
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवाले पक्षात बोलवत असले तरी आपण भाजपमध्ये अजिबात जाणार नाही, अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.
दिल्लीतील किरारी भागातील सरकारी शाळेच्या कोनशिला कार्यक्रमात ते पोहोचले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, यांना जी हवी ती कारस्थानं करू द्या. काहीही होणार नाही. मी सुद्धा यांच्याविरोधात उभा ठाकलो आहे, मी अजिबात झुकणार नाही. ते सांगतात की भाजपमध्ये ये मी सोडून देईन. मी म्हटलं मी भाजपमध्ये अजिबात जाणार नाही. कधीच जाणार नाही. मी भाजपमध्ये का जाऊ? भाजपमध्ये गेलो तर सारे गुन्हे माफ होतात. पण, मी चुकीचं केलेलं नाही. आम्ही रुग्णालय, शाळा उभारत आहोत. रस्ते बनवत आहोत. पाणीपुरवठा करत आहोत. सांडपाण्याची व्यवस्था करून देत आहोत. यात आम्ही काय चुकीचं केलं? असे प्रश्न केजरीवाल यांनी केले आहेत.
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने पाठवलेल्या पाचव्या नोटीसीलाही केजरीवाल यांनी धुडकावून लावल्याने भाजपने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे आपविरुद्ध तक्रार केली आहे. त्यानंतर गुन्हे शाखेने केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे.


























































