
>> दिलीप ठाकूर
अन्य राज्यांतील महाराष्ट्रीयन आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीने ठसा उमटवत असतानाच महाराष्ट्रातील समव्यावसायिकाशी संबंध जोडतात, मैत्रीचे नाते निर्माण करतात आणि त्यातून मराठीतील काही चांगल्या गोष्टी अन्य राज्यांत नेतात ही एक काwतुकास्पद गोष्ट आहे. कर्नाटकातील नाटय़ व चित्रपट क्षेत्रातील लेखक व कलाकार यशवंत सरदेशपांडे असेच होते. म्हणून तर त्यांच्या निधनाच्या धक्कादायक वृत्ताने मराठी नाटय़सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली. यशवंत सरदेशपांडे हे अखेरपर्यंत कार्यरत होते. इतके की महिनाभरापूर्वीच मुंबईत आले असता त्यांनी काही मराठी कलाकारांशी एका मराठी चित्रपटाच्या जडणघडणीबाबत चर्चा केली. इतकेच नव्हे तर 28 सप्टेंबर रोजी धारवाड येथे त्यांनी एक नाट्य प्रयोगही केला आणि 29 सप्टेंबर रोजी बंगलोर येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले. पण तेथे त्यांचे वयाच्या 62व्या वर्षी दुर्दैवाने निधन झाले. यशवंत सरदेशपांडे यांनी मराठीतील तीन नाटके कानडीमध्ये भाषांतरीत केली. साखर खाल्लेला माणूस, ऐश्वर्या ब्युटी पार्लर आणि नेटवर्क 24×7 ही ती नाटके होत. नाटक लिहिलं की वाचायला पाठवा असं न म्हणता हा माणूस नाटक वाचायला थेट कोल्हापूरला लेखक विद्यासागर अध्यापक यांच्या घरी हजर व्हायचा. यशवंत सरदेशपांडे यांचे कानडी नाटय़ क्षेत्र आणि चित्रपट क्षेत्रातले खूप मोठं कर्तृत्व असूनही नवीन कलाकाराबरोबर मैत्रीच्याच नात्याने ते कायम वागत राहिले. नवीन पिढीशी ते जोडलेले राहिले. यशवंत सरदेशपांडे यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिह्यातील बसवाना बागेवाडी तालुक्यातील उक्काली गावातील. मराठी व कानडी नाटक आणि चित्रपटाची विशेष आवड. वयात येताच त्यांनी कर्नाटकातील हेग्गूडू येथील निनासम थिएटर इन्स्टिटय़ूट येथे नाटय़ कलेत पदवी प्राप्त केली. 1996 साली न्यूयॉर्क येथे चित्रपट निर्मितीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची भाषाशैली उत्तर कर्नाटकातील होती. त्याचा अभिनयासाठी उत्तम उपयोग करीत त्यांनी तब्बल साठ नाटकांतून भूमिका साकारल्या. काहींचे लेखनही केले. त्यातील ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातील शिमोग्याचा नाग्या सरदार खूपच लोकप्रिय झाला. याशिवाय त्यांनी ओलावे जीवन, सशक्तकरा, औंडा आपाडू इत्यादी अनेक नाटपं व रामा शमा भावा, अमृत धारा अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या? कामाचा आनंद घेत घेत वाटचाल करणे हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात आर्यभट्ट पुरस्कार (2003), अभिनय भारती पुरस्कार (2008), कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार (2010) इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो.