थंडीत वाढतंय वजन…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळा या ऋतूत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. बदलत्या वातावरणामुळे जास्त भूक लागायलादेखील सुरुवात होते. त्यामुळे वजन वाढते. भाज्या आणि फळे थंडीमध्ये मिळणारे लाल गाजर आणि इतर भाज्या हे पौष्टिक असतेच, पण त्याचबरोबर आपले थंडीपासून रक्षणही करते. थंडीत सर्दी, खोकला, फ्लू या आजारांना भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते. या दिवसांत भाज्या आणि फळे छान आणि स्वस्त असतात. त्यामुळे भरपूर भाज्या, विशेषकरून गरमागरम घरी केलेले आरोग्यदायी सूप प्या. ताजी फळे खा. पेरू, संत्री, बोर, स्ट्रॉबेरी यांचा आस्वाद घ्या. संत्र्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. प्रतिकारशक्ती वाढते. या दिवसांत मिळणारी फळे खावीत. कोशिंबीर, भाज्यांच्या स्मुदी घ्यायला हरकत नाही. हिरव्या भाज्यांमधील ‘अ’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे थंडीत लाभदायी ठरतात.

हिवाळ्यात सतत काहीतरी खावेसे वाटणे, गोड आणि चमचमीत पदार्थ खावेसे वाटणे, गरम गरम पदार्थ खावेसे वाटणे असे होते. त्यात हिवाळय़ाचे विशेष पदार्थ असतात. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, गुळपापडी, गाजर हलवा, तिळाच्या वडय़ा, गुळाची पोळी अशा पौष्टिक पदार्थांची रेलचेल असते. कधी कधी सकाळी थंडीत व्यायामाला उठायचा पंटाळा येतो. हिवाळय़ात आपल्या शरीरात पण खूप बदल होत असतात. पचनशक्ती चांगली होते, पण त्वचा कोरडी पडते, तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात पाणी गरजेपेक्षा कमी जाते.

वजनाचा विचार करताना पाणी जास्त पिणे, योग्य आहार, व्यायाम महत्त्वाचे असते. थंडीमध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर ऊर्जा जास्त वापरते. त्यामुळे आपल्याला भूक खूप लागते आणि आपण समोर दिसेल ते खातो. आपण खात आहोत ते योग्य आहे की अयोग्य याचा विचार करत नाही.

ग्रीन टीचे सेवन
हवेत गारवा असल्यामुळे मस्त गरम गरम चहा सगळ्यांनाच प्यावासा वाटतो, पण दुधात होणारी भेसळ, त्यात येणारी साखर यामुळे सतत दूधसाखरेचा चहा तसा आपल्या शरीरास हानीकारक आहे. तो घ्यायचा असेल तर एकदोन वेळा घ्या, पण गरम गरम प्यावंसं वाटलं तर आपण जर ग्रीन टी घेतला तर खूपच छान. कारण या चहात ऑण्टिऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे अनेक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला ऑण्टिऑक्सिडेंटस् मदत करतात. ग्रीन टी आवडत नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वापरून, जसे की गवती चहा, आले, दालचिनी, मिरी, तुळशी असे काही वापरून आपल्या आवडीचा काढा बनवून गरमागरम पिऊ शकतो. हळदीचा चहादेखील चांगला लागतो.
 गोड पदार्थ, शीतपेय यांचे सेवन टाळा. कारण शीतपेयामुळे आपला घसा खराब होऊ शकतो आणि आपली गोडाने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
 तेलकट पदार्थ आणि उघडय़ावरचे अन्न शक्यतो टाळावे.
 बाजरीची भाकरी, हुरडा, तूप, लोणी, चटण्या, आवळा, ताज्या आवळ्याचा रस, ओल्या हळदीचे लोणचे यांचे आवर्जून सेवन करावे.
 रात्री हलका आहार ठेवा. रात्री गरमागरम दलिया, खिचडी खाऊ शकता किंवा भरपूर भाज्या घालून ओट्सदेखील खाऊ शकता. भरड धान्य आणि भाज्या घालूनही खिचडी करता येते.
 तहान लागत नाही म्हणून पाणी पिणे टाळू नका. पाणी भरपूर पिणे आणि रोज नियमित व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

अर्चना रायरीकर, आहारतज्ञ