खाऊगल्ली- खरेदी आणि खादाडी एकत्रच 

>> संजीव साबडे

नेहमीची खरेदी, सणावाराची खरेदी ते लग्नाचा बस्ता बांधायचा म्हणून उत्साहाने झालेली खरेदी, ती झाली की भुकेची जाणीव होते आणि आपोआप पाय रेस्टाँरंट, खाऊगल्लीकडे वळतात. खरेदीच्या वाटेवरच्या अशा चटपटीत, गरमागरम, थंड व चविष्ट खाद्यपदार्थांची आणि खाऊगल्ल्यांची ही ओळख.

पूर्वी कपडय़ांपासून विविध खरेदीसाठी पूर्व व पश्चिम उपनगरातील असंख्य लोक दादरला जात. दादरची मोठी बाजारपेठ  सर्वांच्या आकर्षणाचं कारण होतं आणि वस्तू वाजवी दरात मिळत. त्यामुळे अनेक जण
ऑफिसमधून घरी जाताना दादरला उतरून भाज्या, मासे, फुलं, फळं आणि खाद्यवस्तू विकत घेत. आता उपनगरांत आणि ठाणे व नवी मुंबईतही सर्व वस्तूंच्या मोठय़ा मंडय़ा, बाजारपेठा झाल्याने दादरचं महत्त्व बरंच कमी झालं आहे. मात्र लग्नाचा बस्ता बांधायला लोक आजही तिथेच जातात.

नव्या पिढीतील लोकांना मात्र पश्चिम उपनगरांच्या लिंकिंग रोडप्रमाणे सांताक्रुझ मार्केटची क्रेझ आहे. लग्नासाठी ड्रेस, मेकअप साहित्य, खरे-खोटे दागिने, असंख्य डिझाइनचे चपला व बूट, फळं व खाद्यपदार्थांचं मोठं मार्केटच सांताक्रुझ पश्चिमेच्या वेलिंग्डन, हसनाबाद लेन परिसरात फोफावलं आहे. पारंपरिक व आधुनिक कपडे व वस्तूंचा संगम सांताक्रुझ स्टेशनबाहेरच्या मार्केटमध्ये दिसतो. त्यामुळे दिवसभर, त्यातही संध्याकाळपासून तिथे झुंबड उडलेली असते. इथे खाऊगल्ली नसली तरी जागोजागी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाडय़ा दिसतात. खरेदी केलेल्या वस्तूंच्या पिशव्या सावरत, सांभाळत उभ्याने, पटकन खाता येईल, अशा चटपटीत, गरमागरम, थंड व चविष्ट खाद्यपदार्थांकडे आपण आपोआप खेचले जातो. खूप वेळ खरेदीत गेला की मग भूक व तहान लागल्याचीही आठवण होते. पश्चिमेला असलेलं जुनं ठिकाण म्हणजे सॅन्डविझा. आठवतं त्याप्रमाणे 1990 च्या सुमारास तिथे पहिल्यांदा सँडविच खाल्लं होतं. त्याआधी चार-पाच वर्षं हा स्टॉल सुरू झाला. आता तो मोठा ब्रँड असून मुंबई-ठाण्यात त्यांची 10 स्टॉल्स वा रेस्टॉरंट्स आहेत. सांताक्रुझला गेल्यावर तिथे जो गेला नाही, तो चुकला आणि जो एकदा जातो तो पुनः पुन्हा तिथे जातोच. इतके विविध सँडविच, टोस्ट, ग्रील सँडविच आणि त्यांची स्वतची खास कोल्ड्रिंक. स्टॉल मोठा असला तरी संध्याकाळी 25-50 लोक हातात ऑर्डरचं सँडविच पडण्याची वाट पाहत उभे असतात. तिथे एका वेळी 8-10 जणांचे हात पावावर चालत असतात. त्यांचे सँडविच, चहा, चाट असे मसालेही लोकप्रिय आहेत.

त्या परिसरात छोटं ‘काका काकी’ रेस्टॉरंट आहे. मराठी नाव असलं तरी तिथे बोहरी खाद्यपदार्थ मस्त मिळतात. म्हणजे बोहरी पद्धतीची बिर्याणी, खिमा, समोसे वगैरे. त्यासाठी ‘काका काकी’ रेस्टॉरंटमध्ये अवश्य जावं. मुंबईत एरवीही बोहरी मुस्लिमांची कमी रेस्टॉरंट आहेत. त्याच भागात नाइस फूड कॉर्नर हे मांसाहारी, विविध प्रकारच्या कबाब व टिक्कासाठी प्रसिद्ध लोकप्रिय ठिकाण आहे. सीग कबाब, हिरव्या मसाल्यातील चिकन टिक्का आणि बैदा रोटी हे इथलं वैशिष्टय़. त्याबरोबर पुदिना-कोथिंबिरीची चटणी आणि पातळ लांब कापलेला कांदा. आता पावसाळा सुरू झालाय. या वातावरणात अशी खायची मजा औरच.

