Asia Cup मध्ये भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे अनोखा विक्रम, तोडणं जवळपास अशक्यचं!

bhuvneshwar-kumar

आशिया चषकाचा धमाका 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून हिंदुस्थानचा संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी दोन वेळा आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला आहे. आणि या दोन्ही आशिया चषकांमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कहर बरसवणारी गोलंदाजी करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आशिया चषक 2016 आणि 2022 साली टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता. या दोन्ही वेळा भुवनेश्वर कुमारकडे टीम इंडियाच्या गोलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी होती. त्याने दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून एकूण 6 सामने खेळले आणि 13 गडी तंबूत धाडले आहेत. त्यामुळे आशिया चषकाच्या टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सुद्धा त्याच्याच नावावर आहे. परंतु 2022 साली खेळल्या गेलेल्या आशिया चषकामध्ये भुवनेश्वर कुमारने केलेला विक्रम क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला. या स्पर्धेत अफगानिस्ताविरुद्ध टीम इंडियाचा सामना पार पडला आणि या सामन्यात भुवनेश्वरने अफगानिस्तानच्या फलंदाजांना रडकुंडीला आणलं. त्याने टाकलेल्या 4 षटकांमध्ये फक्त 4 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत आशिया चषकाच्या टी-20 फॉरमॅटमध्ये अशी दमदार कामगिरी कोणत्याच गोलंदाजाला करता आलेली नाही. यंदा होणाऱ्या आशिया चषकामध्ये हा विक्रम मोडित निघणार का? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचली आहे.