कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा फॉर्मूला; केंद्राला केल्या काही सूचना

देशभरासह जगात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. मात्र, अनेक राज्यात लसींची कमतरता जाणवत असल्याने लसीकरणाला खीळ बसली आहे. देशात जाणवत असलेली कोरोना लसीची कमतरता दूर करण्यासाठी आणि सर्व राज्यांना कोरोनाची लस मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राला उपाय सूचवला आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या टंचाईचे संकट दूर करता येईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

देशभरात सध्या फक्त दोनच कंपन्या कोरोना लसीचे उत्पादन करत आहेत. कोरोना लसनिर्मितीचा फॉर्म्युला देशातील इतर कोरोना लसीनिर्मितीची क्षमता असलेल्या कंपन्यांना देण्यात यावा, त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन वाढेल, असे त्यांनी सांगितले. फक्त दोन कंपन्यांच्या उत्पादनाने लसीकरण केल्यास लसीमोहीम दोन वर्षे लांबण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

दिल्लीसह अनेक राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. लस नसल्याने काही राज्यांमध्ये लसीकरण सुरूही झालेले नाही. याच गतीने लसीकरण सुरू राहिल्यास दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचे कोरोनापासून कसे रक्षण होणार, असा सवाल करत कोरोना लसींचे उत्पादन युद्धपातळीवर वाढवत लसीकरणाला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

देशाची कोरोना लसींची गरज भागवण्यासाठी लस बनवण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना लसनिर्मितीचा फॉर्मुला देत त्यांना लसनिर्मितीसाठी परवानगी देण्यात यावी. त्यामुळे देशातील लसीच्या टंचाईवर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत आता काही दिवस पुरेल, एवढेच लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे दिल्लीसह देशाला कोरोना लसीची मोठ्या प्रमाणात गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या