वाकर्षण तसंच असेल आणि निप्राण ग्रहमाला त्याच्याभोवती कायमच्या अंधारात गरगरत राहील. पाच अब्ज वर्षे म्हणजे फारच मोठा काळ आहे. पृथ्वीवरचं जीवन साधारण कोटी वर्षांपूर्वीचं आणि सध्याचा माणूस वीस ते चाळीस लाख वर्षांपूर्वीचा. त्यामुळे आपल्या चिंता करण्याचं काहीच कारण नाही.
एखादा तारा नष्ट झाल्यावर त्याचं पुढे काय होणार हे त्यातील वस्तुमानावर (मास) अवलंबून असतं. आपल्या सूर्याच्या वस्तुमानाचे तारे श्वेत-खुजे बनतील. सूर्य संपल्यानंतर त्याचं जे वस्तुमान असेल त्याच्या 1.4 पट वस्तुमानाचे मृत तारे न्यूट्रॉन स्टार होतील आणि प्रचंड तारा नष्ट झाल्यावरही त्याचं वस्तुमान 3.4 एवढं किंवा जास्त भरलं तर त्याचं ब्लॅक होल किंवा कृष्णविवरात रूपांतर होईल. नोबेल पुरस्कार विजेते हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन शास्त्र्ाज्ञ चंद्रशेखर सुब्रह्मण्यम यांनी हे भाकित केलं आणि ते सत्य ठरलं. ते आता खगोल विज्ञानात सिद्धांत म्हणून ‘चंद्रशेखर लिमिट’ याच नावाने ओळखलं जातं.
ब्लॅक होल किंवा कृष्णविवर ही संकल्पना 1784 मध्येच जॉन मिशेल आणि पिअरे सिमसन यांनी मांडली होती. कारण विश्वात जेथे काही ठिकाणी काहीच दिसत नसतानाही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असल्याचं आढळतं तेथे नेमकं काय असतं. म्हणून ते ब्लॅक होल! आणि ते खरंच आहे. तारा त्याच्या प्रकाशित होण्याने दिसतो. परंतु ब्लॅक होल जेवढं मोठं तेवढं ते आसपासचा प्रकाशही गिळंकृत करत असतं. त्याच्या खादाडपणापुढे काही ताऱ्यांचाही पाड लागत नाही. तेही त्याचं ‘मास’ किंवा वस्तुमान हळूहळू गमावून कृष्णविवराची शक्ती वाढवायला ‘मदत’ करतात. मिशेल यांनी आरंभी या न दिसणाऱ्या, पण गुरुत्वाकर्षण जाणवणाऱ्या भागाचं वर्णन ‘डार्क स्टार’ किंवा ‘कृष्णतारा’ असं केलं होतं. पण ‘तारा’ही संकल्पना प्रकाशाशी निगडित आहे. त्यामुळे पुढे अशा भागाला कृष्णविवर हे योग्य नाव मिळालं. अशी अब्जावधी कृष्णविवरे संपूर्ण विश्वात आहेत आणि आपल्या मिल्की-वे किंवा आकाशगंगा दीर्घिकेतही (गॅलॅक्सीमध्ये) आहेत.
आपली ग्रहमाला आपल्या सूर्याभोवती फिरते तसंच संपूर्ण ग्रहमालेसह सूर्य आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती सेकंदाला सुमारे 220 किलोमीटर एवढय़ा वेगाने फिरत असतो. अवकाशात दिसणाऱ्या ‘धनू’ राशीच्या तारकापुंजात आपल्या दीर्घिकेचं केंद्र आहे. कृष्णविवराची संकल्पना समजायला थोडी जड होती. परंतु 1916 मध्ये कार्ल श्वार्टझ्चाइल्ड यांनी आइन्स्टाइन यांच्या सर्वसाधारण सापेक्षवादाला धरूनच (जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) विश्वात ब्लॅक होल असल्याचं सांगितलं. पुढे 1958 मध्ये डेव्हिड फिंकेन्स्टाइन यांनी ब्लॅक होलमधून प्रकाशही निसटू शकत नाही याची चर्चा केली. 1967 मध्ये जोसलिन बर्नेल यांनी न्युट्रॉन स्टारचा शोध लावल्यानंतर, चंद्रशेखर सांगतात त्यानुसार ताऱ्याच्या अंतानंतरच्या स्थितीचा एक पुरावा मिळाला आणि त्यातून गुरुत्वीय अवपात किंवा ‘ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स’ची संकल्पना सिद्ध झाली. अखेरीस 1971 मध्ये सिग>स किंवा हंस तारकासमूहातलं एक्स-1 हे कृष्णविवर शोधलं गेलं. सैद्धांतिक मांडणीला गणिताची जोड देऊन या गोष्टी जेव्हा सिद्ध झाल्या तेव्हा खगोल अभ्यासाचा वेग निश्चितच वाढला.
आधी म्हटल्यानुसार आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी जे प्रचंड कृष्णविवर आहे त्याचं वस्तुमान, आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 4.3 अब्ज पट आहे! आणि त्यापेक्षाही अतिप्रचंड कृष्णविवरे विश्वात आहेत. 1916 मध्ये आइन्सटाइन यांनी भाकित केलेल्या गुरुत्वीय लहरी शंभर वर्षांनी ‘लायगो’ प्रकल्पाने शोधल्या, त्यांची निर्मिती दोन कृष्णविवरांच्या संमीलनामधूनच झाली होती. अर्थात ही घटना विश्वात कोटय़वधी वर्षांपूर्वी घडली होती. विराट विश्वातल्या घटनांचे प्रत्यक्ष पुरावे हाती यायला असा काळ जावा लागतो.
आता या चर्चेचं कारण म्हणजे, नोव्हेंबरमध्ये गैया (किंवा गाइया) या यानाने शोधलेलं कृष्णविवर आपल्यापासून फक्त 1500 प्रकाशवर्षं अंतरावर आहे. त्याचं वस्तुमान सूर्याच्या 10 पट असलं तरी त्याचा आपल्या पृथ्वीला धोका नाही. परंतु खगोलीय संशोधनात नवीन काय चालतं हे त्यातून कळतं. तसा या ‘गाइया’ स्पेसक्राफ्टने ‘लाख’ बहुतारे रचना शोधल्या आहेत. एवढय़ा ‘मल्टिस्टार सिस्टिम’ शोधणारं हे यान ‘युरोपीय स्पेस एजन्सी’ने अवकाशात पाठवलंय. ‘10 एप्रिल 2019 रोजी कृष्णविवराचं पहिलं छायाचित्रंही हाती आल्यामुळे आता त्यांच्या अस्तित्वाची माहिती सार्वसामान्यांना सांगणं सोपं झालंय.



























































