
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
स्वातंत्र्याकरिता सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले सर्वस्व राष्ट्राला झुगारून दिले, त्यांना ‘क्षमायाचक’ कसे म्हणता येईल? त्यांच्यावर तसे आरोप करणाऱयांनी स्व. इंदिराजींनी 1966 साली स्वातंत्र्यवीरांना वाहिलेली श्रद्धांजली नक्की पाहावी. ती पुरेशी बोलकी आहे. ”His name was a byword for daring and patriotism. He was cast in the mould of a classical revolutionary and countless people drew inspiration from him.”
कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडन मुक्कामी म्हणजे ‘वाघाच्या गुहेत’ गेल्यानंतरही विनायक दामोदर सावरकर या ‘बॅरिस्टर’ने मातृभूमीचे पांग फेडायचाच वसा घेतला. आप्तजनांपासून अकरा वर्षे हालअपेष्टा सोसत ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा तेरा वर्षे नजरकैदेत ठेवले ते 1937 पर्यंत. अट होती, ‘रत्नागिरी सोडायची नाही व राजकीय हालचाली बंद.’ स्वातंत्र्याच्या दहा वर्षे आधी त्यांची सुटका करण्यात आली. अर्थात धूर्त ब्रिटिशांनी स्वा. सावरकरांना सोडले ते हिंदुस्थानची फाळणी शक्य व्हावी म्हणून. कारण सावरकर फाळणीला विरोध करणार हे ब्रिटिश ओळखून होते. आज ज्याप्रमाणे मताच्या जोगव्याकरिता ‘लबाड राजकारणी’ हुतात्म्यांचे चारित्र्यहनन करतात तसेच ते घाणरडे राजकारण होते.
अंदमानमध्ये काळय़ा पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांना राजकीय कैद्याला मिळणाऱया सवलतीसुद्धा नाकारण्यात आल्या. अन्न, वैद्यकीय मदत, प्रसाधनसेवा या मूलभूत सुविधा त्यांना नाकारण्यात आल्या होत्या. Fugitive and Offenders Act, जो राजकीय कैद्याकरिता नसतो, तो त्यांना लावण्यात आला. त्यांना ‘D’ कैदी म्हणत. कदान्न सेवन करणार नाही. ब्रिटिश गृहखात्याचा एक अधिकारी कॅड्डोक रेजीनाल्ड याने सावरकर, बारीन घोष, नंदगोपाळ, हृशिकेश कांजीलाल, सुधीरकुमार सरकार यांचे तुरुंगात गाऱहाणे ऐकून ‘एक पिटीशन (दयाअर्ज नाही) सरकारला सुपूर्द करा’ असे सुचवले. वीर तात्यारावांनी पिटीशन भरले नाही, परंतु इतरांनी ते भरून सुटका करून घेण्यास सुचवले व त्यांना आपण सर्वोतोपरी कायदेशीर मदत करू असे वचन दिले. तात्यारावांच्या सल्ल्यानुसार बऱ्याच जणांनी सुटका करून घेतली. त्यात एक ‘काकोरी’ प्रकरणातला क्रांतिकारक सचींद्रनाथ संन्याल हा हुतात्मा होता. ही शहादत नव्हती तर ‘हौतात्म्य’ होते.
स्वा. सावरकरांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण ऊर्फ बाळाराव ‘असेच पिटीशन भरून पाठवू का?’ असे गांधीजींना विचारण्यास गेले तेव्हा गांधीजींनी ‘मी शिफारस करेन’ असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे बाळारावांनीसुद्धा क्षमायाचना न करता ब्रिटिश सरकारला सुनावले, ‘खुनी, बलात्कारी, दरोडेखोर यांना सोडता येते तर राजकीय पुढारी, विशिष्ट वर्गातील कैदी (Special Class Prisoners) आहेत अशा विनायक ऊर्फ तात्यारावांना का सोडता येत नाही? हा प्रयत्न बाळारावांनी ‘भाला’कार ल. ग. भोपटकर (विधीज्ञ व ‘भाला’ वृत्तपत्राचे संपादक) यांच्या मदतीने केला. मात्र ब्रिटिश सरकारने सुटका तर केलीच नाही उलट आप्तेष्टांना पत्रव्यवहार, भेट, वाचनालय, पेपरवाचन या इतर तत्सम सुविधाही तात्यारावांना अव्हेरण्यात आल्या. ब्रिटिश सरकार सावरकरांना सामान्य गुन्हेगार मानत होते. त्याच काळात नगर, विसापूरमधील राजकीय कैद्यांचे मात्र हिंदुस्थानात लाड पुरवून त्यांची बडदास्त ठेवत होते.
1914 च्या पिटीशनमध्ये स्वतः सावरकरांनी लिहिले होते, ‘मी कोणतेही खास अधिकार क्षमायाचना म्हणून, सवलत म्हणून मागत नसून मी एक राजकीय कैदी म्हणून हक्काने मागत आहे, तो माझा अधिकार आहे. जे कुठल्याही स्वतंत्र राष्ट्राने मानले पाहिजेत.’ त्यांच्या या पिटीशनमधील शेवटचे वाक्य महत्त्वाचे आहे. ते म्हणतात ‘The mighty alone can offord to be merciful and therefore where else can the prodigal Son return but to the parental doors of the Government’. यातील mighty या शब्दाचा ‘शब्दकोशी’ अर्थ (Biblical) लावून हिंदुत्व विरोधी सावरकरांना अपमानीत करू इच्छितात. हा तुष्टीकरणाचा व शुद्र मनोवृत्तीचा खास नमुना आहे. ही क्षमायाचना नव्हती तर वीर तात्यारावांनी ब्रिटिशांना सुनावलेली भाषा व चपराक होती.
