शैक्षणिक क्षेत्राच्या जाहिरातींमधून होणारी फसवणूक रोखण्यासाठी एएससीआयने जनतेकडून मागितला सल्ला

asci

अॅडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात हिंदुस्थानी जाहिरात मानक परिषदेने (एएससीआय) आपल्या ‘शैक्षणिक संस्था, कार्यक्रम व प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये’ बदल करण्याची शिफारस केली आहे. यासाठी एएससीआयने जनतेकडून सल्ला मागवला आहे. जेणेकरून, सर्व संबंधितांना यात सहभाग घेता येईल आणि देशातील या महत्त्वपूर्ण उद्योगासाठी योग्य व न्याय्य मार्गदर्शक तत्त्वांचा संच तयार करता येईल.

विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांपासून ते कोचिंग क्लासेस, एड टेक प्लॅटफॉर्म्सपर्यंत तसेच शैक्षणिक व प्रशिक्षण कार्यक्रम देऊ करणाऱ्या सर्व शिक्षणसंस्था देशाच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या सर्व संस्थांना ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे मोल तर मोजतातच, शिवाय ते प्राप्त करण्यासाठी अनेक त्यागही करतात. त्यामुळेच या क्षेत्रातील मार्केटिंग संवाद हा प्रामाणिक असणे खूपच महत्त्वाचे आहे. या संस्थांच्या जाहिरातींतील चित्रण व आशयामुळे ग्राहकांना कोणतेही नुकसान पोहोचता कामा नये.

एएससीआयने या वर्षात कारवाई केलेल्या आक्षेपार्ह जाहिरातींमध्ये शिक्षण क्षेत्रातील जाहिरातींचे प्रमाण 27 टक्के होते (यातील 22 टक्के जाहिराती पारंपरिक शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या होत्या, तर 5 टक्के एडटेकच्या होत्या). 49 टक्के पालक एडटेक प्लॅटफॉर्मची निवड जाहिरातींच्या आधारे करतात असे एएससीआयने घेतलेल्या अलीकडील एडनेक्स्ट अभ्यासात दिसून आल्यामुळे शैक्षणिक चौकट मजबूत राखण्यासाठी या जाहिरातींचे नियमन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जाहिरातींमध्ये अध्ययनाचा संबंध पूर्णपणे परीक्षा व गुणांशी जोडला जातो, यावर संबंधितांनी व तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केल्याचेही या अभ्यास अहवालात म्हटले आहे. या चिंता सोडवण्याच्या दृष्टीने एएससीआयने शिक्षणविषयक जाहिरातींसाठी असलेली सध्याची मार्गदर्शक तत्त्वे सर्वसमावेशकरित्या अद्ययावत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

या क्षेत्राद्वारे तयार केल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचता कामा नये याची खात्री मार्गदर्शक तत्त्वांद्वारे केली जाते. जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांची ठोस पुराव्यांसह पुष्टी करणे या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिक्षणसंस्थांसाठी आवश्यक ठरते.

विद्यार्थ्यांना त्यांच्या लिंगाच्या किंवा वर्णाच्या आधारे साचेबद्ध केले जाणार नाही, तसेच कमी गुण प्राप्त करणाऱ्यांचे चित्रण अयशस्वी किंवा अपयशी म्हणून केले जाणार नाही याची खातरजमा नवीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे केली जाणार आहे. सामान्य किंवा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्रण या जाहिरातींमध्ये मनोधैर्य खालावलेले, निराश, दु:खी किंवा पालक, शिक्षक वा समवयस्कांकडून फारसे कौतुक न केले जाणारे म्हणून केले जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करतानाच अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्यांचा शारीरिक आरोग्याचाही विचार केला जाणार आहे; विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी झोप किंवा भुकेची तमा बाळगली नाही असे जाहिरातींमध्ये दाखवले जाऊ नये, कारण ह्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या सवयींना उत्तेजन दिले जाऊ शकते. पालक किंवा विद्यार्थ्यांमध्ये उगाचच ते काहीतरी गमावत आहेत अशी उतावळेपणाची भावना किंवा भीती जाहिरातींद्वारे निर्माण करणेही एएससीआय संहितेचा भंग समजला जाईल.

एएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनीषा कपूर म्हणाल्या: ‘शिक्षणक्षेत्राचा प्रभाव लक्षावधी विद्यार्थ्यांवर व आपल्या अपत्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे म्हणून पराकोटीचे त्याग करणाऱ्या पालकांवर पडतो. अन्य अनेक उत्पादनांप्रमाणेच शिक्षणाचे मापनही ठोस पद्धतीने केले जाऊ शकत नाही. अभ्यासक्रमाचे मूल्य पदवी, पदविका किंवा अन्य अर्हतांद्वारे, परिभाषांद्वारे, त्याला मिळणाऱ्या मान्यतेद्वारे मोजले जाते. त्याचप्रमाणे संलग्नता, प्रशंसापत्रे आणि अधिमान्यता, प्रवेश/रोजगार/पगाराचे वायदे यांद्वारे शिक्षणसंस्थांचे मूल्यमापन केले जाते. म्हणूनच एएससीआय संहितेच्या पहिल्या प्रकरणातील नियमांचे पालन करणे व सत्य दाखवणे यांच्यासह, तरुण व सहज छाप पडण्याजोग्या वयातील विद्यार्थ्यांच्या हिताला आपली वर्णने व संदेश यांच्याद्वारे बाधा पोहोचवली जाणार नाही, याची काळजीही जाहिरातदारांनी घेतली पाहिजे. एडटेकसारखी नव्याने उदयाला येणारी क्षेत्रे चांगल्या शक्तीसारखी जोपासली जावीत याची खात्री करण्यातही अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे मोठी भूमिका बजावतील. जनतेने मोठ्या संख्येने पुढे यावे आणि यासंदर्भात आपली मते मांडावीत अशी विनंती आम्ही करत आहोत. हे काम सर्वांच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे.’

मार्गदर्शक तत्त्वांवर जनतेची मते घेण्यास 14 मार्च 2023 पासून सुरुवात केली जाणार आहे आणि 15 एप्रिल, 2023पर्यंत सर्व जण आपली मते नोंदवू शकतील. यासंदर्भातील आपली मते [email protected] वर पाठवली जाऊ शकतात.