‘सूर’ जिद्दीचा

89

>> सुरेश बसनाईक

जिद्द आणि खडतर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते. घर, संसार, नोकरी, सारे सांभाळून स्वीमिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी डोंबिवलीची गीता चौधरी हे त्याचे ढळढळीत उदाहरण. सहा महिन्यांची असतानाच नियतीने संकटाचा वर्षाव केला, तिला पोलिओने ग्रासले. आई-वडिलांच्या दुःखाला तर पारावार उरला नाही. आपल्या लाडक्या मुलीचे आता कसे होणार या काळजीने त्यांची झोपच उडाली. मात्र ज्या नियतीने संकट आणले त्याच नियतीने लहानग्या गीताला जिद्द दिली. त्याच्या आधारावर तिने बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेत कार्यानुभव शिक्षिकेची नोकरीदेखील मिळवली.

रोज डोंबिवली फास्ट पकडायची आणि महापालिकेची शाळा गाठायची, हाच तिचा दिनक्रम बनला होता. मात्र एक दिवस मुलगी गौरवी हिला डोंबिवलीच्या यश जिमखान्यात सहज नेले आणि पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. गौरवीने पाण्यात सूर मारताच आईच्या मनातही चैतन्य निर्माण झाले आणि तिला आपले जुने दिवस आठवले. लहानपणी गावाकडच्या विहिरीत तिने वडिलांकडून पोहण्याचे धडे घेतले होते. आता मुलगीदेखील पोहण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे पाहून गीतालादेखील पुन्हा पाण्यात सूर मारण्याची इच्छा झाली. एवढेच नव्हे तर चपळाई, उत्साह आणि घरची भरभक्कम साथ यामुळे तिने रितसर पुन्हा पोहण्याचे प्रशिक्षण घेतले. 2014 साली शीव येथे झालेल्या पॅरालिम्पिंक स्पर्धेत तिने भाग घेतला. त्यानंतर गीताने मागे वळून पाहिले नाही. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अशा अनेक स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 2014 आणि 2015 साली झालेल्या इंडियन नेव्ही नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेतही नेत्रदीपक कामगिरी करत तिने सुवर्ण पदक पटकावले. याशिवाय गोवा, मालवण, गुजरात येथे झालेल्या सागरी स्पर्धेतही तिने प्रावीण्य मिळवले आहे. आजघडीला गीताकडे 25 सुवर्णपदके आहेत. पॅरा स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच उपशिक्षण अधिकारी जयश्री यादव, विभागप्रमुख आशा मोरे, मुख्याध्यापिका अनिता बैस यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळेच मी हा यशस्वी पल्ला गाठू शकले. या यशाचे खरे मानकरी माझी प्रेमळ आई व मैत्रिणीच असल्याचे गीता चौधरीने आवर्जून सांगते. गुजरातमधील गोध्रा येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिव्यांगांच्या मॅरेथॉन स्विमिंग स्पर्धेत गीता चौधरी हिने महत्त्वाची कामगिरी केली. सलग पाच दिवस रिले पद्धतीने 120 तास स्विमिंग केले. पुण्यासह राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा या राज्यांमध्ये देखील तिने नेत्रदीपक कामगिरी केली. स्विमिंगमध्ये मराठी झेंडा फडकवला. अपंगत्वावर मात करीत तिने यशाचे शिखर गाठले असून त्याचीच पोचपावती म्हणून गीताला 2017-18 सालच्या महाराष्ट्र शासनाच्या एकलव्य राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविले. हा सन्मान तिची जिद्द वाढवणारा ठरला आहे. आता तिचे पुढील लक्ष्य आहे ते इंग्लिश खाडी पार करण्याचे. या गगनभरारीसाठी तिला हवी आहे आर्थिक मदतीची साथ. परदेशातदेखील आपण हिंदुस्थानचे नाव रोशन करू, असा विश्वास गीता चौधरी हिने व्यक्त केला असून तिच्या जिद्दीला सलाम.

आपली प्रतिक्रिया द्या