>> विनायक
मोहनगरी आणि फ्रान्सची राजधानी असलेलं पॅरिस शहर तिथे सीन नदीकाठी असलेल्या आयफेल टॉवरसाठी प्रसिद्ध आहे. आता पॅरिस आणि आयफेल या शब्दांचे इंग्लिश आणि फ्रेंच उच्चार वेगवेगळे आहेत. फ्रेंच भाषेत पॅरिसला ‘पारी’ म्हणतात. (आणि रशियन लोक मॉस्कोला मस्क्वा म्हणतात.) तसंच इंग्लिश ‘आयफल’ला फ्रेंच लोक ‘इफेल्’ असं संबोधतात. ‘आयफेल’चे स्पेलिंग ‘इआय’ने सुरू होतं आणि इंग्लिशमध्ये बहुतेक वेळा ‘एईआयओयू’पैकी दोन स्वर एकत्र आले तर पुढच्या स्वराचा उच्चार होतो असं आमचे इंग्लिशचे एक शिक्षक सांगत असत. अर्थात इंग्लिश भाषेत उच्चारांचे अपवाद बरेच आहेत. देवनागरीसारखी उच्चारानुवर्ती लिपी इंग्लिश, फ्रेंच भाषांना नाही. त्यामुळे परदेशी व्यक्तींचा गोंधळ झाला तर नवल नाही. आता हे भाषारंजन ‘विज्ञानरंजना’त कशाला असा प्रश्न पडला असेल तर गेल्या 15 तारखेला ‘आयफेल टॉवर’ला 135 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे हा लोखंडी मनोरा जनसामान्यांसाठी सुरू होऊन इतका काळ लोटला.
आज एकविसाव्या शतकात या मनोऱ्याचं बांधकाम किंवा उंची आश्चर्यकारक राहिली नसली तरी एकोणीसाव्या शतकापर्यंत मागे जाऊन पाहिलं तर हे ‘इंजिनीअरिंग मार्व्हल’ सोपं नव्हतं. म्हणूनच त्याची रंजक माहिती. आधी केवळ उंचावर जाऊन पॅरिसच्या निरीक्षणाचा अनुभव देणारा हा 1,083 फूट उंचीचा मनोरा आता ‘ब्रॉडकास्टिंग टॉवर’ म्हणूनही वापरला जातो. या टॉवरचं फ्रेंच टोपणनाव (निक् नेम) ‘ला डेम दे फर’ म्हणजे ‘आयर्न लेडी’ किंवा पोलादी महिला!
हा टॉवर 1889 मध्ये ‘वर्ल्ड फेअर’साठीचं प्रमुख आकर्षण म्हणून उभारण्यात आला होता. त्याच वर्षी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्षे पूर्ण होत होती. हा लोखंडाचा मनोरा फारसा कलात्मक नाही, अशीही टीका तत्कालीन टीकाकारांकडून झाली, पण नंतरच्या काळातील उदंड लोकप्रियतेमुळे तो फ्रान्सचं सांस्कृतिक प्रतीक ठरला. आतापर्यंत जगभरच्या साठ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, तर सुमारे 7 ते 8 लाख लोक मनोऱ्याच्या पायऱ्या चढून गेलेले आहेत. टॉवरचा सर्वात वरचा भाग 906 फूट उंचीवर आहे.
स्टीफन सॉलेस्त्रे या वास्तुविशारदाने या मनोऱ्याचं डिझाईन (रचना) ठरवली आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर मॉरिस कोहोक्लिन एमिले नॉजिअर यांनी प्रत्यक्ष बांधकाम केलं. आता हा मनोरा आपल्या ‘कैलास’ लेण्याप्रमाणे ‘वर्ल्ड हेरिटेज’ किंवा जागतिक जतनायोग्य म्हणून 1964 मध्ये घोषित करण्यात आलेला आहे.
1889 च्या ‘एक्स्पोझिशन युनिव्हर्सले’ किंवा जागतिक जत्रेच्या (वर्ल्ड फेअर) वेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अजरामर कलाकृती निर्माण व्हावी असं मॉरिस आणि एमिले यांना वाटलं. शिवाय फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी होतीच. तेव्हा जगाला आपलं काही अद्वितीय काम दाखवावं असं या इंजिनीअर कलाकारांना वाटणं स्वाभाविक होतं. एखादं तात्पुरतं प्रतीक (आयकॉन) असण्यापेक्षा कायमस्वरूपाचं बांधकाम पुढच्या पिढय़ांनाही आकर्षक वाटेल या हेतूने टॉवरची कल्पना रुजली.
