प्रासंगिक – लढवय्या कॉम्रेड

>> भगवान परळीकर

मार्क्सवादी विचारवंत, कामगार चळवळीतील अग्रणी आणि लढवय्ये नेते कॉम्रेड तसेच माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचे आत्मचरित्र 1 जून 2023 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेसमोरील नॉर्थ कोट हायस्कूल मैदान येथे कॉम्रेड नरसय्या नारायणराव आडम यांच्या 79 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने कॉ. आडम मास्तरांच्या जीवनप्रवासाचा हा आढावा…

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे केंद्रीय समिती सदस्य तसेच प्रदेश सचिव राहिलेले कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर जिह्यात पक्ष उभारणीसाठी दिलेले योगदान बहुमोल आहे. जनवादी आणि वर्गीय लढय़ाची धार वाढवण्यासाठी अविरतपणे संघर्षाच्या मैदानात उतरून जनतेला न्याय मिळवून देताना त्याग आणि निस्पृह वृत्तीतून पक्षाचा जनाधार वाढवण्यात यशस्वी झाले.

1962 पासून कामगार चळवळ आणि मार्क्सवाद, लेनिनवादाकडे आकर्षित होऊन अनेक मार्क्सवादी विचारवंत, प्रभावी वत्ते, चळवळीतील अग्रणी या सर्वांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत राहिला. मुळातच त्यांच्या घरी त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि सोलापूरमधील पक्षाचे संस्थापकीय सदस्य असल्यामुळे स्वाभिमान आणि स्वावलंबन, अन्यायाविरुद्ध चीड, सत्याची चाड यांचे बाळकडू मिळाले.

कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या आयुष्याचा आजवरचा प्रवास हा अनेक स्थित्यंतरातून घडलेला आहे. ज्या विचारांनी प्रभावित होऊन प्रवासाची सुरुवात केली तो विचारच त्यांना माणूसपण आणि माणूसभान दिले. तो विचार म्हणण्यापेक्षा जगातील समूळ दारिद्रय़ निर्मूलनाचा कानमंत्र होता. असा तो आमूलाग्र बदलाचा विचार अर्थातच मार्क्सवादी विचार, जे आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. म्हणूनच त्यांची जडणघडण ही मार्क्सवादी सिद्धांतानुसार होऊ शकली. सोलापुरात गरीब कुटुंबात जन्मलेल्या नरसय्या मास्तरांना देशसेवेची प्रेरणा त्यांच्या स्वातंत्र्यचळवळीत हिरीरीने भाग घेणाऱया वडिलांकडूनच मिळाली. त्यामुळे त्यांनी पुढील सगळे आयुष्य देशसेवा आणि कामगार चळवळीसाठी झोकून दिले.

आडम मास्तर यांनी पहिल्यांदा हे 1968मध्ये सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते माधवराव काsंतम यांच्या विरोधात म्हणजे प्रस्थापितांविरुद्ध कामगारांचा प्रतिनिधी अशी झुंज दिली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र त्यामुळे त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. यानंतर येईल त्या परिस्थितीत, येईल त्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावरचा संघर्ष सुरू झाला. पोलिसांची दमनशाही, लाठय़ाकाठय़ा, तुरुंग, भूमिगत, प्राणघातक हल्ले,खोटी गुन्हे, यंत्रणेचा दबाव हा वाढतच राहिला, पण कधीच माघार घेतली नाही. लाल बावटय़ाची पोलादी शिस्त कधीच भंग होऊ दिली नाही. आजही पोलिसांचे खोटे गुन्हे, खोटे खटले चालूच आहेत. रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाईसुद्धा अविरतपणे सुरू आहे. कामगार चळवळ आणि न्याय्य हक्कांच्या लढय़ावर विश्वास ठेवून आम जनता आणि कामगारांनी मला तीन वेळा नगरसेवक व तीन वेळा आमदार म्हणून त्यांचे सभागृहात व विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या प्रत्येक संधीला मी परिपूर्ण न्याय देण्याचे कर्तव्य बजावले आहे. कष्टकरी-कामगार, भटके विमुक्त,संघटित असंघटित कामगार, मध्यमवर्गीय, बहुजन वर्ग, महिला, विद्यार्थी,युवक, व्यापारी,उद्योजक आदींच्या प्रश्नांवर विधिमंडळात तासन्तास भूमिका मांडली. वेळप्रसंगी सभागृह बंद पाडले, पण पोटतिडकीने प्रश्न मांडून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले, असे आडम मास्तर म्हणतात.

मास्तरांनी आईवडील, पत्नी, बहीण, भावंडे आणि मुलांसोबत तब्बल 25 वर्षे भाडय़ाच्या अत्यंत दाटीवाटीच्या घरात गुजराण केल्यामुळे ती गैरसोय आणि वास्तव ते भोगले आणि जगलेसुद्धा. वेळप्रसंगी कित्येक वर्षे, कित्येक रात्री मारुती मंदिरात काढावे लागल्या. म्हणून ते पहिल्यांदा 1978ला आमदार झाल्यावर त्यांनी त्यांच्या आईला दिलेल्या वचनानुसार विडी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पुंभारीच्या माळरानावर श्रमिकांचा ताजमहाल म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या व गणलेल्या 10 हजार विडी कामगारांना अत्यल्प दरात घर मिळवून दिले. तसेच कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 5500 घरे, त्यानंतर असंघटित क्षेत्रात काम करणाऱया 30 हजार कामगारांसाठी रे नगरची योजना अस्तित्वात आणली. रे नगर म्हणजे जागतिक कीर्तीचा महत्त्वाकांक्षी अभूतपूर्व एकमेव महागृहनिर्माण प्रकल्प होय. मागील सहाएक दशकांत चळवळीतले अनेक साथीदार, ज्यांच्यामुळे ते घडले त्यांच्याप्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राद्वारा केला आहे. युनिक फिचर्सच्या समकालीन प्रकाशनतर्फे प्रकाशित होणाऱया या आत्मचरित्राचे संहिता संपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार लेखिका गौरी कानेटकर यांनी तर सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. माकपचे महासचिव माजी सीताराम येचुरी यांनी मनोगत व शुभेच्छा संदेश दिले असून माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे यांनी प्रस्तावना दिली आहे.