एकला चालो रे

>> शिरीष कणेकर

आम्हा रिपोर्टर मंडळींपैकी कोणीही- अगदी कोणीही- नंदू कुलकर्णीला गेल्या वीस-पंचवीस तीस वर्षांत भेटलेले, बघितलेले नव्हते. त्याचा सख्खा भाचा प्रशांत हमिने त्याला तीस वर्षांत भेटलेला नव्हता हे कळल्यावर नंदू आम्हाला न भेटल्याची खंत, आश्चर्य, उद्वेग या सगळय़ा भावनांना आमच्या मनात थारा राहिला नाही. असं काय घडलं असावं की, स्वतःभोवती एक सिमेंटची भिंत उभी करून आत स्वतःला कोंडून घेण्याचा मुलखावेगळा निर्णय त्यानं घेतला असावा? मराठीत याला एकलकोंडा व इंग्लिशमध्ये ‘रेक्लूज’ म्हणतात.

पण आमचा नंदू असा नव्हता हो. तो शहात्तर साली आमच्या ‘इंडियन एक्प्रेस’मध्ये डेरेदाखल झाला तेव्हा माझी तिथे सहा-सात वर्षे सेवा झाली होती. रोज मुख्य वार्ताहर बी. एस. व्ही. रावच्या वरवंटय़ाखाली मी भरडलो जात होतो. मला कोणावरच ‘बॉसिंग’ करायला वाव नव्हता. मी नंदूला पंखाखाली घेतलं. त्याला चार गोष्टी युक्तीच्या सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं माझं सल्लागारपद ठोकरलं. मी अदृश्य जखमा चाटत दूर झालो. त्याचा स्वतंत्र वैदर्भीय बाणा होता. तो शिकत होता, चुकत होता, पडत होता, उठत होता. ‘एव्हरीथिंग ऑन हिज ओन’. का कुणास ठाऊक, पण बी. एस. व्ही. राव त्याला फटकारून फटदिशी बोलत नसे. त्यासाठी आम्ही होतोच की! नंदू न बोलून शहाणा होता. हे अमुक अमुक कसं लिहू हे त्यानं कोणाला विचारल्याचं स्मरत नाही. हळूहळू तो लिहिता झाला. त्याची बोटं टाइपरायटरवर सराईतपणे पडू लागली. तो बघता बघता आमच्यातला एक झाला. जसा मनू देसाई, जसा लाड, जसा हुदलीकर, जसा काश्मिरी, जसा अरुण साधू, जसा मुल्ला, जसा गुप्ते, जसा अय्यर, जसा रायकर, जसा रामकुमार, जसा प्रकाश जोशी, जसा मी, तसाच नंदू कुलकर्णी.

नंदू शुद्ध शाकाहारी व शुद्ध खादाड होता. त्याची पदार्थांची ऑर्डरदेखील त्याच्याप्रमाणेच विचित्र होती. त्याचा वेटरशी होणारा सुखसंवाद या धर्तीवर असायचा-
नंदू – घी मसाला डोसा लाव.
वेटर – थोडा टाइम लगेगा, साब.
नंदू – तो गुलाबजाम लाव.
वेटर – (थोडय़ा वेळानं) अभी मसाला डोसा लावू?
नंदू – नहीं, अभी इडली लाव. बाद में श्रीखंड लाव. फिर घी मसाला डोसा, बाद में मेदुवडा और उसके बाम में बासुंदी…
यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तो वेटर चक्रावून जायचा. नंदू सर्वभक्षक काळ होता. एकदा हतबुद्ध होत मी नंदूला विचारलं होतं, ‘‘नंदू, भूक नाही असं तुझं कधी होत नाही का रे?’’
‘‘होतं ना’’ नंदू समोरच्या पदार्थाला न्याय देत निर्विकारपणे म्हणाला, ‘‘पण प्रत्येक डिशगणिक भूक वाढत जाते.’’

