ठसा – राजा गोसावी

>> श्रीप्रसाद मालाडकर

सुप्रसिद्ध  मराठी नाटय़, मराठी हिंदी चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्म दिनांक 28 मार्च 1925 रोजी सातारा जिल्हा, सिद्धेश्वर कुरोली, तालुकाः खटावमध्ये  झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते. गाणी, नकला आणि नाटकं यांत लहानपणापासूनच अभिरुची होती. त्यांचे नाटय़सृष्टीत पदार्पण गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत नाटक मंडळीत झाले, तर चित्रपट दिग्दर्शक मास्टर विनायक कर्नाटकी यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मध्ये नोकरीला होते. ‘गजाभाऊ’, ‘बडी मां’ या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे विनोदी अभिनेते दामूअण्णा मालवणकर यांच्या ‘प्रभाकर नाटय़ मंदिरात’ त्यांनी सुरुवातीला काम केले. रंगभूमीवर नाटककार राम गणेश गडकरी यांच्या संगीत ‘भावबंधन’ या नाटकात त्यांनी छोटी भूमिका केली. अल्पावधीतच या नाटकातील विविध व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. .

राजा गोसावी हे रंगभूमीवरसुद्धा लोकप्रिय होते (नाटक आणि भूमिका) ‘उधार उसनवार’- भीमराव वाघमारे, ‘एकच प्याला’- तळीराम, ‘करायला गेलो एक’ – हरिभाऊ हर्षे, ‘कवडीचुंबक’ – पंपू शेट, ‘घरोघरी हीच बोंब’ – दाजिबा, ‘डार्ंलग डार्लिंग’ – प्रभाकर, ‘तुझे आहे तुजपाशी’- श्याम, ‘नटसम्राट’ – गणपतराव बेलवलकर, ‘पुण्यप्रभाव’- नूपुर, सुदाम, कंकण, ‘प्रेमसंन्यास’- गोकुळ, ‘भाऊबंदकी’ – नाना फडणीस, ‘भावबंधन’ – रखवालदार, महेश्वर,कामण्णा , धुंडीराज, ‘याला जीवन ऐसे नाव’ – नाथा, ‘लग्नाची बेडी’ – अवधूत, गोकर्ण, ‘संशयकल्लोळ’- फाल्गुनराव, भादव्या. नाटकात संवाद म्हणताना ते स्वतःच्या मनाशी वाक्य बोलायचे. वसंत सबनीस लिखित ‘सौजन्याची ऐशी तैशी’  नाटकात ‘नाना बेरके’ ही भूमिका अविस्मरणीय आहे. सन 1952 मध्ये ख्यातकीर्त दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ चित्रपटाद्वारे राजा गोसावी यांनी चित्रपटसृष्टीत प्रभावी पदार्पण केले. त्याच वर्षी राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या चित्रपटातल्या मित्राची भूमिका केली.

चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे, रेखा कामत, चित्रा नवाथे, ग. दि. माडगूळकर, शरद तळवलकर आणि इतर कलाकार होते. ग. दि. माडगूळकर यांची गाणी, स्वर आशा भोसले, मालती पांडे, सुधीर फडके. गीतं – ‘सांग तू माझा होशील का’, ‘त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे’, ‘पहिले भांडण केले कोणी, सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी’, ‘डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे’. राजा गोसावी यांचा अभिनय सहजसुंदर आहे.  त्यानंतर त्यांचे चित्रपट – ‘अबोली’, ‘महात्मा’, ‘बोलविता धनी’,‘सौभाग्य’, ‘शुभमंगल’, ‘बेबी’, ‘पुनवेची रात’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘जगावेगळी गोष्ट, ‘गाठ पडली ठकाठका’, ‘आलिया भोगासी’, ‘देवघर’, ‘झालं गेलं विसरून जा’, ‘दोन घडीचा डाव’, ‘अवघाची संसार’, ‘पैशांचा पाऊस’, ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘लग्नाला जातो मी’, ‘वरदक्षिणा’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘कामापुरता मामा’, ‘येथे शहाणे राहतात’, ‘या सुखांनो या’ अशा अनेक चित्रपटांमुळे ते लोकप्रिय झाले. वसंत पिक्चर्सचे निर्माते शरश्चंद्र गुण्ये यांनी ‘राजा गोसावीची गोष्ट’ 1958 मध्ये प्रदर्शित केला. राजा गोसावी यांच्या ‘रंग श्री’ नाटय़ संस्थेने रंगभूमीवर अनेक जुनी, नवीन नाटके सादर करून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक यशस्वी प्रयोग आणि दौरे केले. राजा गोसावी यांनी त्यांच्या कारकीर्दीत दोनशेच्या वर मराठी चित्रपट केले. ‘बडी मां’, ‘गाभी’, ‘स्कूल मास्टर’, ‘महात्मा’ अशा पाच हिंदी चित्रपटांत, सुमारे चाळीस नाटकांतून रंगभूमीवर अभिनय केला.

मुंबई दूरदर्शनच्या काळात मराठी मालिका ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ आणि इतर मालिकांत अभिनय केला. त्यांच्या कनिष्ठ सुकन्या शर्मिष्ठा राजा गोसावी (शमा देशपांडे) या मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. 1995 मध्ये बारामतीच्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे राजा गोसावी अध्यक्ष होते. अखिल भारतीय  नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’  पुरस्कार राजा गोसावी यांना प्रदान केला. राजा गोसावी यांचे पुण्यात नाटक सुरू होण्यापूर्वी रंगभूषा करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने 28 फेब्रुवारी 1998 रोजी निधन झाले. मात्र आजारात नाटकं आणि चित्रपटांच्या ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे ते रसिकांच्या स्मरणात कायम आहेत.

 (लेखक प्रसिद्धी माध्यम तज्ञ आणि सल्लागार आहेत.)