
>> अक्षय शेलार
वेस्टर्नपटांचे अंतगीत आणि न्यू हॉलीवूडच्या आरंभाची नांदी ठरणारा ‘द वाइल्ड बंच’ सिनेमाने हिंसेला सौंदर्य आणि भय या दोन्ही छटांत दाखवत सिनेमाच्या भाषेला कायमचे बदलून टाकले. हिंसेच्या दृश्यभाषेत खरी क्रांती घडवण्याचे श्रेय या सिनेमाला जाते.
सॅम पेकिन्पाचा ‘द वाइल्ड बंच’ हा चित्रपट 1969मध्ये प्रदर्शित झाला आणि तक्षणी अमेरिकन वेस्टर्नपटांचा चेहरामोहरा कायमचा बदलून गेला. वरकरणी हा चित्रपट म्हणजे दरोडा घातल्यानंतर पळ काढत असलेल्या वृद्ध दरोडेखोरांचा वेस्टर्नपट आहे. परंतु, प्रत्यक्षात तो मात्र तो तत्कालीन युगामधील मृत्यू आणि हिंसा, दृश्य माध्यमातील हिंसेचे रूपांतर आणि अमेरिकन पुरुषत्वाच्या विघटनाचं द्योतक आहे. न्यू हॉलीवूडचा, विशेषत त्यातल्या हिंसेच्या उदयाचे उदाहरण म्हणून जरी आपण ‘बॉनी अँड क्लाइड’ आणि ‘इझी रायडर’ या चित्रपटांकडे पाहत असलो असला, तरी हिंसेच्या दृश्यभाषेत खरी क्रांती घडवण्याचं श्रेय ‘द वाइल्ड बंच’कडे जातं. या चित्रपटाशिवाय न्यू हॉलिवूडची सौंदर्यदृष्टी पूर्णत्वास जात नाही.
क्लासिक वेस्टर्नपटांमध्ये हिंसा असायची, पण ती शिस्तबद्ध, नैतिक चौकटीत बांधलेली असे. ही चौकट केवळ आशयात्मक नसायची, तर दृश्य स्तरावरही ठळकपणे दिसायची. नायक गोळी झाडतो आणि खलनायक खाली कोसळतो इतक्या स्पष्ट आणि जवळजवळ निर्जीव पद्धतीने. पेकिन्पाने ही पद्धतच मोडून काढली. त्याने हिंसेतला रक्तपात, वेदना, निष्काळजीपणा आणि गोंधळ असं सारं सिनेमात आणलं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या बँक दरोडय़ाच्या प्रसंगात आणि विशेषत शेवटच्या लांबलचक गोळीबारात त्याने गोळी शरीरात शिरताना, मांस फाटताना, रक्त उडताना दाखवलं. हे तपशील हिंसेला ‘ग्लॅमरस’ बनवत नाहीत, तर अस्वस्थ करणारी बनवतात.
यात एक महत्त्वाचा विरोधाभास आहे. पेकिन्पा हिंसेचा निषेध करतो की तिला काव्यात्म बनवतो? या प्रश्नावर दशकानुदशकं चर्चा झाली आहे. कारण, स्लो-मोशनमध्ये टिपलेली रक्ताची अक्षरश उधळण दृश्यात्मकदृष्टय़ा आकर्षकही वाटू शकते. पण, त्याच वेळी ती दीर्घकाळ टिकणारी वेदना दाखवते. गोळी लागलेला देह केवळ कोसळून तात्काळ मरण पावत नाही, तर खूप काळ तडफडत राहतो. प्रेक्षकाला हिंसेचा ‘परिणाम’ पाहायला भाग पाडलं जातं. तत्पूर्वी हिंसेचा असा ‘रिअल टाइम’मध्ये जाणवणारा परिणाम दृश्य रुपात दिसला नव्हता.
चित्रपटातील पात्रं पहा. पाइक बिशप (विल्यम होल्डन) आणि त्याची टोळी म्हणजे वयोवृद्ध, कालबाह्य झालेली माणसं आहेत. रेल्वे, मशीनगन्स, औद्योगिक भांडवलशाही या नव्या जगात त्यांच्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे त्यांची हिंसा ही केवळ जगण्यासाठी नाही, तर अस्तित्वाच्या अखेरच्या प्रतिकारासाठी आहे. ते कुठल्याही अर्थाने ‘नायक‘ नाहीत. ते एका कुजत, मरत चाललेल्या युगाचे अवशेष आहेत. न्यू हॉलिवूडमधील अँटी-हिरोची सुरुवात ती हीच. नैतिकदृष्टय़ा धूसर, ‘स्व’च्या शोधात भरकटलेली पात्र व तरीही पुरेपूर मानवीपणा ही इथल्या टोळीची काही ठळक वैशिष्टय़ं.
