
सरत्या वर्षाखेरीस धडकलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता नवीन वर्ष उजाडताच कमी झाली आणि उकाडा वाढला. बुधवारी मुंबई शहर व उपनगरांतील तापमानात चार अंशांची मोठी वाढ झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत दिवसाचा पारा 37 अंशांवर जाईल, तर किमान तापमान 4 जानेवारीपर्यंत 20 अंशांपेक्षा कमी नोंद होईल. त्यानंतर किमान तापमान वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर हिंदुस्थानातील बर्फवृष्टीमुळे मुंबई-महाराष्ट्रात थंडीची लाट धडकली होती. मात्र वाढते प्रदूषण आणि धुरक्याचे साम्राज्य यामुळे मुंबईच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ नोंद झाली. बुधवारी सांताक्रुझ येथे कमाल 34.4 अंश, तर किमान 20.5 अंश इतके तापमान नोंद झाले. किमान आणि कमाल अशा दोन्ही पातळय़ांत सरासरीपेक्षा चार अंशांची वाढ झाली. ठाण्याचे तापमानही 35 अंशांच्या पुढे झेपावले. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर नवीन वर्षाच्या सुरुवातीला उकाडय़ाने त्रस्त झाले. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील दोन दिवस तापमान 36 ते 37 अंशांच्या पुढे नोंद होईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.