>> विनायक
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एका प्रसिद्ध व्यक्तीचा सन्मान सोहळा. त्यांचा परिचय करून देताना निवेदक भारावून जाऊन बोलत होता…‘‘आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रकाशाचं झाड असतं आणि त्याच्या तेजाची फुलं मानसांगणात टपटपत असतात. तसंच एक झाड म्हणजे…’’ माझ्या शेजारी बसलेला पत्रकार मित्र म्हणाला, ‘‘कसली ही मखरात बसवलेली वाक्यरचना! ‘उपमा’चं हॉटेलच वाटतंय.’’ मलाही गंमत वाटली, पण निवेदक रंगात आला होता. जडजंबाल शब्दांची पेरणी करत निवेदन सुरूच होतं. वास्तविक ती व्यक्ती एवढी सिद्ध आणि प्रसिद्ध होती की, त्यांना अशी काही अतिशयोक्तीपूर्ण विशेषणं लावण्याची गरज नव्हती. त्यांचं नाव हेच एक ‘विशेषण’ झालेलं होतं…पण हौसेला मोल नाही. पुढे अनेक वर्षे ते ‘मनातलं’ प्रकाशाचं झाड आठवायचं आणि हसू यायचं.
मात्र त्या निवेदकाच्या कल्पनेतलं ‘प्रकाशाचं झाड’ कधीकाळी विज्ञानात अचानक भेटेल असं वाटलं नव्हतं. अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनाचा, समजेल तितका मागोवा घेताना ते झाड खरंच नजरेत आलं. अर्थात नेटवर. मग या प्रकाशाच्या झाडासंबंधी किंवा ‘ग्लोइंग ट्री’विषयी थोडक्यात काही द्यावंसं वाटलं म्हणून हा लेख. त्याची पार्श्वभूमी लक्षात यावी म्हणून मग ‘नॅनो टेक्नॉलॉजी’विषयी गेल्या लेखात काही माहिती दिली आणि आता त्या ‘प्रकाशरोपा’विषयी.
एखाद्या रोपातून चक्क उजेड पडतोय आणि जॉन मिल्टन कवीच्या ‘पॅरेडाइज लॉस्ट’ या पुस्तकाची पानं त्यातील ओळींसह स्पष्ट दिसतायत हे चित्र पाहून थक्क झाले. जगात सगळीकडेच कुठे ना कुठे असं बुद्धीला चालना देणारं, मन प्रसन्न करणारं संशोधन सुरू असतं. या शोधांचा थोडा वेध घ्यायला शिकलं तर बराच रचनात्मक बोध होईल. जाऊ द्या, पण लक्षात कोण घेतो…असा प्रकार. मात्र ती माहिती तुमच्याशी ‘शेअर’ करावीशी वाटली. हा कृत्रिम आणि नैसर्गिक गोष्टींचा म्हणजे पदार्थांमधल्या ‘नॅनो पार्टिकल’ अथवा ‘अतिसूक्ष्म कणांशी’ निगडित असलेल्या प्रयोगांचा प्रवास कधी कधी रम्य-रंजकही कसा असतो ते लक्षात आलं. उद्याच्या जगात नॅनो टेक्नॉलॉजी कशी सर्वव्यापी होणार आहे याची जाणीव झाली.