इथे अकिरा कुरोसावाच्या ‘द सेव्हन सामुराई’ (1954) या चित्रपटाची आठवण आल्यावाचून राहवत नाही. दृश्य भाषेवर कुरोसावाचा प्रभाव लख्खपणे जाणवतो. स्लो-मोशनमधील गतिशीलता, हिंसेतला तपशील आणि पडसाद शक्य तितक्या विस्तृत पद्धतीने दाखवणं या गोष्टी तिथूनच येतात. पेकिन्पाच्या संकलनशैलीने हिंसेला एक तुटक, विस्कळीत लय दिली. वेगवान कट्स आणि स्लो-मोशन यांचा संगम, विविध कॅमेऱयांनी एकाच प्रसंगाचं चित्रण या तंत्रांनी गोळीबाराला जणू तपशिलात रचलेल्या नृत्यासारखं बनवलं. पुढे जाऊन जॉन वू, क्वेंटिन टॅरन्टिनो, रॉबर्ट रॉड्रिग्ज यांसारख्या दिग्दर्शकांनी या शैलीचा प्रभाव स्वीकारला. त्यामुळेच नव्वदोत्तर हॉलिवूडमध्ये किंवा समकालीन हिंसक थ्रिलर्समध्ये आपण जी शैलीबद्ध हिंसा पाहतो, तिची बीजं ‘द वाइल्ड बंच’मध्ये सापडतात.
या चित्रपटावर टीकाही झाली. काही समीक्षकांनी त्याला ‘अतिरक्तरंजित’ म्हटलं; तर काहींनी तो हिंसेचं सौंदर्यीकरण करतो असा आरोप केला. मात्र, या टीकेच्या पलीकडे जाऊन पाहिलं, तर ‘द वाइल्ड बंच’ हिंसेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे मानवी असामर्थ्य दाखवतो. शेवटच्या दृश्यात पाइक आणि त्याची टोळी जाणीवपूर्वक मृत्यूच्या दिशेने चालत जातात. तो क्षण आत्मविनाशक, आत्मघातकी असला तरी ती एक स्तुसत्य नैतिक निवडही आहे. (‘शोले’मधील अमिताभच्या जयचा निर्णय आठवून पहा की!) त्यांनी पैशासाठी नव्हे, तर निष्ठेसाठी गोळ्यांचा वर्षाव स्वीकारला. या निर्णयात रोमँटिसिझम नक्कीच आहे. विल्यम होल्डन आणि रॉबर्ट रायन यांच्यासारख्या जुन्या पिढीतील कलाकारांनी ‘द वाइल्ड बंच’मधील ‘वेस्टर्न युगाच्या समाप्तीची’ भावना अधिक अधोरेखित केली. त्यामुळे इथे हा रोमँटिसिझमही आवडून जाते. कारण, हा सिनेमा म्हणजे वेस्टर्नपटांचे अंतगीत आहे आणि न्यू हॉलिवूडच्या आरंभाची नांदी आहे. त्यात जुन्या मिथकांचा मृत्यू आहे आणि नव्या, रक्तरंजित वास्तवाची जाणीव आहे.
आजच्या संदर्भात ‘द वाइल्ड बंच’कडे पाहिलं तर तो केवळ 1969चा चित्रपट बनून राहत नाही. आजही अमेरिकन सिनेमात हिंसा मोठय़ा प्रमाणावर आहे. सुपरहिरो चित्रपटांपासून ते गुन्हेपटांपर्यंत सर्वत्र हिंसा आढळते. हिंदी सिनेमातही हिंसा दाखवणारे अनेक ‘धुरंधर’ आपल्याला आढळतील. मात्र, या ‘वाइल्ड बंच’पुढे ते सारे फिके पडतील, हेही तितकेच खरे!




























































