माझे सरकार पाडण्यासाठी आमदारांना 25 कोटींची ऑफर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा आरोप

1282
ashok-gehlot

 

सगळे जग कोरोनाच्या संकटाने भयग्रस्त आहे. हिंदुस्थान कोरोनाला हरकण्यासाठी प्राणपणाने लढत असताना राजस्थानात मात्र भाजपला सत्तेचे डोहाळे लागले आहेत. भाजपने राज्य सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा स्पष्ट आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. दरम्यान, सरकार पाडण्याच्या संशयावरून शनिवारी भरत मलानी या भाजप नेत्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपने मध्यप्रदेशमध्ये तोडफोडीचे राजकारण करून कमलनाथ यांचे सरकार पाडले. हाच कित्ता आता राजस्थानात गिरवण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत केला. मी आणि माझे सरकार कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहोत, पण भाजप मात्र सरकार पाडण्याचे षडयंत्र रचण्यात मश्गूल असल्याचे ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया आणि उपनेते राजेंद्र राठोड यांचे थेट नाव घेऊन गेहलोत यांनी हा प्रहार केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आरोप निराधार
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे. गेहलोत हे चलाख राजकारणी आहेत. सरकारचे अपयश लपवण्यासाठी ते भाजपच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पुनिया यांनी केला.

मोबाईल नंबरच्या चौकशीतून खुलासा
राजस्थानमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात दोन मोबाईल नंबरची चौकशी करण्यात येत होती. या मोबाईल क्रमांकावरून झालेल्या संवादातून राज्यसभा निवडणूकीच्या अगोदर गेहलोत सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला होता, त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली होती अशी माहिती समोर आली.

आपली प्रतिक्रिया द्या