सावरकरांनी माफी मागण्याचा प्रश्न येतो कुठे? स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास एक-दोन घराण्यांच्याच भोवती अवगुंठीत करून विशिष्ट लोकांचे तुष्टीकरण करण्यासाठी फक्त हा अट्टहास आहे. दुसऱया महायुद्धात ब्रिटन जर्जर झाले, डबघाईला आले होते. 1919-20 मध्ये जालीयनवाला बागमुळे हिंदुस्थान पेटला होता. 1942-43 साली रॉयल इंडियन नेव्हीत बंडाळी माजली होती. अशा अनेक कारणांमुळे ‘I missed train’ म्हणणाऱया ब्रिटीश पंतप्रधान चेंबरलेन यांना जड अंतःकरणाने ‘आता हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यावेच लागणार’ हे पार्लमेंटमध्ये जाहीर करावे लागले. दुसऱया महायुद्धानंतर बादशहा पंचम जॉर्ज यांच्या राजकीय आज्ञेमुळे राजकीय कैद्यांना हिंदुस्थानात ‘दयाळू’ सरकारला सोडावे लागले. अर्थात जे माऊंटबॅटनचे लाडके होते त्यांनाच याचा लाभ झाला. सावरकरांना मात्र 6 जानेवारी 1924 पासून 1937 सालापर्यंत ‘नजरकैद व निरीक्षण’ (Home arest and survilliance) तसेच राजकारणात भाग घेणे नाही या अटींवर मोकळे केले.
स्वातंत्र्यवीरांच्या सल्ल्याने पुढेही तुरुंगात सत्याग्रह, उठाव होत राहिले. 13 सप्टेंबर 1929 या दिवशी अन्नत्याग करून क्रांतिकारक जनिंद्रनाथ दास याने प्राण सोडले, त्याच्यावर अन्नसेवन करण्यासाठी अनन्वीत अत्याचार करण्यात आले. नेताजी सुभाष यांना हिंदुस्थानाबाहेर जाऊन ‘आझाद हिंद सेना’ उभे करण्याची प्रेरणा विनायक दामोदर सावरकर यांचीच होती. हे स्वतः लोकनायक सुभाषबाबूंनी ‘कोहिमा’ येथून आकाशवाणीवरील भाषणातून आदरपूर्वक कबूल केले. तात्यारावांनी कुणाचाही उपमर्द केला नाही, द्वेष केला नाही.
खरे तर सावरकर ‘बॉम्ब बनवतात, तुरुंगात उत्पात करतात’ हे आरोप किती खरे व किती खोटे आहेत हे पाहण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश गृहखात्याचा आधिकारी रेजीनॉल्ड एच. क्रॅड्डोक तात्याराव व इतर क्रांतिकारकांना ‘माफी मागा’ ही पुडी सोडून गेला. तीच पुडी सावरकरद्वेष्टे आज अधून-मधून सोडतात. या क्रॅड्डोकने जो अहवाल तत्कालीन ब्रिटीश गृहखात्याला व मंत्री, भारत विभाग यांना दिला तो पहा- ‘Savarkar was defiant in the interview and said – cannot be said to express any regret or repentance for his revolutionary act. सावरकर हे त्यांच्या क्रांतिकारी कृत्यांचा, ‘पश्चात्ताप’ मानण्यास तयार नाहीत हे सत्य आहे हा ब्रिटीश अंमलदाराचा अहवाल आहे आणि हिंदुस्थानी पुढारी मात्र म्हणतात, ‘माफी मागितली.’ स्वा. सावरकर स्वतः म्हणतात की, ‘सरकारला मला एकटय़ालाच सोडायचे हे मानवतेच्या भावनेतून करावयाचे असेल तर माझे नाव सुटणाऱयांच्या यादीतून वगळावे व इतर सर्व कैद्यांना सोडून द्यावे. त्यातच मला आनंद आहे.’ (If the government things that it is only to effect my own release that i pen this, or if my name canstitutes the chief abstacle in the granting of such an amnesty, then let the government ornit my name in their amnestly and release all the rest, that would give me go great a satisfaction as my own release would do.)
नागपूरला वीर तात्यारावांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला एक महान सेनापती आले होते. तेव्हा खासदार हेडाऊ यांनी चबुतऱयावरून उडी मारली होती. त्यावेळी हे महान सेनापती म्हणजे फिल्ड मार्शल सॅम बहाद्दूर माणेकशा उद्गारले होते, ‘एका महान स्वातंत्र्य सेनानीचा पुतळा उद्घाटित करण्यात बहुमान मिळाल्याने मी भरून पावलो. धन्य झालो.’
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)
[email protected]























































