लाल किल्ल्यावर ‘वंदे मातरम’ घोषणा देताना केजरीवाल यांची ‘ती’ कृती कॅमेऱ्यात कैद, भाजपने केला हल्लाबोल

6135

देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्यांदा तिरंगा फडकवला. कोरोना संकटकाळामुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. मात्र या दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते भाजप आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

लाल किल्ल्यावरून परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. भाषण संपल्यानंतर मोदी यांनी हात उंचावून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ घोषणा दिल्या. मोदींच्या या घोषणेला उपस्थित नेते, अधिकारी यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला, मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मूग गिळून गप्प राहिले आणि आणि त्यांनी हात उंचावून प्रतिसादही दिला नाही. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपने केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्ली भाजप प्रवक्ते ताजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विट करून केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. ‘वंदे मातरम’चा सन्मान केल्याने वोट बँक नाराज होईल अशी भीती वाटत आहे का? बाटला हाऊस एन्काऊंटरमधील दहशतवाद्यांसाठी, सैन्याकडे पुरावे मागताना हात उंचावणाऱ्या केजरीवाल यांनी आज कोणता आजार झाला, ज्यामुळे त्यांनी ‘वंदे मातरम’च्या सन्मानासाठी हात उंचावण्यास नकार दिला?’, असा सवाल ताजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केला.

निवडणुकी दरम्यान केजरीवाल मुसलमान वोट बँक असल्याचे म्हणतात, मग आज ती वोट बँक नाराज होऊ नये म्हणून हात उंचावण्यास नकार दिला का? ‘वंदे मातरम’ ही घोषणा भाजपची किंवा कोणत्याही पक्षाची नाही, त्यामुळे केजरीवाल यांनी हात उंचावुन अभिवादन करायला हवे होते, असे ताजिंदर पाल सिंह बग्गा यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या