हा सगळा ‘प्लॅन्ट नॅनोबायोनिक्स’चा प्रयोग. ते पाण्याचा प्रवाह ज्या वनस्पतींमध्ये अधिक असतो अशा मोहरी (राई), पालेभाज्या, कोबी वगैरे वनस्पतींवर केले गेले. कारण या वनस्पतींच्या जीवनरसाबरोबर त्यात मिसळलेले (एम्बेडेड), विशेष म्हणजे वनस्पतीला स्वीकार होऊ शकणारे ‘नॅनो पार्टिकल’ विलक्षण किमया करून गेले. हे कसं घडलं तर अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर त्यांनी त्यासाठी सिलिकॉन नॅनो पार्टिकल वापरले. सिलिकॉनचे हे अतिसूक्ष्म कण या जलसमृद्ध वनस्पतींच्या जीवनरसाशी एकरूप झाल्यावर या रोपाची पानं प्रकाश निर्मिती करून चमकायला लागली! हे यश अक्षरशः लखलखीत तेजाचं होतं. वनस्पतींमधून कृत्रिम प्रकाश निर्माण केला गेला होता. माणसाला अग्नीचा शोध लागल्यावर त्याने दिवटय़ा, तेलाचे, गॅसचे दिवे आणि 1892 मध्ये एडिसन यांनी फिलॅमेन्टचा बल्ब शोधल्यावर विजेच्या दिव्यांनी जग उजळलं. आता तर नको तितका प्रकाश रात्र उजळत असतो. त्याचे काही दुष्परिणामसुद्धा संभवतात हे कुणाच्याच लक्षात येत नाही. त्याविषयी पुढे एखाद्या लेखातून जाणून घेऊ, पण स्वच्छ (क्लीन) कृत्रिम प्रकाशाची गरज ही असतेच. विजेच्या विविध दिव्यांपलीकडे स्वतंत्रपणे प्रकाश निर्मिती करणारी नैसर्गिक ‘जनरेटर्स’ वनस्पतींच्या माध्यमातून तयार झाली तर निदान नुसत्या डोळ्यांनी वावरण्याइतपत प्रकाश निर्मिती निश्चित होऊ शकते असं संशोधकांना वाटतंय आणि एका टेबल लॅम्पसारखा छोटय़ा रोपातून प्रकाश पाडण्याची ‘जादू’ त्यांनी साध्यही केली आहे.
हे सिलिकाचे नॅनो पार्टिकल 10 नॅनोमीटर व्यासाचे असतात. ते ल्युसिफेरस म्हणजे ऑक्सिडेटिव्ह एन्झाईमद्वारे फोटॉन किंवा प्रकाशकण निर्माण करतात. याची अधिक स्पष्टता फारच तांत्रिक होईल. त्यामुळे त्यातील आशय लक्षात घेऊन पुढे जाऊ. ही एन्झाईम त्या झाडाच्या चयापचय क्रियेशी (मेटॅबोलिझम) अक्षरशः ‘समरस’ झाल्याने झाडाच्या जीवनरसाचाच एक भाग होतात आणि प्रकाश देतात असं संशोधक स्टार्नो म्हणतात. त्यासाठी समुद्री ‘शेल’ किंवा शिंपल्यासारख्या गोष्टींमधून ‘कायटोसन’ द्रव्याचाही उपयोग करता येऊ शकतो. राईप्रमाणेच तंबाखूच्या रोपांवरही असे प्रयोग करता येतात. अशी प्रकाशित रोपं साडेतीन ते चार तास मंद उजेड देतात. बांबूच्या हिरव्या रोपांवरही असे प्रयोग होऊ शकतात. सध्या अधिक द्रवरस असलेल्या रोपांवर केले जाणारे हे प्रयोग यशस्वी झाल्याने पुढच्या काळात ते कोणत्याही मोठय़ा झाडांच्या बाबतीतही यशस्वी होऊ शकतात असा विश्वास आणि उमेद संशोधकांना आहे. सुरुवातीच्या प्रयोगातही केवळ 45 मिनिटं प्रकाशित राहील या अपेक्षेने तयार केलेलं रोप चांगलं चार तास उजेड पाडत राहिलं. या संशोधनाचा खूप दूरगामी परिणाम कालांतराने दिसेल.
कामाच्या ठिकाणी (वर्क प्लेस), रस्ते आणि अनेक सभागृहांत केवळ मंद नव्हे, तर प्रखर, पण शांत प्रकाश देणारी वनश्री निर्माण झाली तर प्रकाश निर्मितीचं स्वरूपच बदलेल. झाडांवरचे हे प्रयोग त्या वनस्पतींना त्रासदायक ठरणार नाहीत आणि मोठय़ा प्रमाणावर त्याचा प्रसार झाला की, झाडांच्या स्वास्थ्यासाठी ती ‘स्विचऑफ’ करण्याचीही सोय होणार आहे. पुढे कधीतरी ‘मालवून टाक दीप’ऐवजी ‘मालवुनी टाक रोप’सुद्धा म्हटलं जाईल. विज्ञान जीवनाचा भाग झाला की, मनातलं प्रकाशाचं झाड घराघरांत येईल.