
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
तमाशा, लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तमाशा कलावतीला हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल प्रथम महाराष्ट्र शास्मानाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन! गुलाबबाई संगमनेरकर हा ढोलकी तमाशाची परंपरा आणि संगीतबारी तमाशाची परंपरा यांचा कृष्णा-कोयना संगम आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांना देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर दिल्लीत लावणी सादर करण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. ‘ह्यो ह्यो ह्यो पाव्हणा बरा दिसतो मिशावाला’, ‘पाव्हणा बरा दिसतो’ अशी लावणी अदाकारीसह विठाबाईंनी राष्ट्रपतींसमोर सादर केली. त्यांच्या अस्सल बावनकशी सोन्याच्या परंपरेतले पुढचे नाव म्हणजे गुलाबबाई संगमनेरकर. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर कला सादर करण्याचे भाग्य गुलबबाईंना लाभले. गुलाबबाई नव्वदीच्या घरात गेल्या, पण त्यांच्या तना-मनातली लावणीची वेल मात्र सुकली नाही. ती सतत ताजीतवानी राहिली आहे. व्यक्तिगत आयुष्यात अनेक आघात पचवून गुलाबबाई कोमेजल्या नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे गेल्या 15-20 वर्षांतले एकही तमाशा शिबीर असे नाही ज्यात गुलाबबाईंनी तरुण मुलींना पारंपरिक तमाशाचे प्रशिक्षण दिले नाही. शासनाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिरांचा किमान पाच-सहा वेळा मी प्रत्यक्ष संचालक होतो. प्रत्येक शिबिरात गुलाबबाईंनी केवळ लावणीचे प्रशिक्षण दिले नाही, तर ढोलकी फडाच्या तमाशातील गण, गौळण, बतावणीचे प्रशिक्षण शिबिरार्थींना दिले. लोकरंग सांस्कृतिक मंच आयोजित लावणी प्रशिक्षण शिबिरात त्यांनी परदेशी मुलींना लावणी शिकविली. गुलाबबाई म्हणजे अखंड खळखळता चैतन्याचा झरा, अदाकारीतील हस्तमुद्रा, नृत्यासोबतच डोळ्यांची नजाकत हे गुलाबबाईंचे खास वैशिष्ट! ‘पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन’ ही लावणी शिकवावी तर ती गुलाबबाईंनी, ‘चंद्रवदन’ म्हणताना जणू त्याच्या मुखावर चंद्राचे तेज दिसते. ‘कसे जाता मला सोडुनि’ ‘नेसले पितांबर जरी’ या व अशा अनेक लावण्यांचा भरजरी साज त्यांच्या संग्रही आहे. बाई सुंदराबाई, गोदावरी पुणेकर, सत्यभामाबाई पंढपूरकर, यमुनाबाई वाईकर, कांताबाई सातारकर, विठाबाई नारायणगावकर, छबू शिरवळकर या श्रेष्ठ परंपरेतले एक मोठे नाव म्हणचे गुलाबबाई! वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी स्वतःला कलेत झोकून दिले. प्रारंभी राधाबाई बुधगावकर यांच्या संचात त्यांनी काम केले. बबुताई शिर्डीकर, सुगंधा सिन्नरकर, महादू नगरकर यांच्या पार्टीत तसेच ढोलकी फडाच्या तमाशात दत्तोबा तांबे शिरोलीकर, आनंदराव महाजन यांच्या ढोलकी फडाच्या तमाशात त्यांनी काम केले. कांताबाई सातारकर आणि गुलाबबाई संगमनेरकर यांचा कला प्रवास तसा समकालीनच! वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी स्वतःची पार्टी उभी केली. अनंत माने, भालजी पेंढारकर, अरुण सरनाईक, जयश्री गडकर अशी दिग्गज मंडळी गुलाबबाईंना चित्रपटात येण्याचा आग्रह करीत, पण गुलाबबाईनी तमाशाच्या कलेशी असलेलं आपलं इमान कधी सोडलं नाही.
गुलाबबाईंना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय नाटय़ विद्यालय नवी दिल्लीच्या थिएटर ऑलिम्पिकमध्ये एक ज्येष्ठ कलावंत म्हणून गुलाबबाईंची मुलाखत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी घेतली होती. गुलाबबाईंनी केवळ लावणीचे वैभव वाढविले नाही तर ढोलकी फडाच्या तमाशाचेही वैभव वाढविले. दत्तोबा तांबे शिरोलेकर या ज्येष्ठ तमाशा कलावंताकडून त्यांना अभिनयाचे धडे प्राप्त झाले. कल्पना, वर्षा या मुली आणि नंतर आपल्या नातींनाही त्यांनी आपल्या कलेचा वारसा दिला. गुलाबबाईंची निवड खरोखरच यथार्थ!




























































