उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसॉर्टवर अखेर हातोडा पडला

उद्योगपती अशोक मित्तल यांच्या अलिबाग तालुक्यातील कोळगाव गावातील हॉलिडे रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाने जेसीबी फिरवून अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्यास सुरूवात केली आहे. भर पावसात बांधकाम पाडण्यात आले. आगामी काळात अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे पाच एकर मालमत्ता आहे. जिल्हाधिकारी रायगड यांनी अशोक मित्तल याना 514 स्क्वेअर मीटर बांधकामाची परवानगी दिली होती. मात्र मित्तल यांनी दोन हजार स्क्वेअर मीटरचे वाढीव अनधिकृत बांधकाम केले होते. अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात बॉम्बे इन्व्हरमेन्ट एक्शन ग्रुपने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने अशोक मित्तल यांच्या विरोधात निकाल देऊन वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

जिल्हाधिकारी रायगड यांनी अशोक मित्तल याना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस दिली होती. त्यानुसार वाढीव अनधिकृत बांधकाम स्वतः पाडा अथवा आम्ही कारवाई करू असे आदेश दिले होते. मात्र मित्तल यांनी बांधकाम पाडले नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 7 नोव्हेबर रोजी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पाहणी केली होती. त्यानुसार आज 8 नोव्हेंबर रोजी मित्तल यांच्या रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा फिरला आहे.

अशोक मित्तल यांनी केलेले आलिशान बांधकाम पाडण्यास प्रशासनाला दोन महिने लागण्याची शक्यता आहे. बांधकाम हे आरसीसीचे असून सार्वजनिक बांधकाम विभागला यंत्रसामुगी वाढवावी लागणार आहे. तसेच प्रशासनाला 514 स्केअर मीटर बांधकाम ठेऊन अनधिकृत वाढीव दोन हजार स्केअर मीटर बांधकाम पाडायचे आहे. तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, कर्मचारी, पोलीस यावेळी उपस्थित होते.

——————————-
अशोक मित्तल यांचे 514 चौरस मीटर बांधकाम हे अधिकृत असून एकूण अडीच हजार चौरस मीटर निवासी बांधकाम केलेले आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे. लवकरात लवकर हर बांधकाम पाडण्यात येईल.
सचिन शेजाळ, तहसीलदार, अलिबाग

आपली प्रतिक्रिया द्या