दुःखावर मात केली तरच सुखाची प्राप्ती

452

>> ह.भ.प. गुरुनाथ महाराज

परमार्थाची मूळ निर्मिती आनंदापासून झाली आहे. आपण आनंदी राहून इतरांना आनंदी राहण्यास सहाय्य होणे हाच शाश्वत परमार्थ. आपलं सारं जीवन ईश्वराचे देणे आहे, परंतु ‘मी’च्या अहंकारामुळे ईश्वर दुरावला आहे. ज्याची स्वार्थभावना जळून गेलेली असते, तो समत्वदृष्टीने साऱया जगाकडे पाहत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचा मोहपाश बाधू शकत नाही. तोच खरा साधू, तोच खरा संत! मानवाच्या आयुष्याचा प्याला नियतीने दुःखाने भरून ठेवलेला आहे. दारिद्रय़ पाठीशी हात धुऊन मागे लागले आहे. जीवन दुःखमय आहे हे सांगायला कोणा तत्त्ववेत्त्याची जरुरी नाही, पण त्यासाठी हे सारं सहन करून वाटचाल केल्यास सुख निश्चित मिळेल.

सोंगे छंदे काही! देव जोडे ऐंसे नाही!… आयुष्याची व्याख्या ही खूप सुंदर व विचारशील आहे. आपले काम चोख व नीटनेटकेपणाने करणे हाच परमार्थाचा मुख्य गाभा आहे. इतरांना लुबाडून स्वार्थ साधणे हा परमार्थ नव्हे! त्यांचे आशीर्वाद घेणे हा खरा परमार्थ आहे. लुबाडून घेतलेला पैसा देवस्थानांना दान करणे हा तर परमार्थ नाहीच नाही. अनीतीचा व्यवहार करून मायापुंजी जमविणे व त्यांतून लोकांना त्रासदायक कृत्ये करणे यामुळे खरोखरच देशाचे वाळवंट झाले आहे… एका अभंगात संत तुकोबा म्हणतात, ‘विचार नाही नर खर तो तैसा! वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा…, जो मनुष्य आत्मानात्म विचारशून्य आहे तो गाढवाप्रमाणेच होय. त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान जरी असले तरी, तो एखाद्या लगड वाहणाऱया बैलाच्या पाठीवर भार असल्याप्रमाणे होय.

आपलं प्रत्येक कर्म नीट चोखटपणे बजावणे हाच परमार्थाचा मूळ स्रोत आहे. तेथूनच आपल्या पारमार्थिक उन्नतीला खरी सुरुवात होईल… एका संस्कृत श्लोकात म्हटले आहे- ‘‘सर्वत्र सुखिन संतोः, सर्वे संतोः निरामय!’’ हाच खरा परमार्थ आहे.

प्रत्येक वेळी जर आपल्या कृत्यातून नैसर्गिक संपत्तीची हानी होत असेल तर आपण खरोखरच पारमार्थिक नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सर्व तत्त्वे जेथे एकवटली आहेत तेच मानवाचं, निसर्गाचं मूळ स्वरूप आहे. ज्या ज्या वेळी या तत्त्वांना घातक कृत्य आपण करतो त्या वेळी आपण खऱया परमार्थाला पारखे होतो. मग मी पारमार्थिक आहे हा देखावाच उरतो. परमार्थाची मूळ निर्मिती आनंदापासून झाली आहे. आपण आनंदी राहून इतरांना आनंदी राहण्यास सहाय्य होणे हाच शाश्वत परमार्थ.