स्वामी विवेकानंद रस्त्यावर आशा पारेख यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱया हॉस्पिटलपाशी आशा पारेख वडापाव मिळतो. हा वडापाववाला गेली 40 वर्षं जोरात व्यवसाय करतोय. पावाच्या आत आधी आंबट-गोड, तिखट चटण्या आणि मग गरमागरम वडा घालून तो आपल्या हाती देतो. याच्याकडील वडापाव आणि छोटी मूग भजी अतिशय प्रसिद्ध. फार भूक नसेल तर वडापाव वा भजी पुरेशी होतात. वडापाववाल्याच्या जवळ असलेल्या राम अँड श्याम चाट स्टॉलला भेट द्यायलाच हवी. राम व श्याम या भावांनी बऱयाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या स्टॉलवर मिळणारे खाद्यपदार्थ अनेकजण स्विगी व झोमाटोवरून मागवतात. यातून खाद्यपदार्थांची चव, लोकप्रियता व विश्वासार्हता याची कल्पना येते. येथील पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ आणि रगडा पॅटीस हे सारे प्रकारही चमचमीत व चविष्ट.

तुम्हाला ढोकळा, खमणी, दाबेली, छोटे समोसे असे गुजराती खाद्यपदार्थ खायचे असतील किंवा फ्रँकी व शाकाहारी रोलचे विविध प्रकार खावेसे वाटत असेल तर त्याच परिसरात ‘अवर्य’ नावाचं एक मोठं दुकान तुम्हाला दिसेल. खाण्यासाठी व घरी नेण्यासाठी अनेक प्रकार तिथे आहेत. उन्हाळ्यात थंडगार आइक्रीम खायची इच्छा निर्माण झाल्यास तिथलं पपनसाचं पॉप्सीकल नक्की चाखा. असलं आइक्रीम खाताना आपल्यालाही लहान झाल्यासारखं वाटतं.

तुम्ही तीन-चार जण वा जणी आहात, कोणाला सँडविच खायचंय, कोणाला ज्यूस वा कोल्ड्रिंक हवं आहे, किंवा एखाद्यास नुसती फळं खायची आहेत, अशा वेळी रेस्टॉरंट शोधावं लागतं. हे सारं एकाच ठिकाणी मिळेल याची खात्री नसते. पण सांताक्रूझ पश्चिमेला, अगदी स्टेशन रोडवर जनता फास्ट फूड आणि ज्यूस सेन्टरमध्ये हे सारं मिळतं. इथे सँडविच आणि ज्यूसचा मेनू पाहिल्यावर काय घ्यावं आणि काय नको, असं होऊन जातं.

उन्हाळ्याची दाहकता संपून पावसाळा स्रू झाला की रात्री ऑम्लेट वा भुर्जीपाव खाण्याची इच्छा अनेकांना होते. हा प्रकार घरी करणं सोपं व शक्य असलं तरी एखाद्या गाडीवरचा ऑम्लेट पाव वा भुर्जी पाव खाण्याची मजाच वेगळी असते. मोठय़ा तव्यावर एकीकडे पाव भाजत ठेवलेले, मध्यभागी ऑम्लेट बनतंय, शेजारीच भुर्जी होतेय, गाडीवाला ग्लासात कांदा, मिरची, कोथिंबीर, तिखट पूड, शक्यतो मालवणी मसाला आणि डबल वा सिंगल अंडय़ाचे मिश्रण तयार करतोय… त्या साऱयाचा सुगंध, होय सुगंधच आसपास दरवळतोय, मध्येच दोन बॉइल्ड अंडा फ्राय, नुसत्या अंडा फ्रायची ऑर्डर येते. हसनाबाद लेनच्या स्कायवॉकपाशी रेल्वेवाला भुर्जीवाल्याकडे रात्री उशिरापर्यंत हे खाण्यासाठी सतत लोक येत असतात. काही सरळ, काही तंद्रीत, काही भुकेले, काही जेवल्यानंतर मूड आला म्हणून खायला आलेले. त्या परिसरात आणखीही ऑम्लेट व भुर्जीच्या गाडय़ा रात्री लागतात. पण हा पॉप्युलर आहे.

सांताक्रूझ पश्चिमेच्या दोन्ही टोकाला शीव महल, शबरी ही शाकाहारी रेस्टॉरंट्स आहेतच. शिवाय फक्त मांसाहारी जेवण देणारीही दोन आहेत. गाडी वा स्टॉलवर खायचं नसेल तर त्या परिसरात असे अनेक पर्यायही आहेत.