हे हिंदूराष्ट्र नव्हते, नाही आणि नसेलही; सरसंघचालकांच्या विधानावर ओवैसींचे प्रत्युत्तर

1494

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानामुळे एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा तिळपापड झाला आहे. आपला देश हिंदू आहे. आपले राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, असे मोहन भागवत म्हणाले होते. या विधानामुळे संतापलेल्या ओवैसी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले असून हे हिंदूराष्ट्र नव्हते, नाही आणि नसेल, असे विखारी हुंकार काढले आहेत.

सरसंघचालकांच्या विधानावर मत व्यक्त करताना ओवैसी म्हणाले की, मोहन भागवत हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र बोलून इतिहास मिटवू शकत नाही. तसेच सरसंघचालक आमची संस्कृती, आस्था, पंथ आणि व्यक्तीगत ओळखीसह सर्व काही हिंदू संस्कृतीमध्ये मिसळलेले आहे, असे बोलणार नाही. एकामागोमाग एक ट्वीट करून त्यांनी सरसंघचालकांवर निशाणा साधला.

जगात सर्वात सुखी मुस्लिम हिंदुस्थानात, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

ते पुढे म्हणतात, भागवत यांनी आम्हाला विदेशी मुसलमानांशी जोडण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडत नाही. आमच्यातही ‘भारतीयता’ ठासून भरली आहे. त्यांनी पुढे म्हटले की हिंदू राष्ट्र = हिंदू सर्वोच्चता. हे आम्हाला अमान्य आहे.

काय म्हणाले होते सरसंघाचालक…
भुवनेश्वरमधील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक म्हणाले की, पूर्ण जगात ज्युंचा छळ होत होता. ते आश्रय शोधत होते. तेव्हा हिंदुस्थानने त्यांना आश्रय दिला. पारशी समाजाला त्यांच्या धर्मासहित हिंदुस्थानने स्विकारले. जगात सर्वात सुखी मुसलमान हिंदुस्थानातच मिळतील काराण आपण हिंदू आहोत. आपला देश हिंदू आहे. आपले राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे.

आपली प्रतिक्रिया द्या