>> महेश उपदेव
नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर, युवा प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने नुकत्याच संपलेल्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रस्टेवा हिचा पराभव करीत विश्वजेतेपद पटकावले. दिव्याने नागपूरबरोबर हिंदुस्थानचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर चमकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 27 देशांतील101 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. दिव्याने 11 फेऱ्यांमधून दहा गुणांची कमाई केली आहे. फिडे रेटिंगनुसार दिव्या आणि क्रस्टेवा यांचा वीस वर्षांखालील ज्युनियर क्रमवारीत अव्वल तीन खेळाडूंमध्ये समावेश आहे. आता ती अव्वल मानांकनावर जाऊ शकेल.
18 वर्षांच्या दिव्याने आशियाई महिला चॅम्पियन आणि स्पर्धेत अग्रमानांकित राहून हिंदुस्थानची महिला चेस मास्टर अनुपमा श्रीकुमार हिचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून बघितले नाही. आपली सहकारी साची जैन हिच्यावर मात करीत गुणसंख्या नऊ केली. त्यानंतर ती संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. 9 डिसेंबर2005 ला नागपुरात जन्मलेली दिव्या आंतरराष्ट्रीय मास्टर असून 2022 ला महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तसेच 2023 ला आशियाई महिला चॅम्पियन बनली. बुद्धिबळातील प्रतिष्ठsचा महिला ग्रॅण्डमास्टर (डब्ल्यूजीएम) किताब मिळविला आहे. बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत दुसरा आंतरराष्ट्रीय नॉर्म मिळवून तिने हा ऐतिहासिक बहुमान प्राप्त केला. महिला ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारी दिव्या ही नागपूरची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली होती.
15 वर्षीय दिव्याला ग्रॅण्डमास्टर किताब पूर्ण करण्यासाठी बुडापेस्ट येथील स्पर्धेत साडेचार गुणांची आवश्यकता होती. दिव्याने नऊपैकी पाच गुणांची कमाई करून ग्रॅण्डमास्टर किताबावर थाटात शिक्कामोर्तब केले होते. 2305 यलो रेटिंग असलेल्या दिव्याने पहिला आंतरराष्ट्रीय नॉर्म दोन वर्षांपूर्वी वेलाम्मल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविला होता. बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर पूर्ण करण्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय नॉर्म पूर्ण करणे आवश्यक असते. हा प्रतिष्ठेचा किताब मिळविणारी दिव्या नागपूरची पहिली महिला, नागपूरची दुसरी खेळाडू व विदर्भातील एकूण तिसरी बुद्धिबळपटू आहे. यापूर्वी अमरावतीच्या स्वप्नील धोपाडे व नागपूरच्याच रौनक साधवानीने ग्रॅण्डमास्टर किताब मिळविलेला आहे. कोरोनामुळे जवळपास दीड वर्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धा न झाल्याने दिव्याला ग्रॅण्डमास्टर किताबासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलची विद्यार्थिनी व डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता देशमुख यांची कन्या असलेल्या दिव्याने आतापर्यंत 22 वेळा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. 20 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 ब्रॉंझ पदकांची कमाई केली. शिवाय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन व तीन वेळा आशियाई विजेती राहिली. गतवर्षी हिदुस्थानला ऑलिम्पियाडमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात दिव्याचा सिंहाचा वाटा होता हे उल्लेखनीय. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील चमकदार कामगिरीबद्दल राज्य सरकारने तिला तीन वर्षांपूर्वी प्रतिष्ठsच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. अपेक्षांचे ओझे असल्याने दबावाचा सामना कसा करायचा याचे कसब आत्मसात केले याचा दिव्याला फायदा झाला.