
>> आशुतोष बापट
सुंदर परंतु दुर्लक्षित असणाऱ्या गणेशस्थानांत पुण्यातील खिंडीतला गणपती आणि कनकेश्वरचा श्रीराम सिद्धिविनायक या बाप्पांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. आगळीवेगळी, रमणीय आणि गर्दीपासून दूर अशी ही आडवाटेवरची गणेशस्थानं, ज्यांचं दर्शन अवश्य घ्यायला हवे.
महाराष्ट्राला देवस्थानांची मोठी देणगी लाभलेली आहे. विविध संप्रदायांची विविध देवस्थाने इथे विराजित आहेत. त्यातील काही ठिकाणे आगळीवेगळी आणि गर्दीपासून दूर आहेत. अशा गणेशस्थानांचे दर्शन अवश्य घ्यावे. आज जी दोन गणेशस्थाने बघणार आहोत त्यातले एक आहे ऐन पुण्यात, तर दुसरे आहे कोकणात अलिबागजवळ एका रमणीय टेकडीवर. काहीशा आडवाटेवर वसलेल्या या गणपतींचे दर्शन अवश्य घ्यायला हवे.
खिंडीतला गणपती
पुण्यातले गणपती असं म्हटलं की, कसबा गणपती, सारसबाग, दगडूशेठ हलवाई आणि मग इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती, 10 दिवस चालणारा गणेशोत्सव इत्यादी सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात, पण पुण्यातसुद्धा आडवाटेवरची काही गणेशस्थाने आहेत आणि त्यांना चांगला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. गणेशखिंडीमधे असलेला पार्वतीनंदन गणपती किंवा खिंडीतला गणपती हा त्यातलाच एक. शिवकाळापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात असावे. या गणपतीशी खूप साऱया आगळ्यावेगळ्या कथा निगडित आहेत. राजमाता जिजाबाई यांना साक्षात्कार झाल्यामुळे बांधण्यात आलेले हे मंदिर असेही सांगितले जाते. जिजाबाई या एका श्रावणी सोमवारी पालखीमधून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या होत्या. त्या वेळी खिंडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न होता. सत्पुरुषांचे आशीर्वाद आणि देवाचे दर्शन या दुहेरी हेतूने त्यांनी झाडीतील या गजाननाचे दर्शन घेतले. कसबा गणपतीसारखीच ही पण पुरातन मूर्ती असल्याचा साक्षात्कार जिजाबाईंना झाला आणि त्यांनी इथे सुघड मंदिर बांधले. काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. नंतर पाषाण भागात राहणारे शिवराम भट्ट चित्राव यांनी या मंदिराची दैन्यावस्था पहिली आणि जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले. इथल्या विहिरीची साफसफाई करत असताना त्यांना विहिरीत मोठेच गुप्तधन सापडले. चित्राव ते धन घेऊन शनिवारवाडय़ावर गेले, परंतु बाजीराव पेशव्यांनी ते धन घेण्याचे नाकारले. अखेर त्याच धनाचा वापर करून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आणि खिंडीतल्या या पार्वतीनंदन गणेशाचे मंदिर उभारले गेले. या मंदिरात गणेशाची सिंदूरचर्चित चार फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. मूर्ती बैठी असून सोंड डावीकडे वळलेली आहे. पुढील दोन हात मांडीवर असून मागील दोन हातांत परशू आणि अंकुश आहे. सभामंडपाच्या सुरुवातीला एका दगडावर लाडू हातात धरलेला मूषक आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांप्रमाणे इतर पेशवेसुद्धा मोहिमेवर जाताना या खिंडीतल्या गणपतीचे दर्शन घेत असत. राक्षसभुवनच्या मोहिमेवेळी थोरल्या माधवराव पेशव्यांनी याचे दर्शन घेतले होते. दुसऱया बाजीराव पेशव्याने पुत्रप्राप्तीसाठी या गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आढळते.
किवळे इथल्या कान्ट्रक्टर रानडे घराण्यातील मंडळी कुटुंबात कुणाचे लग्न झाले की, नवीन जोडप्याला घेऊन या गणेशाच्या दर्शनासाठी आजही येत असत. त्या विधीला ‘ओहर’ असे म्हणत. त्या वेळी मोठा जेवणावळीचा कार्यक्रम होत असे. एकदा हे सर्व कुटुंबीय या समारंभासाठी जमले असता त्यातल्या श्रेष्ठींना या गजाननाचा दृष्टांत झाला की, या ठिकाणी दरोडेखोर येणार आहेत. तेव्हा तुम्ही इथून लगेच निघावे. श्रेष्ठींनी सर्व मंडळींना लगेच किवळे इथे हलवले. दरोडेखोर आले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आजही पुण्यातील कान्ट्रक्टर रानडे मंडळी या गणेशाच्या दर्शनाला आवर्जून जातात. अजून एक महत्त्वाची घटना या गणेशाबाबत घडली ती 1897 साली. रँङच्या खुनापूर्वी चापेकर बंधूंची खलबते याच मंदिरात होत असत. निर्दयी रँङचा खून केल्यावर दामोदर हरी चापेकरांनी ‘खिंडीतला गणपती नवसाला पावला’ असा सांकेतिक निरोप खंडेराव साठे यांच्या मार्फत लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सेनापती बापट भूमिगत असताना याच मंदिरात वास्तव्याला होते. अशा या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या पार्वतीनंदन गणपतीचे दर्शन मुद्दाम घ्यायला हवे.
हे निसर्गरम्य गिरीस्थान-कनकेश्वर अलिबागपासून अगदी जवळ 2000 फूट उंचीवरील डोंगरावर आहे. काहीसे वेगळे, चढून जाण्यासाठी सुलभ आणि माथ्यावरून दिसणारे दृश्य केवळ अप्रतिम असे हे ठिकाण आहे. ‘आज्ञापत्र’ या प्रख्यात ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मनःस्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते. अलिबागपासून फक्त 10 किमीवर मापगाव नावाचे गाव लागते. मापगावपासून अंदाजे 800 दगडी पायऱया चढून वर जावे लागते. इथे असलेल्या एका पुष्करणीच्या उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुख मंदिर वसले आहे. हे मंदिर कऱहाड येथील गणेशशास्त्राr जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र यांनी ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके 1798 रोजी बांधले. या रामचंद्र संन्याशाने पुढे थथस्वामी लंबोदरानंद असे नाव धारण केले. याच परशुरामभक्त श्री लंबोदरानंद स्वामी यांना भगवान परशुरामाने तपश्चर्येसाठी श्री लक्ष्मी, गणेशाची लहान आणि देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कनकेश्वर इथे जाऊन तपश्चर्या करावयास सांगितले. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर त्यांचे एक स्नेही श्री. बापट यांनी स्वामींच्या समाधीशेजारीच हे गणेशमंदिर बांधले, परंतु या गणेशाची पूजा करू नये असा परशुरामाचा आदेश असल्यामुळे त्यांनी वडोदरा येथील श्री. गोपाळराव मैराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना केली. परशुरामाने लंबोदरानंद स्वामींना दिलेली मूर्ती तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. पूजेची गणेश प्रतिमा जवळ जवळ तीन फूट उंच असून संगमरवरी आहे. गणेशाच्या मूर्तीशेजारीच रिद्धीसिद्धीच्या यांच्या मूर्तीसुद्धा आहेत. वैशाख शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दिवशी इथे मोठा वार्षिक जन्मोत्सव साजरा करतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीला लंबोदरानंद स्वामींची पुण्यतिथी साजरी होते.
[email protected]
(लेखक – कसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)