मुद्दा – स्वातंत्र्यवीर सावरकर हे भगतसिंगांचे प्रेरणास्थान! 

2483

>> विनित शंकर मासावकर

क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारकांना प्रेरणादायी होते. अखंड हिंदुस्थानच्या सशस्त्र स्वातंत्र्यसंग्रामातील अस्पृश्यता-जातीभेदाविरोधी लढय़ातील अग्रणी, प्रखर राष्ट्रभक्त, हिंदू संघटक, हिंदुहृदयसम्राट, इतिहासकार, महाकवी, लेखक, साहित्यिक, नाटककार, ज्वलंत पत्रकार, बुद्धिप्रामाण्यवादी,  तेजस्वी विज्ञानवाद असे अनेक पैलू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात होते. भगतसिंग यांचेही प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर होते.

‘1857चे स्वातंत्र्यसमर’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ग्रंथ भगतसिंगांचे प्रेरणास्थान. या ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर भगतसिंग यांनी केले. सावरकरांसारखा लेखक आणि भगतसिंगांसारखा प्रकाशक. पुढे सावरकरांसारखा लेखक, देशगौरव सुभाषचंद्रांसारखा प्रकाशक. आणखी पुढे सावरकरांसारखा लेखक आणि आचार्य अत्रे यांच्यासारखा प्रस्तावक म्हणजे प्रस्तावना लिहिणारे असे या ग्रंथाचे माहात्म्य. या ग्रंथाने सांगितले की, 1857 च्या युद्धात कमळ आणि भाकरी यांच्या माध्यमातून सशस्त्र संघर्षाचे निरोप गेले. कमळाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि भाकरीचे तत्त्वज्ञान सांगणारे यांचे सहकार्य झाले तर धनसत्ता म्हणजे आर्थिक साम्राज्यशाही आणि सांस्कृतिक आक्रमणे यांचा सामना करता येईल, असे लेखक डॉ. वि. स. जोग यांनी ‘शहिदे आझम भगतसिंग’ या चरित्रग्रंथात मांडले आहे.

23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश राजसत्तेने भगतसिंग यांना फाशी दिली. ती बातमी ऐकून सावरकरांना अतोनात दुःख झाले, पण त्यासाठी रडत न बसता या फाशीचा सूड घ्यावा असे ते आपल्या अंतस्थ गोटातील तरुणांना सांगत होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे या तरुण गटाने भगतसिंगांच्या फाशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पोलीस सावध होण्यापूर्वीच गावातून प्रभातफेरी काढली. त्यासाठी सावरकरांनी एक गीत रचून दिले. हे गीत म्हणत भगतसिंग नि स्वातंत्र्यलक्ष्मी यांचा जयजयकार करीत त्या तरुण गटाने रत्नागिरी दणाणून सोडली. पोलीस जागे होण्यापूर्वीच ते तरुण पांगले. हा होता सावरकरी क्रांतीचा शिवप्रभूने शिकवलेला गनिमी मार्ग.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले गीत 

हा भगतसिंग! हाय हा!

जाशि आजी, फाशि आम्हांस्तवचि वीरा,

हाय हा !

राजगुरू तू, हाय हा!

राष्ट्रसमरी, वीर कुमारा, पडसि झुंजत,

हाय हा!

जयजय अहा!

हाय हायचि आजची,

अुदयीकच्या जिंकी जया।।

राजमुकुटा तो धरी

मृत्युच्या मुकुटासि आधी बांधि

जो जन निजशिरी! 

शस्त्र धरूचि अम्हि स्वतः

धरुनि जें तूं समरिं शत्रूसि

मरसि मारित मारता!

अधम तरि तो कोणता?

हेतूच्या तव वीरतेची

जो न वंदिल शुद्धता।।

जा हुतात्म्यांनो, अहा!

साक्ष ठेवूनि शपथ घेतो

आम्ही अुरलो ते पहा।।

शस्त्रसंगर चंड हा

झुंजवुनि की, जिंकुची

स्वातंत्र्यविजयाशी पहा! 

हा भगतसिंग, हाय हा!

भगत सिंगांचा विजय असो…

स्वातंत्र्य लक्ष्मीचा विजय असो!! 

(संदर्भ  समग्र सावरकर खंड 7)

स्वातंत्रवीर सावरकर हे विश्वरत्न आहेत. इतिहासाची पाने उलगडल्यास त्याची प्रचीती येते. त्यांचे विचार कालातीत आहेत. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत हे लक्षात असू द्या !

आपली प्रतिक्रिया द्या