
वैश्विक
येत्या 21 सप्टेंबरला दोन महत्त्वाच्या खगोलीय घटनांची नोंद होईल. त्यातली एक वार्षिक आणि दुसरी दर 378 दिवसांनी घडणारी. त्यापैकी पहिली गोष्ट सूर्याच्या भासमान भ्रमणाची. गेल्या 21 मार्चपासून सूर्य आपण राहतो त्या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर तळपत होता. त्याचे ‘उत्तरायण’ 21 जूनला संपले आणि दक्षिणायन सुरू झाले. म्हणजे तो पुन्हा दक्षिण गोलार्धाच्या दिशेने निघाला. आता सूर्याचे हे ‘न चालताही चालणे’ पृथ्वीच्या अक्षाशी असलेल्या साडेतेवीस अंशांच्या कोनामुळे घडते. सूर्याभोवती पृथ्वी फिरते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि सूर्योदय ते सूर्यास्त हा स्थिर सूर्याचा भासमान दैनिक ‘प्रवास’ दिसतो तो पूर्व ते पश्चिम असा.
21 सप्टेंबरला सूर्य पृथ्वीच्या बरोबर मध्यावर असणाऱ्या विषृववृत्तावर किंवा वैषुविक वृत्तावर उगवेल नि मावळेल. त्यामुळे त्या 24 तासांत दिवस-रात्रीचा (उजेड-अंधाराचा) काळ 12-12 तासांचा असेल. नंतर हळूहळू सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धाला अधिक वेळ देईल. तिकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे भागांत उन्हाळ्याची चाहूल लागेल आणि ऑक्टोबर हीट संपली की, आपल्याकडचा दिनमानाचा काळ कमी-कमी होत थंडीच्या मोठय़ा रात्री सुरू होतील.
ऋतुचक्राची ही गंमत विज्ञान म्हणून अभ्यास करण्यासारखी, तर कविमनाला मोहवणारी. ती नित्यनेमाने अनुभवताना आपण त्याविषयी फारच कमी विचार करतो. सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा ‘अॅनालेमा’ इंग्रजी 8 च्या आकारात पाहायचा तर सूर्योदयाचं वर्षभर निरीक्षण करायला हवं. मुंबईतल्या घराच्या खिडकीतूनही ते अनेक वर्षे करण्याची संधी मिळाली हे विशेष!
या 21 तारखेची आणखी एक महत्त्वाची घटना आहे ती शनी ग्रहाची. शनै ः शनैः म्हणजे आस्ते कदम चालणारा शनैश्वर ग्रह. 21 तारखेपासून रात्री दोन आठवडे अतिशय तेजःपुंज दिसू शकतो. याचं कारण असं की, या रात्री तो पृथ्वीच्या ‘प्रतियुती’मध्ये आहे. ग्रहांची युती म्हणजे सूर्य आणि ठरावीक ग्रह एका बाजूला व पृथ्वी दुसऱ्या बाजूला अशी मंगळापासूनच्या बहिर्ग्रहांची स्थिती असते तो दिवस. याच्या उलट म्हणजे सूर्य एका बाजूला, मध्ये पृथ्वी आणि ग्रह दुसऱ्या बाजूला सरळ रेषेत येणे म्हणजे प्रतियुती. युती म्हणजे कंजंक्शन, तर प्रतियुती म्हणजे ‘ऑपॉझिशन.’
21 सप्टेंबरला प्रतियुतीमध्ये असणारा शनी साहजिकच तुलनेने पृथ्वीशी ‘जवळीक’ साधत असल्याने त्याचा मनोहारी कडय़ांसह (रिंग्जसह) सुंदर दिसणं अपेक्षित असतं. परंतु गेल्या मार्चपासून पृथ्वी आणि शनीच्या गतींची स्थिती अशी होत आलीय की, पृथ्वीवरून पाहणाऱ्यांच्या नजरेला समान रेषेत आलेली शनीची कडी जवळ जवळ ‘अदृश्य’ झालेली दिसतील. नोव्हेंबरनंतर ती पुन्हा चांगली दिसू लागतील.
ही गोष्टी सध्या शनीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याच्या कक्षेच्या कोनामुळे घडत आहे. शनीची कडीबरोबर समान प्रतलात आल्याचं पृथ्वीवरच्या निरीक्षकाला जाणवत असल्याने त्यांची ही भासमान ‘अदृश्यता’ आहे. नोव्हेंबरनंतर हा ‘अॅन्गल’ बदलला की, कडी पुन्हा चमकायला लागतील. 2032 मध्ये तर या कडय़ांची दक्षिण बाजू अतिशय चांगली दिसणार आहे.
आता परवाच्या ‘शनी’च्या प्रतियुतीविषयी. 21 सप्टेंबरच्या सायंकाळी योगायोगाने आकाश निरभ्र असेल, तर पूर्वेकडे उगवलेला शनी ग्रह ‘जवळ’ आल्याने स्पष्ट दिसणार आहे. हे अंतर दोन्ही ग्रह दूर असताना सूर्यापासून सुमारे 1 अब्ज 65 लाख किलोमीटर (11.5 अॅस्ट्रॉनॉनिकल युनिट 1 ‘एयू’ म्हणजे पृथ्वी-सूर्य अंतर 15 कोटी कि.मी.) आणि शनी-पृथ्वी ‘जवळ’ येतात तेव्हा ते अंतर सुमारे 1 अब्ज 50 कोटी किलोमीटर असते.
ही कोटी-कोटी किलोमीटरची अंतरे पृथ्वीवर प्रवास करणाऱ्यांना कल्पनातीत वाटतील, पण अंतराळात फिरणारे ग्रह आणि तारे अशाच अब्जावधी किलोमीटरवर असतात. त्यातही ग्रहांची अंतरे ‘जवळचीच’ म्हणायला हवीत. कारण आंतरतारकीय अंतरांचं मोजमाप ‘प्रकाशवर्षा’त करावं लागतं. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे 9460 अब्ज किलोमीटर एवढं लक्षात राहिलं तर आपल्या विश्वाच्या विराटपणाचा थोडासा अंदाज येऊ शकेल.
शनीचं सध्याचं भ्रमण मीन राशीच्या पार्श्वभूमीवर सुरू असून अनेक वर्षांनी मेष राशीत जाईल.
शनीसुद्धा इतर ग्रहांप्रमाणे (त्याच्या कडय़ांसकट) स्वतःभोवती फिरतो. सूर्याभोवती फिरायला त्याला 29.5 वर्षे लागतात. म्हणजे त्याचं एक वर्ष पृथ्वीच्या सुमारे 30 पट जास्त असतं. शनी म्हटलं की, खगोल निरीक्षकांना एक अभ्यासाचा विषय वाटतो. गॅलिलिओ यांनी शनीचं दुर्बिणीतून पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि ‘कॅसिनी’ यांनी त्याच्या अनेक कडय़ांमधील अंतराचं गणित मांडलं. 21 सप्टेंबरला शक्य असल्यास हा अद्वितीय ग्रह दुर्बिणीतून जरूर पहा.