जाऊ शब्दांच्या गावा – गोष्ट गावांच्या नावांची

>> साधना गोरे

शाळा-कॉलेजमध्ये सारख्या नावाची कित्येक मुलं-मुली असतात. सारख्या नावांचे लोक एका इमारतीत असतात. गावात तर असतातच असतात. मग अशा वेळी आपण काय करतो? त्या दोन्ही व्यक्तींचं पहिलं नाव सारखं असेल तर आपण त्यांना आडनावाने बोलवतो. पण त्यांचं पहिलं नाव आणि आडनावही सारखं असेल तर? तर पहिलं नाव आणि वडिलांचं नाव लावून बोलवू. पण पहिलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव तिन्ही सारखीच असली तर काय करायचं? हा असा योगायोग अगदीच दुर्मीळ म्हणावा असा ठरेल. पण गावाकडे अशा परिस्थितीत खालच्या आळीचा, तमक्या मळ्यातला असं म्हणून ओळख पटवून दिली जाते. अन् गावात असं एखाद्दुसरंच सारखं नाव असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या राहण्याचं ठिकाण सांगितलं की ओळख पटते. पण अशी एकसारखी नावं गावांची असली तर? आहे की नाही विचार करण्याजोगा प्रश्न!

महाराष्ट्रात काही गावांची नावं बुद्रुक, खुर्द अशी विशेषणवजा आहेत. ही बुद्रुक, खुर्द विशेषणं एकसारखी नावं असलेली गावं ओळखण्यासाठी लावली गेली. उदा. वढू बुद्रुक हे संभाजी महाराजांचं स्मारक असलेलं गाव उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. शिरूर तालुक्यातलं हे वढू बुद्रुक गाव भीमा नदीच्या एका तीरावर आहे, तर वढू खुर्द हे गाव भीमेच्या दुसऱ्या तीरावर आहे. बुद्रुक आणि खुर्द अशी विशेषणं असलेली महाराष्ट्रातली ही दोनच गावं नाहीत. अशी शेकडो गावं आहेत. अन् भारताचा विचार केला तर अशा गावांची संख्या हजारोंच्या घरात असेल.

मुस्लीम राजवटींच्या काळात एकाच नावाची दोन वेगवेगळी गावं किंवा नदी, ओढा यांमुळे वेगवेगळी झालेली गावं कशी ओळखायची असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा प्रशासकीय सोयीसाठी अशा गावांच्या नावामागे बुद्रुक व खुर्द ही विशेषणं लावण्याची पद्धत रूढ झाली. ‘बुद्रुक’ हा शब्द फारसी ‘बुझुर्ग’ या शब्दापासून मराठीत आला. ‘बुझुर्ग’ म्हणजे ज्येष्ठ, वयोवृद्ध, मोठा, श्रेष्ठ. या अर्थानुसार सारखं नाव असलेल्यांपैकी मोठ्या गावाला बुजुर्ग म्हटलं गेलं. त्याचा मराठीत ‘बुद्रुक’ असा अपभ्रंश झाला.
फारसीत ‘खुर्द’ म्हणजे तुकडा, खंड, फुटकळ, किरकोळ वस्तू, मोड, चिल्लर. या अर्थावरून सारख्याच नावांच्या दोन गावांपैकी लहान गावाला खुर्द म्हटलं गेलं. या फारसी ‘खुर्द’वरून मराठीत ‘खुर्दा’ शब्द तयार झाला. त्याचा वापर तर आणखी व्यापक झालेला दिसतो. सुट्या पैशांना, छोटय़ा, कमी किमतीच्या नाण्यांना सर्रास खुर्दा म्हटलं जातंच. त्यावरून फुटक्या, छिन्नभिन्न झालेल्या वस्तूंनाही ‘खुर्दा’ म्हटलं गेलं. इतपंच काय, गचके बसून अंग रगडून-घुसळून निघालेल्या अवस्थेलाही ‘अंगाचा खुर्दा झाला’ म्हटलं जातं. तसंच मोठय़ा माणसांच्या जमावामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान्यांनाही खुर्दा किंवा चिल्लर म्हटलं जातं. 1761च्या पानिपतच्या युद्धात मराठय़ांची किती जीवितहानी झाली हे सांगणारं एक प्रसिद्ध भयव्याकुळ वाक्य आहे – “लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही.’’ मराठीत ‘खुर्दा’चा असा अर्थविस्तार झालेला दिसतो.

पुन्हा फिरून गावाच्या नावाकडे येऊ. काही वेळा मोठय़ा गावाचं नाव आहे तसंच ठेवून लहान गावाला ‘खुर्द’ हे विशेषण जोडलं गेलेलं दिसतं. उदा. दिल्ली हे आपलं राजधानीचं शहर आहे. पण गंमत म्हणजे या दिल्ली प्रदेशात ‘दिल्ली खुर्द’ नावाचं गावसुद्धा आहे. भारतातल्या पंजाब, जम्मू-कश्मीर, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांपासून ते अगदी म्यानमार, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्येही ‘खुर्द’ विशेषणं असलेली गावं आढळून येतात. उत्तर भारतात फारसीतला बुजुर्ग शब्द आहे तसा स्वीकारला गेल्याने तिथं सारख्या नावाच्या दोन गावांपैकी मोठय़ा गावाला ‘बुजुर्ग’ हेच विशेषण दिसतं.

मराठीत गावाच्या नावाच्या आधी ‘मौजे’ हे विशेषण लावण्याचीही पद्धत आहे. हा शब्द अरबीतून फारसीत आला. अरबी ‘मव्झिअ’ / ‘मौझा’ या शब्दापासून फारसी ‘मौज़े’ शब्द तयार झाला. फारसीत मौजे म्हणजे खेडं. त्यामुळे खेडय़ाच्या नावाच्या आधी आजही ‘मौजे’ असा उल्लेख केला जातो.

याचा अर्थ मौजे असलेलं गाव कसबा असत नाही. कसबा म्हणजे शहराहून लहान, पण खेडय़ाहून मोठं गाव. राजवाडे, गड-किल्ले असणाऱया गावालाही कसबा म्हटलं जातं. पुण्यातलं कसबा पेठ तर प्रसिद्धच आहे. कोकणात कसबा संगमेश्वर, कसबा नातू, कोल्हापुरात कसबा वाळवे, कसबा ठाणे ही गावं आहेत.