दहीहंडी उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नेणार – आशीष शेलार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव हा एक महत्त्वाचा सण असून त्याची ख्याती जागतिक स्तरावर आहे. या दहीहंडी उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नेऊ, त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज केली. मुंबईतील गोविंदांना स्पेनमध्ये पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कृष्णानंद सोहळा’ आज परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघ येथे पार पडला. त्याप्रसंगी आशीष शेलार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकांनी सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

हिंदू सणांना विरोध करणारे शहरी नक्षलवादी

महाराष्ट्रात काही संघटना गणेशमूर्ती आणि विसर्जनावर बंदी आणा, गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी परवानगी मिळता कामा नये, ध्वनी परवानग्यांवर मर्यादा आणा, नागपंचमी पूजनावर मर्यादा आणा, गोविंदा दहीकाला उत्सव यांच्या उंची, थर, वय आणि आयोजनावर मर्यादा आणा, अशा मागण्या करत असतात. पर्यावरणाची आणि नागरिकांची चिंता केलीच पाहिजे, पण मराठी माणसाच्या आणि हिंदू सणांवरच मर्यादा आणण्याची मागणी करणारे हे लोक शहरी नक्षलवादी आहेत का, असा आरोप यावेळी आशीष शेलार यांनी केला.