आपलं सारं जीवन ईश्वराचे देणे आहे, परंतु ‘मी’च्या अहंकारामुळे ईश्वर दुरावला आहे. ज्याची स्वार्थभावना जळून गेलेली असते, तो समत्वदृष्टीने साऱ्या जगाकडे पाहत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचा मोहपाश बाधू शकत नाही. तोच खरा साधू, तोच खरा संत! आज लोभ आणि मोह, संपत्तीचे पेव फुटले आहे. भली भली समजणारी माणसे द्रव्यासाठी पवित्र मूल्यांचा बिनदिक्कपणे बळी देत आहेत. मोह आणि आशा हा कळीकाळाचा फासा आहे. आपल्या लोभाला अंत नसतो. घरदार, तऱहेतऱहेची वस्त्र्, अलंकार, दाराशी मोटार, नोकर-चाकर आणि कोटीकोटी संपत्ती मिळाली तरी आपला मोह पराकोटीचा असतो. आणखी मिळालं पाहिजे म्हणून आपण धनसंपत्तीच्या पाठीमागे धापा टाकत असतो. घरात संपत्ती असूनही मनाने आणि वृत्तीने दरिद्री राहतो. मनुष्य सुखी होतो तो या भौतिक संपत्तीने नव्हे! उदात्त जीवनमूल्यांचे जो प्राणपणाने जतन करतो तोच खरा सुखी होय.

मानवाच्या आयुष्याचा प्याला नियतीने दुःखाने भरून ठेवलेला आहे. दारिद्रय़ पाठीशी हात धुऊन मागे लागले आहे. जीवन दुःखमय आहे हे सांगायला कोणा तत्त्ववेत्त्याची जरुरी नाही, पण त्यासाठी हे सारं सहन करून वाटचाल केल्यास सुख निश्चित मिळेल.

लोकजीवन शुद्ध आणि पवित्र करणे हे संतांचे काम आहे. त्यासाठी सद्भावे त्यांच्या मार्गाने मार्गक्रमण करावे. यातच आपले हित आहे. आपला परमार्थ साधेल. मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे शील व चारित्र्य. यातील सात्त्विकपणा त्याची आयुष्यभर पाठराखण करतो. माणूस पैशाने श्रीमंत असेलही, परंतु तो कधी कुणावर दया करीत नसेल, दुःखी-कष्टी लोकांना मदत करीत नसेल तर तो धनवान असूनही दरिद्री आहे.

मनुष्य आयुष्यात सारं काही कमावतो, पण शेवटी स्मशानाशीच सोबत करावी लागते. माणसे आयुष्यभर पैशासाठी धावतात, पण अचानक एक दिवस ऊर फुटून कायमचाच या जगाचा निरोप घेतात. शेवटी काहीही बरोबर नेत नाही. ज्या गोष्टी क्षणभंगुर असतात त्यांचा पाठलाग आपण जन्मभर करतो व जे शाश्वत सुख आहे त्या सुखाला मातीमोल बनवतो.

आजच्या चंगळवादी व भोगविलासी माणसाला हे कधी कळणार? आजचं आधुनिक जग दुर्मिळ सात्त्विक विचारांचा पाठ आळवायला तयार नाही. कारण, त्याला वाटते, सर्व साधने पैशाने विकत घेता येतात. पण माणसाला हे कुठे ठाऊक आहे की, सर्व साधने पैशाने साध्य आहेत, विकतही मिळतील, परंतु सुख व मानसिक शांती मिळणार नाही. पैशासाठी जगणं आणि मरणं ही माणसाची शोकांतिका आहे. मदिरा प्रिय वाटणाऱया माणसाला केशराच्या सुवासाचं मोल नाही कळणार! लोक अमृत समजून विषाचेच नित्य मनसोक्त सेवन करीत आहेत. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणारी ही माणसे सुखी कशी होणार?

‘धन मेळवूनि कोटी । सवे न येई लंगोटी ।।
पाने खाशील उदंड । अंती जासी सुकल्या तोंडी ।।’

मेल्यावर मनुष्याचे संगती काही येणार नाही. त्यासाठी संत एकनाथ महाराज कळकळीने सांगतात-

जेणें न ये जन्म यमाची यातना ।। ऐसे साधन करा काही ।।

आपली प्रतिक्रिया द्या