भुकेचा हा आविष्कार मी फक्त नंदूच्या ठायी पाहिला होता. खाल्ल्यावर त्याची भूक शमत नसे तर वृद्धिंगत होत असे. त्याचे हे क्षुधाशमनाचे हातखंडे प्रयोग ‘एक्प्रेस टॉवर्स’च्या मागे असलेल्या ‘वुडलँडस्’ या हॉटेलात चालायचे. तिथला तीन रुपयांना असलेला मस्त ‘घी मसाला डोसा’ आम्हाला खिशाला परवडणारा नसे. आम्ही गाडीवर चरायचो. तिथं तर नंदू शेतात घुसलेल्या जनावरासारखा खात सुटायचा. एकदा तो सांगत होता की, पाहुणे घरी (तेव्हा तो वकील असलेल्या थोरल्या भावाकडे राहत होता) येणार म्हणून पातेलंभर बासुंदी केली होती.
‘किती पाहुणे होते?’ मी सहज विचारले.
‘एकच.’
याचा अर्थ पाहुणा हे निमित्त होते, घरी बासुंदीचं पातेलं तोंडाला लावणारा बकासूर बसला होता. त्यानंतर त्याच्या देहावर अंशभर मांस जास्त नव्हतं. तो सडपातळ व काटक होता. डोईवर काळे कुरळे केस होते. परवा काही तपांनंतर मी त्याचा फोटो पाहिला. हा नंदू आहे असं कोणी सांगितलं नसतं तर मी त्याला ओळखलंच नसतं. समोरचे केस गेले होते. चेहऱयाची रयाही गेली होती. नंदू नंदू वाटत नव्हता. नेमकं हेच हवं होतं ना नंदूला? कोणी आपल्याला ओळखू नये, ओळखलंच तर आपण ओळख दाखवू नये. तो कांदिवलीला राहतो एवढं ऐकून होतो, पण कांदिवलीला कुठे हे कोणालाच माहीत नव्हतं. त्यानं माहीत होऊ दिलं नव्हतं. ‘हिंदू’चा महेश विजापूरकर याचं नंदूकडे काहीसं काम होतं.
‘‘घरी नको. बाहेरच कुठेतरी भेटू’’ नंदू त्याला म्हणाला.
काही वर्षांपूर्वी पत्रकार-मित्र रमेश गुणेला नंदू अपघातानं रस्त्यात भेटला.
‘‘काय रे नंद्या, कुठं आहेस? पत्ता काय तुझा?’’
नंदूनं त्याच्याकडे आरपार पाहिले व तो म्हणाला, ‘‘आय थिंक आय नो यू.’’ एवढं बोलून नंदू सुमडीत चालू पडला. रमेश जागच्या जागी खिळून उभा राहिला.
आमच्याकडे शशी मेहता नावाची शिकाऊ वार्ताहर मुलगी होती. पुढे ती लग्न करून दिल्लीत सेटल झाली. एके दिवशी तिनं नंदूला फोन केला आणि विचारलं, ‘‘कसा आहेस तू, नंदू?’’
‘‘मला माझ्या इतिहासाशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही.’’ नंदू म्हणाला व त्यानं फोन ठेवला.
कधी कधी वाटतं की, नंदूनं उभं आयुष्य माणसांना दूर लोटण्यात घालवलं (त्यानं लग्न केलं नाही) मग माझ्याकडे जेवायला व गप्पा मारायला यायचा तो नंदू कोण होता? तो आणि रमेश गुणे एकत्र यायचे. माझा छोटा मुलगा त्यांना गुणे-कुलकर्णी व साधे कुलकर्णी म्हणायचा आणि याच गुणे-कुलकर्णीला हा साधा कुलकर्णी आज ओळखच दाखवत नव्हता. तीस वर्षांत मी त्याला भेटलो नाही म्हणून, नाहीतर त्यानं माझी हीच अवस्था केली असती. त्यानं जगाशी वैर मांडलं होतं आणि मी त्या जगाचाच एक भाग होतो.

गेली सत्तावीस वर्षे तो ‘स्टेटस्मन’ या दैनिकाचा मुंबईचा प्रतिनिधी होता. ‘ब्युरो चीफ’. सगळय़ा संबंधांना मूठमाती देऊन तो पत्रकारितेत कसा काय कार्यरत राहिला होता? तो म्हणे संध्याकाळी साडेपाचला ऑफिस बंद करून घरी जायचा. रोज सायंकाळी साडेपाच वाजता नोकरी संपवणारा माझ्या माहितीतला तो एकमेव पत्रकार असावा. इथंही नंदूचं सगळं वेगळंच होतं. कोणाचं येणंजाणं नसल्याने तो हार्ट अटॅक येऊन कोसळलाय हे कळलंच नाही. कालांतरानं दरवाजा फोडून उघडल्यावर तो मरणप्राय अवस्थेत आढळला. सगळय़ाला उशीर झाला होता. बातमीच्या जगात उभं आयुष्य काढणाऱया नंदू कुलकर्णीची बातमी बाहेर यायला विलंब व्हावा हा दैवदुर्विलास होता. सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून नंदू कुलकर्णी गेला. एक बातमी संपली.

तळटीप – गेल्या वेळच्या माझ्या ’अग्गोबाई ढग्गोबाई ’ या लेखात काही उल्लेख व्यक्तिगत व संदर्भ चुकीचे असल्याबद्दल डॉ. गिरीश ओक व निवेदिता सराफ यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबद्दल मी दिलगीर आहे .

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या