
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
कांगो ऑपरेशन, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन पवन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन सेसलिहार, ऑपरेशन पराक्रम इत्यादी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहिमा भारतीय वायुसेनेने यशस्वी केल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आपत्तीमध्ये कोणतेही आव्हान स्वीकारत त्या आपत्तीत यश संपादन करणे हा आपल्या वायुसेनेचा आवडता छंद आहे, बाणा आहे. 1977 मध्ये मालदीवमधील बंडाळी मोडून काढत त्या राष्ट्राचे संरक्षण हे आपल्या वायुसेनेच्या समयसूचक नियोजनाचे यश होते. उद्याच्या भारतीय वायूसेना दिनानिमित्त…
विमानाचा शोध लागला आणि समरांगणाची व्याप्ती नभांगणापर्यंत पोहोचून युद्धाची कक्षा रुंदावली. वायुशक्तीच्या जोरावर दोस्त राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध हिटलरपासून हिसकावून घेतले. पर्ल हार्बरवर जपानने प्रहार केला. अमेरिका युद्धात ओढली गेली. याचा बदला म्हणून अमेरिकेने हिरोशिमा, नागासाकी शहरे बेचिराख केली तेव्हा साऱया जगाने वायुसेनेचे संहारक रौद्ररूप अनुभवले. सर्वात वयस्कर (senior sister) भूदल सेना व शिवकालीन प्रतापी नौदल सेना यांना वायुशक्तीचे वायुदल प्राप्त झाले आणि भारतीय जवानांनी अवकाशालाही भेदले.
1913 साली सीतापूर उत्तर प्रदेश येथे लष्करी वायुशक्ती विद्यालय सुरू झाले.1914 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात या विद्यालयातून तयार झालेल्या सर्व वैमानिकांना विमानोड्डाण करण्याचे भाग्य लाभले. लेफ्टनंट इंद्रलाल रॉय या वायुयुद्धात ‘डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस’ हे शौर्य पदक पटकावले. तेव्हा या वायुशक्तीला ‘रॉयल फ्लाइंग कोर’ म्हणून संबोधले जात असे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी कराची (आता पाकिस्तानात) या ठिकाणी ब्रिटिश लेफ्टनंट जनरल ऍण्ड्रय़ू स्किन यांच्या शिफारसीनुसार ‘रॉयल इंडियन एअर फोर्सची’ मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा या भारतीय आकाश योद्धय़ांनी अफगाणी टोळय़ांनी घातलेला धुमाकूळ मोडून काढण्याचे काम पार पाडले.
इथूनच आधुनिक आण्विक युगात भारतीय वायुसेनेचा युद्धकालीन सहभाग निर्णायक व महत्त्वपूर्ण ठरून आज वायुसेनेचे महत्त्व आधोरेखित झाले आहे. नौसेनेच्या पाणबुडीमुळे अंडरवॉटर युद्धतंत्र विकसित झाले तसेच मिराज 2000, जग्वार, कॅनबेरा इत्यादी बॉम्बफेकी लढाऊ विमानांमुळे युद्धाची परिसीमा, कक्षा रुंदावली आहे. शत्रूवर जरब बसविण्याकरिता हजारो टन अग्निबाण सोडणारी विमाने दररोज तंत्रज्ञान विकसित करत असून युद्धावर पकड बसविण्याचे मनसुबे रचत आहेत. वायुसेनेच्या प्रत्ययकारी झंझावाती मुसंडीमुळे युद्धाची दिशा व दशा उलटविणे भारतीय सैन्याला शक्य होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय वायुसेनेचा 1965 च्या भारत-पाक युद्धामधला दणका.
भारतावर पाकिस्तानी लष्कराने हल्ला केला. या सीमावर्ती भागात अतिशय चिंचोळा भाग (Chicken Neck) ताब्यात घेऊन भारताचा कश्मीरशी संबंध तोडून टाकायचा असा पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल अकबर खानचा हेतू होता. मात्र भारतीय वायुसेनेला आदेश मिळताच दीड तासात पाकिस्तानी सैन्याला 26 हवाई हल्ले करत नेस्तनाबूत केले. या हल्ल्यात आपल्या आकाश योद्धय़ांनी पाकिस्तानचे 14 पॅटन रणगाडे, 67 चिलखती गाडय़ा व 5 प्रचंड तोफा उद्ध्वस्त केल्या. या युद्धात आपल्या आकाश योद्धय़ांनी मर्दुमकी गाजवत 4 महावीर व 42 वीर चक्रे पटकावली.
