‘मनोविकास’चे अरविंद पाटकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोविकास प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. गेल्या आठ दिवसांपासून काविळीच्या विकाराने आजारी असलेल्या पाटकर यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आहेत. पाटकर यांच्या पार्थिवावर वैपुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या अरविंद पाटकर यांनी गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली होती. पुढे गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद होऊन ते बाहेर पडले. त्यांनी उपजीविकेसाठी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जे.जे., शीव अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली. पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा वाचकांशी थेट संवाद वाढत गेला. मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाऊस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले. अखेर 4 एप्रिल 1984 रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकासचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. वैचारिक, सामाजिक पुस्तकांच्या माध्यमातून मनोविकासने स्वतंत्र ओळख निर्माण केली. 2005पासून अरविंद पाटकर पुण्यात स्थायिक झाले. प्रकाशन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा राज्य सरकारने श्री.पु. भागवत पुरस्काराने गौरव केला होता.