तलावातील गाळ काढताना सापडले विमानाचे अवशेष

सामना प्रतिनिधी। आष्टी

तालुक्यातील रुटी इमनगाव येथील प्रकल्पात गाळ काढताना विमानाचे अवशेष सापडले आहेत. आष्टी शहरापासून जवळच तालुक्यातील रुटी इमनगाव येथे सर्वात मोठा प्रकल्प असून मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने हा प्रकल्प कोरडा ठाक पडला आहे. याच प्रकल्पातून जे सी बी यंत्राद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू असताना सोमवारी तलावात विमानाचे अवशेष सापडले आहेत.

या बाबत माहिती घेतली असता, 1940 साली इंग्रज अधिकारी विमानातून पाहणी करत असताना त्यांचे विमान या तलावात पडले होते. त्यात एक वैज्ञानिक व दोन अधिकारी यांचा मृत्यू झाला होता. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आणि त्या काळी विमान बाहेर काढण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री नसल्याने ते विमान बाहेर काढता आले नाही. अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे. तलावात विमानाचे अवशेष सापडल्याची ही पहिली वेळ नसून याआधीही तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना असेच विमानांचे अवशेष सापडले होते.