
हिंदुस्थानच्या महिला बॉक्सर्सनी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सातव्या दिवशीही आपला दमदार खेळ कायम ठेवत उपांत्य फेरीपूर्वीच पदक निश्चित केले आहे. सकाळच्या सत्रात मीनाक्षी आणि जॅस्मिन यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे हिंदुस्थानच्या महिला संघातील प्रत्येक खेळाडूने पदकाच्या शर्यतीत स्थान निश्चित केले.
मीनाक्षीने 48 किलो गटात जपानच्या युका सदामात्सूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. अचूक पंचेस आणि उत्तम रिंग सेन्सच्या जोरावर तिने प्रतिस्पर्धीला संधीच दिली नाही. त्याचप्रमाणे 57 किलो गटात जॅस्मिनने चीनच्या झियी चेनवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयांसह हिंदुस्थानी महिला संघाने आतापर्यंत स्पर्धेत निर्दोष कामगिरी करत प्रत्येक वजनी गटात पदक निश्चित केले असून संघाची खोली आणि सातत्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.
पुरुष गटातही हिंदुस्थानी बॉक्सर्सनी प्रभावी कामगिरी केली. 85 किलो गटात लोकेशने कोरियाच्या गिचाए किमवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आकाशने तुर्कमेनिस्तानच्या यहलास बगत्य्यारोव्हवर 5-0 असा विजय मिळवला, तर हर्ष चौधरीने किर्गिझ प्रजासत्ताकच्या टायनिस्टन अलिबाएववर मात करत उपांत्य फेरी गाठली.
एकूणच हिंदुस्थानी पुरुष संघातील सहा बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत स्थान मिळवत सर्वच गटांमध्ये दमदार उपस्थिती दर्शवली आहे. मात्र 80 किलो गटातील अंकुशला जॉर्डनच्या हुसेन इआशैशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.





























































