Asia cup 2025 – उपकर्णधारपदासाठी गिल पहिली पसंती नव्हता, गंभीरने चक्र फिरवली अन्… BCCI च्या बैठकीत नक्की काय घडलं?

आशिया चषक 2025 साठी मंगळवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा संघ आशिया चषक स्पर्धेत उतरेल. तर शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. या संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूंना मात्र जागा मिळाली नाही. यावरून आता क्रीडा विश्वात मोठे वादंग उठले आहे. विशेष म्हणजे उपकर्णधारपदासाठी गिल पहिली पसंती नव्हती असेही समोर आले आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने पास कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मात्र गेल्या वर्षीच्या जुलैनंतर त्याने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये अक्षर पटेल याने सूर्य कुमारची साथ दिली होती. त्यामुळे गिलला उपकर्णधार करण्याचा निर्णय सहजासहजी झाला नाही.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत यावर बराच वेळ चर्चा झाली. काही सदस्यांचे मत होते की, अक्षर पटेलने गिलच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला उपकर्णधार म्हणून साथ दिली होती. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद असावे. मात्र या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वेगळा दृष्टिकोन मांडला. टीम इंडियाने भविष्याचा विचार करून तरुण खेळाडूला नेतृत्वगुण शिकण्याची संधी द्यावी. येत्या सप्टेंबर महिन्यात 26 वर्षांचा होणारा गिल यासाठी योग्य असल्याचे मत गंभीर याने व्यक्त केले.

अर्थात गिल हा उपकर्णधारपदाच्या निवडीसाठी पहिली पसंती नव्हता, परंतु सर्वानुमते अंतिम निर्णय त्याच्याच बाजूने झुकला. काहींचे मत अक्षर पटेलच्या बाजूने होते, पण शेवटी निवड समितीला वाटले की, टीम इंडियाला दीर्घकाळ सेवा देऊ शकणाऱ्या खेळाडूवर डाव खेळण्यात आला. कारण आगामी पाच वर्षांसाठी जबाबदारी सोपवता येईल असा दुसरा पर्याय समितीकडे नव्हता. गिल आधीच कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे सूर्यकुमारनंतर नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे हळूहळू दिली जाऊ शकते, असे निवडकर्त्यांचे एकमत होते.

दुःखद आणि अन्यायकारक, श्रेयस-यशस्वीला वगळल्यानंतर माजी फिरकीवीर अश्विनचा संताप

दरम्यान, ज्याअर्थी गिलकडे उपकर्णधारपद देण्यात आले त्याअर्थी तो अंतिम 11 मध्ये असणार हे स्पष्ट आहे. वर्षभरानंतर तो आंतरराष्ट्रीय टी20 खेळणार असल्याने चांगली कामगिरी करण्याकडे त्याचे लक्ष असेल. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.

श्रेयस-यशस्वीने अजून काय करायला हवे? माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांना पडला प्रश्न