केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे! भाजपचा खळबळजनक आरोप

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि दिल्लीत विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल सुरू असून भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी केला. यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली.

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला 70 जागांसाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल यांच्या निशाणा साधला. केजरीवाल भोळेपणाचा आव आणून मी दहशतवादी आहे का? असा प्रश्न विचारत आहेत. केजरीवाल यांच्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’, असेच आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहे. केजरीवाल यांनी मी अराजकवादी असे विधान केले होते. अराजकवादी आणि दहशतवादी यात फार काही फरक नसल्याचे जावडेकर म्हणाले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आपकडून तीव्र शब्दात निषेध
प्रकाश जावडेकर यांच्या विधानाचा आम आदमी पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अरविंद केजरीवाल दहशतवादी असतील तर केंद्रातील सत्ताधारी भाजपने त्यांना अटक करावी, असे आव्हानही संजय सिंह यांनी दिले.

प्रवेश वर्मांनी केली दहशतवाद्यांशी तुलना
भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. केजरीवालांसारखे नटवरलाल, केजरीवालांसारखे दहशतवादी देशात लपलेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवालांसारख्या दहशतवाद्यांशी लढावे, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे प्रवेश वर्मा एका जाहीर सभेमध्ये म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या