भाजपमध्येच मोदींना कुणीही मान देत नाही, अशोक गेहलोत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-ashok-gehlot

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भाजपमध्ये फूट पडली असून आता पंतप्रधानांना त्यांच्याच पक्षाचे नेते मान देत नाहीत, अशी टीका गेहलोत यांनी केली आहे.

शनिवारी जयपूर येथे कृषी अनुसंधान केंद्र येथे माध्यमांशी बोलताना गेहलोत यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या पक्षातच मान ठेवला जात नाही. जो मान आहे, तो आता संपत चालला आहे. ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब असली पाहिजे कारण लोकांमध्ये त्यांच्याविषयी जो आदर होता, तो आधीच कमी झाला होता. आता पक्षातील नेत्यांमध्येही त्यांच्याबाबत आदर उरलेला नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्याला हे विचारा की पक्षाच्या बैठकीत काय परिस्थिती पाहायला मिळते. आधी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत काय चित्र पाहायला मिळायचं, आणि आता ते कसं बदललं आहे. आम्हाला तर हेही कळलंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींमध्ये बिनसलं आहे, याबाबतही गेहलोत म्हणाले.

मोदी सरकारवर निशाणा साधताना गेहलोत म्हणाले की, देशात आज मोदीजींचं राज्य आहे. आणि त्या राज्यात हिंसाचार आणि अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. संविधानाच्या चिंधड्या उडत आहेत. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. आयकर विभाग, सीबीआय यांचा वापर कशा प्रकारे केला जातोय, ते आता जनतेलाही कळून चुकलं आहे, अशी टीका गेहलोत यांनी केली आहे.