
मंत्र-तंत्राच्या नावाखाली धमकावून सहा महिलांवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडील पिस्तुलातील पाच काडतुसे वापरल्याचे आढळून आले आहे. जादूटोण्यातून नरबळी घेण्यासाठी की, स्वतःचे पितळ उघडे पडू नये म्हणून हत्या करण्यासाठी ही काडतुसे वापरली गेली का, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याचा उलगडा होण्यासाठी पोलिसांनी आज न्यायालयाकडून कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने खरातच्या कोठडीत 29 मार्चपर्यंत वाढ केली आहे. एकूण 14 महिला त्याच्या अत्याचाराच्या बळी ठरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, आणखी आठ महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, याची पोलिसांकडून तयारी सुरू आहे. दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध तीव्र संताप असून आज नाशिक कोर्टाबाहेर मोठी गर्दी झाली होती. खरातला कोर्टात आणले तेव्हा मोठा गदारोळ झाला. त्याला परत नेताना पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.
विशेष तपासी पथकाकडून गेल्या सहा दिवसांपासून खरात व संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे, त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आज कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत रविवार, 29 मार्चपर्यंत वाढ केली आहे.
मिरगावात फिरकू देणार नाही
भोंदू खरातमुळे आमच्या मिरगावची बदनामी होत आहे, अशा विकृताला आम्ही पुन्हा गावात पाय ठेवू देणार नाही, असा गावबंदीचा ठराव करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्या ट्रस्टचे ईशान्येश्वर मंदिर ग्रामपंचायतीकडे सोपवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
‘एल्विश हनी’च्या नावाखाली अनेकांना लुबाडले
खोटा वीस फुटी साप, रानटी चिंचोके, वाघाची नकली कातडी, ओश्नो जल या माध्यमातून अनेकांना भोंदू खरातने आपल्या जाळ्यात ओढले होते. याहून कहर म्हणजे त्याने ‘एल्विश हनी’ पिंवा ‘तुकाa हनी’ हे कामोत्तेजक व शक्तिवर्धक मध आपल्याकडे असल्याचे सांगून अनेकांकडून कोटय़वधी रुपये उकळले. हा मध तुकाaच्या समुद्रातील खोल गुहांमधून आणला जातो, अशा अनेक गोष्टी रचून तो एक किलो मधासाठी सुमारे नऊ लाख रुपये घेत होता, त्याच्या या मधाविषयीच्या भूलथापांचे अनेक राजकीय नेते, उद्योजक शिकार झाले आहेत.
ट्रस्टच्या संपत्तीत सात वर्षांत वाढ
शिवनिका ट्रस्टच्या संपत्तीत सात वर्षात मोठी वाढ झाली आहे. या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय असून, पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. सन 2017-18 मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार ट्रस्टचे उत्पन्न पाच लाखांच्या घरात होते, ते 2019-20 पासून वाढत-वाढत 2024-25 पर्यंत सवादोन कोटींच्या घरात पोहोचल्याचे समजते.
पोलीस वाहन अडवण्याचा प्रयत्न
खरातला आज दुपारी पोलीस पथकाने न्यायालयातून बाहेर आणले, तेव्हा संतप्त विनोद नाठे यांनी संबंधित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. खरातला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले, त्याच्या काळ्या कारनाम्यांमध्ये पुढारी, अधिकारी सामील आहेत, त्यांना सहआरोपी करा, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
खरातला फासावर चढवा – तृप्ती देसाई
खरातने केलेले कूकर्म माफ करण्यासारखे नाही. मागील वर्षी त्याला बेडय़ा घातल्या असत्या, तर अनेक महिला त्याच्या जाळ्यात अडकल्या नसत्या. त्याला तीन महिन्यात फासावर चढवले पाहिजे, त्याचे साथीदार, संबंधित सर्वांवर मोकाअंतर्गत कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली. त्या आज नाशिक न्यायालय आवारात आल्या, तेव्हा पोलिसांनी घेराव घालून अडवले, याचा त्यांनी निषेध केला.






























































