दृष्टी

> सुहास मळेकर

प्रचंड ट्रफिक पार करून स्टेशन गाठणे म्हणजे वाहनचालकांना रोज नाकी दम येतो. धक्का लागणे, बाचाबाची वगैरे नेहमीचेच असले तरी त्या गर्तेत एखादी टाळता येऊ शकणारी घटना उगाच नुकसान करून जाते. कधीतरी नव्या नजरेने पाहिले तर त्याला नवी दृष्टी लाभू शकते.

सोळा-सतरा वर्षांच्या मुलीला घेऊन तिचे बाबा तिच्या कॉलेजला काही कामासाठी म्हणून सोबत चालले होते. त्या गर्दीत एका वीस-बाविशीच्या तरुणाच्या बाईकचा कुणाला तरी धक्का लागला. धक्का लागलेल्या माणसाने त्याला शिवीगाळ केली आणि त्याची बाईक थांबवून कॉलरला धरून थोबाडवत त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊ लागला. दुसऱ्याने त्याची बाईक धरली. तिसरा चौथा… चोहोबाजूंनी त्याला लोकांनी घेरले. काही वेळ सर्व गाडय़ा थांबल्यासुद्धा. या गर्दीत त्या बाप-बेटीची रिक्षासुद्धा थांबली. तो तरुण आणि ते धरून नेणारे बाजूला गेल्यावर ट्रफिक पुन्हा सुरळीत चालू झालं. इथपर्यंत अगदी नेहमीचेच.

पण अचानक ती मुलगी रडू लागली.

‘आता काय होईल, बाबा?’ तिने तिच्या बाबांना कळवळून विचारलं.

‘तुला काय झालं रडायला? तू घाबरू नकोस, बाबा सोबत आहेत ना तुझ्या?’ बाबा म्हणाले.

‘आपण तिथे जाऊन त्यांना समजावू या ना!’ मुलगी बेचैन झाली होती.

‘नाही बेटा, आपल्याला कॉलेजला जायला उशीर होईल.’ बाबांनी वेळ मारून नेली.

‘तुम्ही चला, रिक्षा चालू करा.’ रिक्षावाल्या काकांना तिच्या बाबांनी सांगितले.

तिच्याकडे दुर्लक्ष करून रिक्षा पुढे सरकली.

स्टेशनला रिक्षातून उतरताना मुलगी रडत असल्याचे बाबांच्या लक्षात आले.

‘काय गं, अजून तू रडतेच आहेस?’

खूप वेळ समजावून बोलतं केल्यावर ती म्हणाली,

‘त्याला एक छोटी बहीण असेल, तिला माहीत नसेल ना त्याला इकडे मारताहेत ते? माझ्या दादाला कोणी मारत असेल तर तुम्ही सहन कराल?’

हा बाबांना अनपेक्षित धक्का होता.

‘इतका मार खाण्यासाठी त्याने काय वाईट केले हे तरी आपण समजून घेतले पाहिजे होते. आपण तिथे थांबून सगळय़ांना शांत केले असते.’

‘रागाच्या भरात सगळय़ांनी त्याला मारले तर?’

तिच्या नुकत्याच उमलणाऱया तरुण मेंदूला हा प्रश्न पडला होता.

आपण खरेच का इतके निर्ढावलो आहोत?

‘आम्हां काय त्याचे’ म्हणून आपण दुर्लक्ष करून आपल्या कामाला निघून जातो.

‘इतका वेळ कुणाकडे नाहीए’ हे खरे असले तरी तिची संवेदनशीलता काwतुकास्पद आणि रास्त होती.

‘तुम्ही तुमचा माणूस तिथे गृहित धरून पहा, तुम्हाला पटतंय का?’ हा मंत्रच जणू तिने दिला होता. हा मंत्र कोणीही कुङ्गेही जपला तरी फायदाच होईल.

ही दृष्टी स्पष्ट होती.

बाबा निःशब्द झाले.