नाद-मराठी – स्वर आणि संगीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही छान छान मराठी गाणी गाणारे कैलासनाथ जयस्वाल हे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचे सहकारी. त्यांच्याबरोबर संगीत देता देता त्यांना स्वतंत्र चालीही सुचल्या आणि काही नाटय़गीतं, भावगीतं, अभंगांना त्यांनी चाली लावल्या. ‘एचएमव्ही’ कंपनीत रेकॉर्डिंग अधिकारी म्हणून नोकरी करत असताना त्यांनी स्वतःची गाणी मात्र रेकॉर्ड न करता अनेक गायक-गायिकांची गाणी केली. त्यात रवींद्र साठे, उत्तरा केळकर असे बरेच प्रसिद्ध कलाकार आहेत. नेटवर जयस्वाल यांचा फोटो मिळाला नाही, पण 1999 मधल्या मुलाखतीचा एक भाग ऐकता आला. त्यातून त्यांची सांगीतिक जाण आणि अधिकार स्पष्ट होत होता.

वसंत देसाईंसारख्या चतुरस्र संगीतकाराचा सहवास कैलासनाथ जयस्वाल यांना लाभला. ‘एचएमव्ही’मध्ये असताना त्यांनी गायिका शकुंतला तसंच अपर्णा मयेकर, प्रभाकर काटेकर, चंदू बोराडकर, रवींद्र साठे, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गाण्यांना चाली दिल्या. वाडकरांच्या ‘नको साजणी दूर देशात नेऊ, नको जीव लावू’ या गाण्याचं ‘पायलट’ गीत जयस्वाल यांनी आपल्या स्वरात रेकॉर्ड केलं होतं.

संगीतातील सर्व रसांचा आस्वाद घेताना, त्याला तार्किकतेची जोड हवी, असं ते म्हणत. जयस्वाल यांनी ‘सांग सांग भोलानाथ’ या नावाच्या नाटकाला संगीत दिलं होतं. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. ‘एचएमव्ही’मध्ये त्यांच्याकडे याच भाषांचा विभाग होता. मुलाखतीच्या वेळी त्यांना ‘उर्दू’ येतं का? असं विचारल्यावर ‘लिहिता-वाचतासुद्धा येतं’ असे उत्तर जयस्वाल यांनी दिल्यावर, दुबे नावाच्या अधिकाऱ्याने उर्दू पुस्तक त्यांच्यापुढे केले. त्यांनी त्यातला उतारा सफाईदारपणे वाचून दाखवला. पुढे याच कंपनीसाठी मराठी गाण्यांचे दोन अल्बम आणि हिंदी, उर्दू गजल अशी अनेक गीतं ध्वनिमुद्रित केली. संगीतकाराची स्फूर्ती त्याला चाल सुचवते मग शब्दांनुसार अर्थवाही सुरांची रचना करावी लागते हे त्यांनी जाणलं होतं.

कैलासनाथ जयस्वाल यांची मराठी गाणी खूप नसली किंवा माझ्या ऐकण्यात मोजकीची आली असली तरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी ती गाणी रेडिओवर अनेकदा लागत असत. आम्ही शाळेत असताना

‘या बाळांनो सारे या,

लवकर भरभर सारे या.

मजा करा रे मजा करा

आज दिवस तुमचा समजा’

अशी प्रसिद्ध भावकवी भा. रा. तांबे यांची बालकविता होती. संगीतकार वसंत देसाई त्या काळात महाराष्ट्र सरकारच्या ‘एक सूर एक ताल’ कार्यक्रमांतर्गत अनेक बालगीतांना चाली लावत असत. शालेय पुस्तकातील समकालीन कविता गाण्याच्या स्वरूपात सोप्या चालीत गुंफणाऱ्या देसाई यांनी अनेक कवितांना स्वरसाज दिला आणि प्रसिद्ध गायक, गायिकांनी ती गीतं गायिली. ‘या बाळांनो सारे या…’ हे गाणं नाटय़गीत गायिका फैय्याज तसंच कैलासनाथ जयस्वाल आणि प्रभाकर यांनी गायिलंय. अशीच एक आमच्या काळातली कविता म्हणजे ‘लेझीम.’ या कवितेचे कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे, संगीतकार अर्थातच वसंत देसाई आणि स्वर, कैलासनाथ जयस्वाल, जयवंत कुळकर्णी आणि फय्याज यांचा कवितेचे शब्द मोठे गमतीचे आहेत.

दिवस सुगीचे सुरू जाहले,

ओला चारा बैल माजले

शेतकरी मन प्रफुल्ल झाले

छन खळ, खळ छन,

ढुम, ढुम पट ढुम,

लेझीम चाले जोरात!

आणखी एक बालगीत कवी ग. ह. पाटील यांचे. ‘माझ्या मामाची रंगीत गाडी, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी’ संगीत वसंत देसाईंचं आणि गायक जयस्वाल. फय्याज, जयवंत कुळकर्णी यांनी चाल बांधलेल्या ‘जीवन त्याला कळले हो’ या गीतासाठी रवींद्र साठे आणि समूहासह आपला स्वर दिलाय. जयस्वाल यांची ‘सोलो’ म्हणजे एकटय़ाची मराठी गाणीही प्रसिद्ध आहेत. योगेश्वर अभ्यंकरांचं ‘आज मी नाथाघरी आलो’ हे गीत त्यांनी गायले. संगीत भानुकांत लुकलुके यांचं. कवयित्री शांता शेळके यांच्या ‘एकटेच येणे येथे, एकटेच जाणे’ या कैलासनाथ जयस्वाल यांच्या स्वरातील भावगीताला संगीत दिलंय यशवंत देव यांनी आणि स्वतः यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीत दिलेलं ‘कशासाठी आटापिटा कुठे तुझी धाव; माणूस तुझं नाव रे, माणूस तुझं नाव’ हे मी गीत गायिलंय कैलासनाथ जयस्वाल यांनी. हे गाणं आजही अनेकदा रेडिओवर लागतं. ते खूपच रसिकप्रिय आहे.

खासगी अल्बममधील जयस्वाल यांची आणखीसुद्धा मराठी गाणी रसिकांना ठाऊक असतील. या छोटय़ा लेखात सर्वच गोष्टींचा समावेश करता येत नाही, पण काही स्वरांचं स्मरण त्या काळात घेऊन जातं आणि आता तर नेटवर थोडा शोध घेतला तर ही गाणी ऐकताही येतात.

>> अरुण जोशी