ठसा – दिवाकर मोहनी

>> महेश उपदेव

विदर्भातील  ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि भाषा व लिपी तज्ञ, साहित्यिक दिवाकर मोहनी हे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची विदर्भात ओळख होती, खादीचा सदरा, खादीचे धोतर, खांद्यावर शबनम बॅग ही त्यांची ओळख होती. त्यांच्या या झोळीत मौल्यवान विचार दडलेले असायचे. दांडगे वाचन असल्यामुळे कोणत्याही विषयावर ते चर्चा करायला तयार असायचे. आपल्या मराठी मायबोली मराठीवर त्यांचे विशेष प्रेम होते.

मोहनी यांनी अखेरपर्यंत आपली चौकस बुद्धी आणि शिकण्याची नवी आस कायम राखली होती. मोहनी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1931 रोजी नागपुरात गांधीवादी कुटुंबात झाला. मराठीतील बुद्धिवादाच्या ‘आजचा सुधारक’ मासिकाचे माजी संपादकही होते. स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे स्वरूप यांसह विविध विषयांवर त्यांनी तर्कसंगत आणि नवीन वैचारिक तत्त्वज्ञान मांडले. त्यांचे देवनागरी लिपीवरील ‘मायमराठी… कशी लिहावी…कशी वाचावी…’ हे पुस्तक लिपीवरील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. मोहनी हे भाषा आणि शुद्धलेखनाबद्दल कायम आग्रही होते. लिखाण उत्तम असले पाहिजे आणि भाषा वाचणाऱ्याला सोयीची असावी असा त्यांचा आग्रह होता. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात ते विद्यार्थ्यांना ग्राफिक आर्ट हा विषय शिकवायचे.

मोहनी हे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते. कमलाताई होस्पेट या त्यांच्या आत्या होत्या. त्यांनी मातृसेवा संघ स्थापन केला. नागपूरच्या त्या पहिल्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्या होत्या. दिवाकर राव यांचे काका हरिभाऊ मोहनी महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेतील सहकारी होते, दिवाकरराव यांचे आचार्य अत्रे, आचार्य विनोबा भावे यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यामुळे ते गांधीवादी विचार घेऊनच जगले. मराठी भाषेत त्यांचे मोठे योगदान होते. भाषेकरिता अनेक संशोधने केली. बहुभाषिक होते. बंगाली भाषा बोलता व लिहिता येत होती. त्यांचे विविध भाषांवरही प्रभुत्व होते. त्यांनी विवेकवादाची नियतकालिके चालविली. वैचारिक मेंढय़ा हाकायचे काम त्यांनी केले. खादीवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या पत्नी इंदिरा खादीची साडी परिधान करायच्या.

‘आजचा सुधारक’ या विवेकवादी नियतकालिकाचे ते संपादक व प्रकाशक होते. त्यांनी स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे मोल आदी विषयांवर विवेकवादी अंगाने लेखन केले. देवनागरी लिपीवरील त्यांचे ‘मायमराठी कशी लिहावी, कशी वाचावी’ हे पुस्तक संशोधनासाठी तसेच मराठी भाषेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ‘भाषाव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नवीन विषयांबद्दलचे कुतूहल त्यांना असे. ते अतिशय रॅशनल विचार करत. समाजात स्त्रीवर होणारे अत्याचार त्यांना अस्वस्थ करीत. अलीकडे आजारी असतानासुद्धा सध्या देशात, राज्यात काय सुरू आहे यावर त्यांचे लक्ष होते. ज्येष्ठ विधिज्ञ के. एच. देशपांडे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या विनंतीवरून सुप्रसिद्ध कामगार नेते आणि राज्यसभा सदस्य पु. य. देशपांडे लिखित ‘अमृतानुभव रसरहस्य’ या संत ज्ञानेश्वरांच्या भाष्यावर लेखन केलेल्या, पाच खंडांत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करण्यात दिवाकररावांनी मोलाचे सहकार्य केले. हा ग्रंथ मुद्रित व प्रकाशित करून  विजय लपालीकर व अॅड. राजीव देशपांडे यांच्यासह केलेल्या या सांघिक कार्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अमूल्य वैचारिक देणगी मिळाली आहे. दिवाकररावांचे नागपुरातील अग्रगण्य संस्था मातृसेवा संघाशी अतूट नाते होते. दिवाकर मोहनी यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे ‘भाषाव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि त्यांच्या ‘शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकासाठी त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ.व्ही.व्ही. मिराशी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. नावीन्याचा ध्यास, पुढच्या पिढीशी संवाद साधण्याची तयारी, नव्हे गरज ओळखून पावले उचलणे हे  निश्चित अनुकरणीय असेच आहे. मृत्योपरांत देहदान करून त्यांनी समाजकारणाचा वसा पूर्णत्वाला नेला.