27 ऑक्टोबर 1947 या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यानंतर दोन महिन्यांत पाकने कश्मीरवर अनपेक्षित हल्ला केला. तेव्हा आपल्या वायुसेनेने भूदलाची एक संपूर्ण रेजिमेंट उतरवली म्हणून कश्मीर वाचले. लेहमध्ये विद्युत गतीने युद्ध उतरवले म्हणून लडाख व कारगील वाचवले गेले. या युद्धात तत्कालीन ग्रुप कॅप्टन हृषीकेश मुळगावकर या जिगरबाज आकाश योद्धय़ाने पराक्रमाची शर्थ करत झोजी खिंडीमधील संग्राम जिंकला. होंकर टेंपेस्ट – 2 या एअर क्राफ्टमधून घणाघाती हल्ला करत गनिमाच्या ताब्यामधला मोक्याचा डोमेल पूल उद्ध्वस्त केला. त्यांना या पराक्रमाबद्दल महावीर चक्रमाने गौरवांकित करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात फेब्रुवारी 1976 ते ऑगस्ट 1978 पर्यंत ते भारतीय वायुदलाचे एअर चीफ मार्शल होते.
यानंतरचे 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात आपल्या वायुसेनेने 10 डिसेंबर 1971 या दिवशी भारतीय आकाश योद्धय़ांनी ढाक्का येथील राजभवनावर अग्निबाण सोडून पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवून शरणागती पत्करण्यास भाग पाडले. कराची बंदरातील तेल टाक्या अचूक लक्ष्यभेद करत पेटवून दिल्या. भारतीय भूदल, नौदल व वायुदल यांचा सुसंघटित समन्वय होऊन आपण पाकच्या 93 हजार सैन्याला शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडले. खरे तर 1971 चे युद्ध म्हणजे गळू होते पूर्व पाकिस्तानात, पण जनरल याह्याखानने फोडण्याचा प्रयत्न केला कश्मीरात. या परिसरात तरुण आकाश योद्धा फ्ॊलाइंग ऑफिसर निर्मलजीतसिंग सेखो याने पाकिस्तानची पाच विमाने पाडून पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावत मृत्यूला कवटाळले. त्यांना युद्धोत्तर मरणोत्तर परमवीर चक्र जाहीर झाले.
1999च्या कारगील युद्धातील वायुसेनेची कामगिरी हा जागतिक विक्रम होता. हा पराक्रम म्हणजे वायुसेनेच्या शिरपेचात सोनेरी पीस पाच हजार मीटर उत्तुंग आकाशाला गवसणी घालत शत्रूला पिटाळून लावणे हे प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणाऱया टोलोलिंग, हम्प सॅडल व टायगर हिलसारख्या पॉइंटस्वर गनिमाला वायुसेनेने उद्ध्वस्त केले. उत्तुंग समरांगणात लढल्या गेलद्या युद्धाचे कोड नाव होते ‘सफेद सागर’. भूदल सेनेला हवाई छत्र (Air Coverage) पुरवत आपल्या वायुसेनेने पाकिस्तानी सैन्याची जिरवली.
कांगो ऑपरेशन, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन पवन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन सेसलिहार, ऑपरेशन पराक्रम इत्यादी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहिमा भारतीय वायुसेनेने यशस्वी केल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आपत्तीमध्ये कोणतेही आव्हान स्वीकारत त्या आपत्तीत यश संपादन करणे हा आपल्या वायुसेनेचा आवडता छंद आहे, बाणा आहे. 1977 मध्ये मालदीवमधील बंडाळी मोडून काढत त्या राष्ट्राचे संरक्षण हे आपल्या वायुसेनेच्या समयसूचक नियोजनाचे यश होते.
1962च्या युद्धात आमच्या शासकांनी वायुसेनेचा लढाऊ दल म्हणून वापर न करता सर्व एअरक्राफ्ट्स ‘हँगर’मध्येच उभे ठेवले. त्या युद्धात वायुसेनेने फक्त सैन्याची व साहित्याची ने-आण एवढीच कामगिरी केली. याचा परिणाम चिनी सैन्य भारतात घुसत गेले. आमच्या गुप्तचरांचे अपयश तसेच काही परदेशी विद्वानांनी आपल्या वायुसेनेला उत्तुंग भरारी घेण्याचा अनुभव नाही हा सल्ला दिला व आम्ही तो मानला, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या 16 आकाश योद्धय़ांनी ब्रिटिशांकित असताना ‘डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस’ हे अत्युच्च पदक पटकावले होते हे आम्ही सोयिस्कररीत्या विसरलो. ही चूक सुधारण्याची संधी लाल सेना देते का ते बघायचे!