अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या; अविनाश धोडी पाच महिन्यांपासून होता फरार

मिंधे गटाचा पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाच महिन्यांपासून मुख्य आरोपी अविनाश धोडी फरार होता. दादरा-नगर-हवेली येथे अविनाश धोडी लपून बसला असल्याची खबर मिळताच पालघर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.

19 जानेवारी रोजी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर गुजरात सरिगाव येथील बंद खदाणीत गाडीच्या डिकीत मृतदेह आढळला होता. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचा 8 ते 10 दिवसांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपी अविनाश धोडी हा मयत अशोक धोडी यांचा सख्खा लहान भाऊ असून तो पाच महिन्यांपासून फरार होता. अखेर रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अविनाश धोडी याला सेलवास मधील मोरखल येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळत अटक केली. जमिनीच्या तसेच इतर वादातून दारूमाफिया अविनाश धोडी याने आपला मोठा भाऊ अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केली होती. हत्येनंतर तपासासाठी पोलीस चौकीत बोलावले असता अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून पसार झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र रविवारी पहाटे अविनाश याच्या मुसक्या आवळण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

अजूनही तीन आरोपी मोकाट
अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात एकूण 9 आरोपींचा सहभाग असून मुख्य सूत्रधार अविनाश धोडीसह आतापर्यंत 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर अजूनही मनोज राजपूत, आशिष धोडी आणि आणखी एक आरोपी फरार आहे