नोंद – उतराई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश काकर्णी

असं का झालं या प्रश्नाचं नेहमीच उत्तर देता येतं असं नाही. सगळं अनाकलनीय.

काही पुस्तकांच्या बाबतीत असंच काही दिसतं. ज्यांनी अनेक लेखकांची पुस्तक प्रकाशित केली, ते लेखक नावारूपाला आले. ती सगळी हकीगत त्या प्रकाशकाने या गोष्टीला ऐतिहासिक महत्त्व आहे हे ओळखून लिहून काढले. स्वतच्या छोटीशा मासिकात ते प्रसिद्धही झालं, पण या सगळ्याला वेळ झाला होता आणि एकदा का वेळ चुकली की सगळा गुंता होतो.

हे सगळं वा. वि. भट यांचं आत्मचरित्र ‘माझी प्रकाशन परिक्रमा’ याबाबत जे काही घडलं, घडत गेलं त्यासंदर्भात मी म्हणतोय.

उशिरा का होईना अभिनव प्रकाशानाच्या वा. वि. भटांनी आपल्या प्रकाशनाची कहाणी त्यांच्या स्वभाव धर्माप्रमाणे मोठ्या संयतपणे सांगितली, पण पुढे वयोमानाप्रमाणे आणि पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेल्याने हे काम मागे पडले. पण जे काही आहे तेदेखील महत्त्वाचे आहे. त्यावर थोडे संपादकीय संस्कार करून ते प्रकाशित व्हायला हवे यासाठी मी कुणाकुणाला शब्द टाकत बसलो.

अखेर एकदा शलाका प्रकाशनच्या बाळ देसाई यांनी ही जबाबदारी घेतली. पुस्तकाची प्रुफ पण निघण्यापर्यंत हळूहळू का होईना प्रगती होत गेली. आता प्रिंटिंग काय ते करायचे राहिले होते, पण बाळ देसाई यांची प्रकृती इतकी बिघडली की, ते अंथरुणाला खिळून राहिले आणि एक दिवशी मोठ्या दुःखद अंतकरणाने त्यांनी माझ्याकडे हे सगळे बाड देत म्हटलं, “रविप्रकाश, सॉरी आता माझ्याने हे काम होणार नाही.”

परत पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले आणि एक दिवशी लक्षात आलं की, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर प्रकाशन व्यवसायात आले ते वा. वि. भट यांच्यामुळे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते पुस्तक प्रदर्शन लावत होते. इतरांची पुस्तके विकत होते. त्यांचे ते कसब पाहून या तरुण मुलाला भट म्हणाले, “तू केवळ पुस्तक विकत बसण्यापेक्षा प्रकाशकदेखील हो.”

“मला त्यातलं काहीही समजत नाही. मग मी प्रकाशन कसं सुरू करणार?” तरुण अरविंद म्हणाला.

“त्याची तू काळजी करू नकोस. मी सगळ करून देतो. मग तर झालं?” भट म्हणाले.

ही मदत किती असावी? तर लेखकाचं पुस्तक निवडणं. अलिबागला जोशींकडून छापून घेणं आणि सर्वात शेवटी सगळी संपूर्ण पुस्तक करून त्यांनी अरविंद पाटकर यांच्या ताब्यात दिली.

असं उदाहरण प्रकाशन व्यवसायात शोधून सापडणार नाही. काम वा .वि. भटांचं, पण नाव लागलं अरविंद पाटकरांच्या मनोविकास प्रकाशनाचं. हे पुस्तक होतं अण्णाभाऊ साठे यांच्या रचनांचं. त्याचं नाव होतं- ‘शाहीर.’

भटांनी अरविंदला सुयोग्य रस्ता दाखवला आणि हुशार पाटकर यांनी बघता बघता तेथे आपलं बस्तान बसवलं. मनोविकास प्रकाशन प्रस्थापित झालं. त्यामुळेच पाटकर यांनी हे श्रेय गुरुपद वा. वि. भटांना दिलं.

हे लक्षात घेऊन मी भटांचं आत्मचरित्र बाड पाटकर यांना देत म्हटलं, “तुमच्या गुरूंचं ऋण अल्पसं फेडण्याकरिता तुम्ही हे प्रकाशित करायचं.”

त्याक्षणी पाटकर म्हणाले, “केलं!”

पण या ना त्या कारणाने पुस्तक मात्र येत नव्हतं.

मी मात्र दरवेळी म्हणत राहिलो, “पाटकर भटांच्या आत्मचरित्राचं काय झालं?”

आणि पाटकरदेखील, “हो, माझ्या लक्षात आहे. गुरू ऋणातून उतराई होण्यासाठी हे मी करणारच.”

हे असं 15 एक वर्ष चाललं. कारणं अनेक. मग एका शुभक्षणी भटांच्या मुलीने रोहिणी भट-साहनी यांनी नेट लावला. आमच्या सल्लामसलती झाल्या. कुमार केतकर यांची पुस्तकाला प्रस्तावना घेऊन झाली. एकदाचे पुस्तक तयार झाले. पुस्तकाचे प्रकाशन करायचे ठरले. त्या समारंभात या पुस्तकाचा प्रवास मी सांगायचे ठरले, पण कुमार केतकर यांच्या व्यस्ततेमुळे त्यांची तारीख मिळेना आणि या अनिश्चित काळात बातमी आली, अरविंद पाटकर हृदयविकाराच्या धक्क्याने गेले!

धक्काच होता तो.

पण त्याक्षणी मी म्हटलं, “पाटकरांनी शब्द पाळला. हे समाधान त्यांना लाभले असेल.”

एखाद्या पुस्तकाची कशी फरफट होते, त्याला हर्ष व खेद जोडून कसे येतात त्याचेच हे एक दुर्मिळ उदाहरण.