लेख : कलेकलेने वाढते यश…!

694

>> दिलीप जोशी 

गेल्या शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारच्या पहाटे कोटय़वधी देशवासीयांचे डोळे टीव्हीकडे लागले होते. हिंदुस्थानच्या पहिल्यावहिल्या चंद्रावर उतरणाऱ्या ‘विक्रम’चं सुखरूप चंद्रावतरण आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या ‘प्रज्ञान’ रोव्हरचं चांद्रपृष्ठावरचं भ्रमण पाहण्यासाठी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांसह पंतप्रधान आणि देशवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अवघ्या काही सेकंदांत एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार असं वाटत असतानाच चांद्रपृष्ठापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’ लॅण्डरची मार्गक्रमणा विचलित झाली आणि एका महत्त्वाकांक्षी प्रयोगाला ‘ग्रहण’ लागलं. एक उमेदीची गोष्ट म्हणजे ‘विक्रम’चा आता पत्ता लागलाय.

देश-विदेशातल्या अवकाश विज्ञान संस्थांही हिंदुस्थानच्या या यशस्वी होत असलेल्या प्रयोगाकडे लक्ष ठेवून होत्या. ‘विक्रम’ने ‘चांद्रयान-2’ पासून विलग झाल्यापासून साऱ्या संगणकीय आज्ञा तंतोतंत पाळल्या होत्या. त्यामुळे सारेच जल्लोषाच्या तयारीत होते, परंतु ऐन जिंकण्याच्या क्षणी युद्धाची बाजू पलटावी तसं विपरीत घडलं. पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. ‘इस्रो’ प्रमुख सिवन यांना तर अश्रू अनावर झाले. पंतप्रधानांनी त्यांची समजूत घालताना देशवासीयांच्याच भावना व्यक्त केल्या. ‘आम्हाला तुमचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो. भविष्यात आपलं चांद्रयान जरूर चांद्रविजय साजरा करील’.

त्याक्षणी मात्र आकाश एकाएकी झाकोळल्यासारखं झालं. तसं होणंही स्वाभाविकच, परंतु त्यामुळे ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी गेली 12 वर्षे केलेल्या वैज्ञानिक ‘तपश्चर्येला’ आणि गेले 48 दिवस डोळ्यांत तेल घालून चांद्रयान – 2 च्या प्रवासासाठी केलेल्या प्रयत्नांवर त्याचं सावट पडत नाही. आपली ही मोहीम पंच्याण्णव टक्के यशस्वीच झाली असं म्हणायला हवं. विक्रम कार्यरत करता आलं तर ती 100 टक्के यशस्वी होईल. चंद्राच्या कलांप्रमाणेच हे यश पूर्णत्वाला गेले तर आनंदच आहे. या प्रयोगाने अखेरच्या क्षणी अपयश का आलं त्याची सांगोपांग चिकित्सा हेच वैज्ञानिक करतील अशा कठीण अंतराळ मोहिमांची आखणी करतानाच त्यातील संभाव्य धोक्यांची कल्पना त्यांना असते. त्यामुळे सर्व तपशील स्पष्ट झाला की पुढच्या मोहिमेसाठी नेमक काय काळजी घ्यावी लागेल याचा अंदाज येईल. काही अपयशांनाही कर्तृत्वाची झळाळी असते. ‘इस्रो’च्या चांद्रमोहिमेविषयी देशवासीयांना आदर आणि अभिमानच वाटत राहील. ‘ऑर्बिटर’ वर्षभर चंद्राभोवती फिरत असून पुढचे 14 दिवस महत्त्वाचे आहेत. हेसुद्धा लक्षात घ्यावं.

