योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाचा अपमान करत आहेत; ओवैसी यांचा हल्लाबोल

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवला आहे. आदित्यनाथ यांनी केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून औवैसी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्यनाथ अयोग्य वक्तव्ये करून मुख्यमंत्रीपदाचा अपमान करत आहेत, असे ओवैसी म्हणाले. संविधानात कलम 14,19,22,25 मध्ये धर्मनिरपेक्षता स्पष्ट करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष देश आहे, असे असूनही देशाला सन्मान मिळत नसेल तर ते राज्यकर्त्यांचे अपयश आहे. आदित्यनाथ धर्मनिरपेक्षतेबाबत अयोग्य विधाने करत असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. चीन आपल्या भूभागावर कब्जा करतोय, देशात शेतकरी आंदेलने करत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, हे सर्व धर्मनिरपेक्षतेमुळे झाले आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

स्वातंत्र्य याचा अर्थ काय, ते संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांचा दुहेरी चेहरा आहे. साडेसहा वर्षांपासून तुमचे सरकार आहे, तरी सन्मान मिळत नाही, याचा अर्थ सरकार अपयशी ठरले आहे, असेही ओवैसी म्हणाले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भूमीपूजन होत आहे. तुम्ही ज्या पदावर बसला आहात, त्या पदाला कोणताही धर्म नाही. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री अयोग्य विधाने करतो आणि भाजप फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. भाजपचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे, असेही ते म्हणाले.

धर्मनिरपेक्षतेचा जागतिक स्तरावर हिंदुस्थानी पंरपरेला मोठा धोका आहे. हिंदुस्थानविरोधात अजेंडा राबवणाऱ्यांना योग्य शिक्षा केली जाईल, असे एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला संभ्रमित करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. काहीजण हिंदुस्थान आणि येथील पंरपरेवर खोट्या गोष्टी पसरवत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. त्यांनी केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून ओवैसी यांनी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या