ब्राह्ममुहूर्त : आरोग्याची गुरूकिल्ली

83

>>अरविंद दोडे<<

[email protected]>.com

दिवसभरातील सगळय़ात चांगली शुभवेळ कोणती… अर्थात पहाटेची! पहाटे केलेला व्यायाम, अभ्यास, मनन, चिंतन सारेच अत्यंत फलदायी आणि आरोग्यपूर्ण असते.

प्राचीन ऋषिमुनींनी जसे अध्यात्मविद्येला सर्वश्रेष्ठ विद्या मानले आहे, तसेच त्या विद्येला विज्ञानाच्या भक्कम पायावर उभे केले आहे. प्रत्येक प्रहराची काही वैशिष्टय़े आहेत. आठ प्रहर कल्पिले असून कोणत्या प्रहरी काय करावे वा काय करू नये, हे पृथ्वीच्या ‘गती-स्थिती’ मानानुसार ठरविले आहे. मुहूर्ताचा विचार करतानासुद्धा असेच विचार पौराणिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात.

दिवसाचा तिसावा भाग म्हणजे मुहूर्त! हा सुमारे पंचेचाळीस मिनिटांचा असतो. दोन घटिका म्हणजे एक मुहूर्त (आपण सहज म्हणतो, ‘दोन घटका आराम करा.’ दिवसाचे पंधरा अन् रात्रीचे पंधरा असे एकूण अहोरात्रीचे तीस मुहूर्त होतात. तीस मुहूर्तांना वेगवेगळी तीस नावे आहेत. शिवाय तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाचही अंगे जेव्हा शुभ असतील, अशा कालास मुहूर्त म्हणतात. थोडक्यात, शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त! साऱया मुहूर्तांमध्ये श्रेष्ठ ‘ब्राह्ममुहूर्त’ आहे. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी वायुमंडळ प्रदूषणरहित असते. प्राणवायूचे प्रमाण सर्वाधिक असते. ते शरीरशुद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. आयुर्वेदानुसार त्यावेळी पायी फिरल्यामुळे शरीरात जीवनशक्तीचा (संजीवनीचा) संचार होतो. म्हणूनच त्या वायूला ‘अमृततुल्य’ संबोधले जाते. रात्रीच्या झोपेनंतर ब्राह्ममुहूर्तावर लेखन, वाचन, मनन, श्रवण, नामस्मरण, अभ्यास केल्यास स्मृती दृढ होते, स्फूर्ती मिळते. दिवसभर उत्साह राहाण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, धारणाध्यान केल्यास मानसिक अन् शारीरिक सामर्थ्य टिकून राहते.

दिनक्रम बदला, तरच पहाटे जाग येईल.

आता प्रश्न असा आहे की, मुळातच आपण चुकीचा दिनक्रम उद्योगव्यवसायामुळे नाइलाजाने जगतो आहोत. ब्राह्ममुहूर्त पूर्वी साधणे सोपे होते. विद्युतपुरवठा नसल्याने दिवे तेलाचे होते. सूर्यास्ताच्या आगेमागे भोजन होत असे. मग आजीआजोबा गप्पागोष्टी करीत. ‘लवकर निजे, लवकर उठे…’ त्यास जाग येत असे पहाटे. वीज आली, आपण आयुष्यात असे काही दिवे लावायला सुरुवात केली की, मध्यरात्रीपर्यंत चित्रपट, नाटक, टीव्ही आणि भुक्कड मालिकांचे आपण गुलाम झालो! लोकांनी अराजक माजवू नये म्हणून ‘टीव्ही पेशंट’ सरकारने तयार केले. हा दिनक्रम बदलावा, तरच पहाटे जाग येईल. ब्राह्ममुहूर्ताचे सर्वांगीण फायदे मिळतील आणि आरोग्याची गुरुकिल्ली हाती येईल!

हा मुहूर्त असतो तरी केव्हा?

रात्रीच्या अखेरच्या प्रहराला म्हणतात रातवा. 3.45 ते 5.30 असा पावणेदोन तासांचा मुहूर्त असतो. या प्रहरास रात्रीचा चौथा प्रहर म्हणतात, तर सर्वमान्य नाव आहे उत्तररात्र.

यावेळी आपण उठल्यास काय फायदे होतात?

वैज्ञानिकदृष्टय़ा ओझोन हा वायू वातावरणात खालच्या थरावर मोठय़ा प्रमाणात पसरल्याने शरीरास पोषक प्राणवायू पुरेसा मिळाल्याने श्वसनविकार कमी होतात. अशावेळी उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेतला तर रक्तशुद्धी होते. हिमोग्लोबिन सुधारल्यामुळे नव्वद टक्के रोग बरे होतात.

> प्रकाश मंद असल्याने दृष्टिदोष वाढत नाहीत. म्हणून ‘चांदण्यात’ फिरावे. ते शीतलता देते. उष्णता नियंत्रित ठेवते.

> पंचमहाभूतांपैकी वायुतत्त्व कार्यरत असल्याने पोटाचे विकारही नष्ट होतात. पोट साफ होण्यास प्रयास पडत नाहीत.

> मोठय़ा आतडय़ास पुरेशी शक्ती मिळते. आपली उत्सर्जक इंद्रीये एकूण नऊ आहेत. ती योग्य रीतीने कार्यरत होतात. घाम आल्याने ताजेतवाने वाटते.

> एवढेच नाही तर ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास (कोमट पाण्याने) त्वचेची रंध्रे मोकळी होतात. अशा खुल्या रंध्रांना शुद्ध हवा मिळाल्यास दिवसभराच्या परिश्रमांनी थकवा जाणवत नाही.

> मस्तिष्कातील स्मरण केंद्रे खुली होतात, जागृत राहतात. पाठांतराचा उपयोग होतो. म्हणून विद्याभ्यास याचवेळी करतात.

> सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या शक्तिवर्धक लहरी (अर्थात सकारात्मक) किरणांद्वारे मिळतात. त्वचेद्वारे ती शोषली जाऊन निरामय जीवनाचा लाभ होतो, आयुर्मान वाढते.

> अध्यात्म विद्येचा योगदृष्टीने विचार केल्यास ‘ओंकार साधना’ केल्यास शरीरातील सप्तचक्रे जागृत होतात. विश्वचैतन्याशी एकरूपता साधण्यास हीच वेळ संशोधकांनी सांगितली आहे.

> समाधिसुखाचा अमृतानुभव यावेळी येतो. कुंडलिनी शक्ती जागृतीची हीच वेळ योग्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या