ऑगस्टमध्ये चांद्रयान – 2 अवकाशात सोडण्याची वेळही अचानक पुढे ढकलण्यात आली होती. कारण त्यावेळी लक्षात आलेली तांत्रिक त्रुटी दूर करणं शक्य होतं. तसंच झालं त्यावेळी दाखवलेल्या संयमाचं फळ मिळून चांद्रयान-2 अवकाशात नेणारं रॉकेट यशस्वीरीत्या उडाले. तेव्हापासून त्याच्या, पृथ्वीच्या पोलार (ध्रुवीय) कक्षेतील फेऱ्या सुरू झाल्या. कमी इंधन वापरून खर्च आटोक्यात ठेवण्याचा असा यशस्वी प्रयोग चांद्रयान-1 च्या वेळी झालाच होता. पृथ्वीभोवती फिरताना प्रत्येक फेरीत अल्प इंधनावर ‘बुस्टर’ प्रज्वलित करून कक्षा वाढवत वाढवत चंद्राच्या कक्षेत पोचणं आणि चांद्रकक्षेत पोहोचल्यावर ‘ब्रेकर’ (ब्रेक थ्रस्ट) लावून वेग बंद करत चंद्राभोवती फिरत जवळ जाणं या प्रदीर्घ प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा कसोटीचा (क्रिटिकल) होता.

हे सगळे टप्पे लीलया पार करत चांद्रयान-2 चंद्राभोवती ठरावीक कक्षेत फिरू लागलं होतं. परंतु वैज्ञानिक प्रयोगात ‘इथपर्यंत’ मिळालेलं यश असं काही नसतं. शेवटच्या टप्प्यापर्यंत सारं सुरळीत झालं आणि प्रयोग ‘यशस्वी’ झाला म्हणजेच ‘यश’ मिळालं’ असं म्हटलं जातं ते योग्यच आहे. उदाहरण द्यायचं तर थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला तेव्हा अनेक वेळा अपयश आलं. त्याने खचून न जाता तो म्हणाला, ‘कोणत्या मार्गाने जायचं नाही ते प्रत्येक वेळेला समजलं’ अशी दुर्दम्य इच्छाशक्ती वैज्ञानिकांकडे असते. त्यामुळे क्षणिक वाईट वाटणं हे साहजिक असलं तरी आपल्या शास्त्रज्ञांची संशोधन क्षमता पुढच्या काळात चांद्रविजयाचं इप्सीत साध्य करेल यात शंका नाही.

जगात आज चंद्रावर ‘जाणाऱ्या’ राष्ट्रात अमेरिका, चीन व रशिया यांच्यानंतर आपला क्रमांक लागला असता. अमेरिकेतील काही खासगी एजन्सीसुद्धा चंद्रावर जाण्याच्या योजना आखत आहेत. या क्षेत्रातली वाढती जागतिक स्पर्धा आपल्या शास्त्रज्ञांना ठाऊक आहेच. आता ते शांतचित्ताने या अपयशाचंही कठोर परीक्षण करतील आणि नवी मोहीम आखतील. हेतू स्पष्ट नि शुद्ध असले की यशापयशाची धास्ती वाटत नाही. अपयशाने काही काळ थबकावं लागलं तरी नव्या जोमाने कामाला सुरुवात होते. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.

यानिमित्ताने चांद्रयान आणि त्यामागचं विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचलं. एका अभ्यासपूर्ण (ऍकॅडेमिक) विज्ञान विषयावर चर्चा होऊ लागली. देशातील तरुणाईत या मोहिमेने वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याची कामगिरी केली ही एक जमेची बाजू आहेच. त्यामुळे अपयश म्हणजे बुद्धीला चालना देणारं आव्हान आहे असं मानलं की नव्या जोमाने नव्या मोहिमेची आखणी सुरू होते. प्रगत देशांनाही कधी ना कधी अशा धक्का (सेटबॅक) सहन करावा लागल्याचा इतिहास आहे. एखादं अपयशही आव्हानाला सामोरं जाण्याची ईर्षा निर्माण करणारं ‘बुस्टर’ ठरू शकतं. ‘इस्रो’ने नजीकच्या भविष्यकाळात सिद्ध करेल. अवघा देश त्यांच्यासमवेत आहे.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या