वेब न्यूज – स्पेस एलेव्हेटर 

>> स्पायडरमॅन

मानवाचे  वर्तमान आणि भविष्य अधिक सुखकर करण्यासाठी देश विदेशातील संशोधक अनेक अजब गोष्टीवर काम करत असतात. अंतराळ सफरीचे स्वप्न हा जवळपास प्रत्येक पृथ्वीवासी बघत असतो. अगदी साधे विमानात बसता आले तरी अनेकांचा आनंद गगनात मावत नाही. मात्र आता तुम्हाला थेट मंगळावर जाण्याची संधी मिळणार असेल तर? आणि तेदेखील कुठल्याही यानातून नाही, तर चक्क लिफ्टमध्ये बसून जाता येणार असेल तर?

ओबायाशी ही जपानची कंपनी सध्या या अद्भुत संकल्पनेवर काम करत आहे. हे संशोधन यशस्वी होऊन, खरोखर अशी स्पेस लिफ्ट अस्तित्वात आल्यास, सध्या मंगळावर पोहोचण्यासाठी अंतराळवीरांना जो सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो तो चक्क तीन ते चार महिन्यापर्यंत कमी होणार आहे. कंपनीचे लक्ष्य तर हा प्रवास 40 दिवसांत पूर्ण करण्यावर असणार आहे. ओबायाशी कंपनीने 2012 साली प्रथम ही कल्पना मांडली आणि तिच्यावर काम सुरू केले. सध्या कंपनी इतर शोध, लिफ्टचे डिझाइन, प्रकल्पातील गुंतवणूक आणि सक्षम भागीदार शोधण्याच्या कामात व्यस्त आहे.

2025 साली प्रत्यक्षात या 100 अब्ज डॉलर्सच्या भव्य संकल्पनेवर काम सुरू होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्रथम एका नव्या अंतराळ स्थानकाची (स्पेस स्टेशन) निर्मिती करण्यात येणार आहे. चुंबकीय मोटर्सने चालवल्या जाणाऱ्या गाडय़ा त्यानंतर एका सरळ रेषेत मानवाला या अंतराळ स्थानकापर्यंत प्रवास घडवेल. माणसांबरोबर या लिफ्टमधून सामानाची वाहतूकदेखील सहजपणे केली जाऊ शकणार आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यास, अंतराळ प्रवासाचा खर्च तर मोठय़ा प्रमाणावर कमी होणार आहेच, पण पर्यावरणाच्या हानीलादेखील टाळता येणे शक्य असेल. अंतराळ वाहतुकीसाठी हा सर्वात टिकाऊ आणि फायदेशीर पर्याय असेल. मात्र अशा प्रकारच्या लिफ्टची रचना अथवा निर्मिती शक्य आहे का, यावर संशोधकांच्या दोन गटांमध्ये मतांतरे आहेत.