जेटलींनी ड्रायव्हर आणि पीएच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवले

अरुण जेटली

एका हाताने केलेले दान दुसऱया हातालाही कळू देऊ नये म्हणतात. माजी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली आपल्या जीवनात असेच गुप्तदान करायचे. आपल्या खासगी स्टाफलाही ते कुटुंबीयांप्रमाणेच मानत असत. त्यांच्या बऱ्यावाईटात ते हिरीरीने भाग घेत असत. कारण ते त्यांना आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानत असत.  कधी औषध घ्यायचे, कधी जेवायचे याचे भान खुद्द जेटली यांना नसायचेच. हे सर्व पाहण्याची जबाबदारी त्यांचा स्टाफ मोठय़ा इमानेइतबारे सांभाळत होता.

विशेष म्हणजे जेटली यांच्या कुटुंबातील मुले ज्या बडय़ा हायस्कूलमध्ये शिकत होती त्याच शाळेत त्यांच्या स्टाफची मुलेही जावीत असा त्यांचा दंडकच होता. स्टाफपैकी कुणाचा मुलगा खूप हुशार असेल, त्याला परदेशी जाऊन शिकण्याची इच्छा असेल तर अरुण जेटली स्वखर्चाने त्याला परदेशात शिकायला पाठवत असत. जेटलींचा ड्रायव्हर जगन आणि स्वीय सहाय्यक पद्म यांच्यासहीत त्यांचे 10 कर्मचारी जेटली कुटुंबीयांशी गेल्या दहा वर्षांपासून मनानेही जोडले गेले आहेत. जेटलींमुळेच या सर्वांची मुले आज परदेशात मोठ्या हायस्कूलांमध्ये शिक्षण घेत आहेत.

जेटली यांचा सर्व आर्थिक व्यवहार चोख होता. आपल्या दोन्ही मुलांना (रोहन आणि सोनाली) यांना रोजच्या खर्चासाठीही ते चेकने पैसे देत असत. त्यांच्या सर्वच सहाय्यक आणि स्टाफचे वेतन जेटली चेकने देत. ते वकिलीची प्रॅक्टिस करत होते तेव्हाच त्यांनी दुसऱ्यांना द्यावयाच्या मदतीसाठी वेल्फेयर फंड बनवला होता. या संस्थेचे व्यवस्थापन एक ट्रस्ट पाहत होता. ज्या स्टाफची मुले चांगल्या मार्कांनी पास व्हायची त्यांना अरुण जेटली हे पत्नी संगीता यांच्या हस्ते गिफ्ट देऊन प्रोत्साहित करायचे.

जेवणाची व्यवस्था पाहणाऱ्याच्या दोन्ही मुली लंडनला

अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांसाठी जेवणाची व्यवस्था पाहणाऱया जोगेंद्र यांच्या दोन मुली लंडनमध्ये शिकत आहेत, तर संसदेत सावलीप्रमाणे जेटलींच्या मागे असलेल्या सहाय्यक गोपाळ भंडारी यांचा एक मुलगा डॉक्टर बनला, तर दुसरा इंजिनीयर… जेटली यांच्या स्टाफमध्ये सुरेंद्र हा चेहरा सर्वांच्याच परिचयाचा आहे. जेटली फक्त वकिलीची प्रॅक्टिस करत होते तेव्हापासून तो त्यांच्यासोबत होता. घरातील कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी तो पाहायचा. ज्या कर्मचाऱयांच्या मुलांना एमबीए करायचे होते त्यांच्या प्रोफेशनल कोर्सची संपूर्ण जबाबदारी जेटली यांनी घेतली होती. शिवाय त्यांना नोकरी मिळवून देण्यातही त्यांचा वाटा मोठा होता. जेटलींचे सहाय्यक ओ.पी. शर्मा यांचा मुलगा चेतन याने कायद्याचे शिक्षण पूर्ण करताच जेटलींनी त्याला 6666 नंबरची ऍसेंट कार भेट दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या