81 मजली इमारतीइतका उंच आणि त्या वेळी पॅरिसमध्ये (आणि कदाचित युरोपात) सर्वात उंच मनोरा बांधण्याचं आव्हान त्यांनीच आरेखित केलं. चहुबाजूला 410 फुटांचा चौरस पाया (बेस) झाल्यावर वेगाने बांधकाम होऊ लागलं. हा लोह-मनोरा उभारण्याचा आरंभ झाला 28 जानेवारी 1887 रोजी आणि काम पूर्णत्वाला गेलं 31 मार्च 1889 या दिवशी. मात्र त्याचं उद्घाटन पुढे 15 मे रोजी झालं. तो पूर्ण होईपर्यंत अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन मॉन्युमेन्ट’ जगातली सर्वात उंच रचना होती. हे मॉन्युमेन्ट किंवा स्मारक तब्बल 41 वर्षे ‘सर्वोच्च’ मानवनिर्मित संरचना म्हणून मिरवत होते. आयफेल टॉवरने त्याहून अधिक उंची गाठली आणि फ्रेंचांचा आनंद गगनाला भिडला.
नंतर न्यूयॉर्कमध्ये 1930 मध्ये क्रिसलर बिल्डिंग अस्तित्वात आली आणि त्यावरच्या प्रक्षेपण टॉवरमुळे ती जगात सर्वोच्च ठरली. ती 1957 मध्ये. आयफेल टॉवरचं महत्त्व मात्र केवळ उंचीपुरतं नव्हतं. त्याची लोखंडी रचना महत्त्वपूर्ण होती. टॉवरचे पूर्व आणि दक्षिणेकडचे ‘पाय’ साडेसहा फुटांचा थर असलेल्या काँक्रिटमध्ये घट्ट बसवले गेले. सीन नदीकडचे (उत्तरेकडील) पाय रोवण्यासाठी 72 फुटांपर्यंत काँक्रिट ओतावं लागलं. चुनखडीचे हे पायाचे जाडजूड ठोकळे मजबूत होते. त्यावर लोखंडी रचना आकाराला येणार होती. त्यासाठीची तळाची प्लेट (शू) 4 इंच जाडीचे आणि साडेसात मीटर लांबीचे महाकाय ‘क्रू’ वापरून बसवण्यात आली. 1700 आरेखनांमधून 3629 तपशीलवार ड्रॉइंग तयार केली गेली. 18,038 तुकडय़ांसाठी ड्रॉइंगप्रमाणेच काम होणं गरजेच होतं. एवढे लोखंडाचे तुकडे जोडण्यासाठी 25 लाख ‘रिव्हेट’ वापरले गेले!
लाकडी परांची किंवा परात (स्कॅफफोल्ड) बांधून कामगार हे जड लोखंडी तुकडे परस्परांना जोडत होते. हे सर्व करणाऱ्या कंपनीचे निष्णात इंजिनीअर गुस्ताव आयफेल यांचंच नाव या टॉवरला देण्यात आलं हे विशेष! या गुस्ताव (किंवा गुस्तेव) यांना ‘वेड’ लागलंय म्हणून ते असलं साहस करतायत, या वृत्तपत्रीय टीकेपासून ते अनेक कलाकारांनी हे कलात्मक बांधकाम नसल्याची सडकून टीका केली. पण प्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसन यानी गुस्तेव यांना त्यांचा प्रसिद्ध फोनोग्राफ भेट देऊन त्यांचं कौतुक केलं. त्यानी गुस्तेव आयफेल याना ‘शूर इंजिनीअर’ आणि आधुनिक इंजिनीअरिंगमध्ये स्वतःचं असं काही नवीन निर्माण करणारी व्यक्ती असं गौरवलं. तर 1901 मध्ये अल्बर्टो डय़ुमॉ यांनी त्यांचं ‘विमान’ आयफेल टॉवरच्या टोकापर्यंत नेऊन 1 लाख फ्रॅन्कचं बक्षीस मिळवलं.