यंगिस्तान – झुंझार पद्मदुर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्या वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड येथे जलदुर्ग बांधला. तोच पद्मदुर्ग. महाडमधील कोकणकडा संस्थेने मुरुड गावातील ग्रामस्थांसोबत पद्मदुर्ग महोत्सव सुरू केला आणि लोकांची पावले पद्मदुर्ग किल्ल्याकडे वळायला लागली. पद्मदुर्ग महोत्सवाचे निमित्त साधून चारकोप अडव्हेंचर्स क्लब, कांदिवली या संस्थेने अलीकडे पद्मदुर्ग मोहीम आखली. या मोहिमेचा हा वृत्तांत.

चारकोपमधून निघालेली बस  मुरुड गावाच्या दिशेला निघाली. मुरुड दांडा गावातील हॉटेलजवळ बस आली, तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. हवेत गारवा असल्यामुळे काही जणांनी गाडीतच राहणे पसंत केले, तर काही उत्साही मंडळींनी बाहेर लाकडे गोळा करून शेकोटी पेटवली. तेवढीच ऊब. हळूहळू उजाडू लागले. सकाळी साडेसातला फ्रेश होऊन चहा व नाश्ता उरकून मंडळी बसमध्ये बसली आणि बस पुन्हा एकदा मुरुड गावाच्या दिशेला लागली.

अर्ध्या तासाने जेव्हा आम्ही एकदरा जेटीवर पोहोचलो, तेव्हा बऱ्याच शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर सेवेला तत्पर असलेल्या बाळा साखरकरच्या बोटीत बसून अर्ध्या-पाऊण तासाचा जलप्रवास करीत आम्ही पद्मदुर्गाच्या पायथ्याकडील खडकावर उतरलो. पद्मदुर्ग दोन भागांत आहे. उजवीकडील बालेकिल्ला व डावीकडील पडकोट. गडाच्या पूर्वेस असलेला महादरवाजा दोन बुरुजांत बसविलेला आहे. बुरुजाच्या तळाकडील दगड लाटांच्या घर्षणाने झिजलेत. मात्र त्यातला चुना अजूनही दिसतो. पायऱ्या चढून आत प्रवेश केल्यावर दोनही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडय़ा लागतात. बालेकिल्ल्याच्या भक्कम तटबंदीला सात बुरुज, दोन ढाल बुरुज व फांजीवर चढण्यासाठी सहा ठिकाणी जिने आहेत. माचीवर उद्ध्वस्त घराच्या वास्तू, तर काही भग्न घरे आहेत. तीन पाण्याचे प्रशस्त हौद, उजव्या बाजूस असलेली कमानी सदर व आठ घरांचे संकुल बालेकिल्ल्याच्या माचीला शोभा आणतात.

तटबंदीस जोडलेल्या जिन्याने चढून फांजीवर जाता येते. तटबंदीत टेहाळणी व शत्रू सैन्यावर तोफा, बंदुकांचा मारा करण्यासाठी जागोजागी खिडक्या, जंग्या ठेवल्या आहेत. तटबंदीत गोळाफेकीचे यंत्र बसविलेले होते. आता त्याच्या दगडी कडय़ा शिल्लक आहेत. तटबंदीवरील बुरुजांना भिंती बांधून त्यात खोल्या निर्माण केलेल्या आहेत. बुरुजांना छप्पर, दिव्यांकरिता कोनाडे व दरवाजाची सोयही आहे. गड फिरण्यापूर्वी गडाची माहिती सर्वांना व्हावी म्हणून एका बुरुजात सावलीचा आसरा घेऊन संस्थेने बनविलेल्या पद्मदुर्ग माहिती पुस्तिकेचे वाचन शरयू हिने केले. गडदर्शनाची जबाबदारी मी स्वीकारली.

महादरवाजाच्या समोरील तटबंदीत पडकोटात उतरणारा दरवाजा आहे. पडकोटाच्या डावीकडील बुरुजाला कमळाप्रमाणे सात चऱ्या आहेत. यावरून या दुर्गाचे नाव पद्मदुर्ग पडले असावे.

बुरुजाच्या खाली तळघर समोरील तटबंदीत शौचकूप व पलीकडे खोली आहे. पडकोटात कोरडी विहीर, कोटश्वरी देवीचे मंदिर व दोन इमारतींचे चौथरे आहेत. तटावर चढण्यासाठी तटबंदीला जोडून पायऱ्या आहेत.

दांडाराजपुरीच्या जंजिऱ्याकडून पद्मदुर्गास धोका पोहोचू नये म्हणून काही अंतरावर बांधून काढलेली भिंत ढासळलेली आहे. पद्मदुर्गावर किमान 50-60 तरी तोफा असाव्यात.

गडदर्शन अडीज तासांत आटोपून आम्ही बोटीने किनाऱ्यावर आलो. एव्हाना सर्वांना चांगलीच भूक लागली होती. त्यामुळे   हॉटेलमध्ये येऊन पोटपूजेचा कार्यक्रम आटोपला. परतीच्या प्रवासात रात्रीची अर्धवट राहिलेली झोप गाडीत डुलक्या घेत पूर्ण करतानाही सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जय आणि प्रांजलीने संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
– संजय तळेकर, चारकोप अडव्हेंचर्स क्लब