ब्राह्मण समाजाला खूष करण्यासाठी महायुती सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन केली आणि या महामंडळाच्या अध्यक्षपदावर अजित पवार गटाचे आशिष दामले यांची नियुक्ती केली आहे; पण या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे; कारण या महामंडळाच्या अध्यक्षपदावर आपल्याच कार्यकर्त्याची वर्णी लागेल अशी भाजप कार्यकर्त्यांची अटकळ होती. पण अजित पवार यांनी बाजी मारल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे.
या महामंडळाची घोषणा झाल्यानंतर यावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. ब्राह्मण समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्याने या जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागेल असा कयास होता. मात्र, अजित पवार गटाने महायुतीमध्ये कुरघोडी करत हे महामंडळ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. तसेच महायुतीमधील कोणत्या पक्षाच्या खात्यात हे महामंडळ जाणार अशी चर्चा
रंगली होती.
ठाणे जिह्यात बदलापूर शहरात ब्राह्मण समाजाचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यामुळेही या महामंडळावर भाजपच्याच ब्राह्मण पदाधिकाऱ्यांची वर्णी लागेल अशी आशा भाजप कार्यकर्त्यांना होती. मात्र अजित पवार गटाने ही जागा पदरात पाडून घेतल्याने भाजपचा स्थानिक मतदार नाराज झाला आहे.
आशिष दामले हे कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षही राहिले आहेत. त्यांनी विविध उपक्रमांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. दामले यांच्या माध्यमातून ठाणे जिह्यात पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याची चर्चा या निर्णयानंतर रंगली आहे.